नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इम्युनॉलॉजी, नवी दिल्ली

प्रथमेश आडविलकर itsprathamesh@gmail.com

राजधानी नवी दिल्ली येथे असलेली नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इम्युनॉलॉजी (एनआयआय) ही संस्था इम्युनॉलॉजी आणि जैवतंत्रज्ञान या विषयांमध्ये संशोधन करणारी एक महत्त्वाची आणि प्रगत संशोधन संस्था आहे. या संशोधन संस्थेची स्थापना अगदी अलीकडे १९८१ साली झालेली आहे. एनआयआय ही एक स्वायत्त संस्था असून, केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करते. परंतु ही संस्था सीएसआयआरशी (वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद) संलग्न नाही.

* संस्थेविषयी

एनआयआय ही स्वायत्त संशोधन संस्था बायोटेक्नॉलॉजी विभागाअंतर्गत आपले संशोधन करत आहे. नामवंत शास्त्रज्ञ आणि या संस्थेचे संस्थापक प्रथम संचालक प्रा. डॉ. जी. पी. तलवार यांच्या प्रयत्नाने या संस्थेची स्थापना दि. २४ जून १९८१ रोजी झाली. दिल्ली येथे असलेल्या ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणजेच एम्समधील इम्युनॉलॉजी विभागामधील आयसीएमआर-डब्ल्यूएचओ रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेिनग सेंटरमध्ये एनआयआय या संस्थेच्या स्थापनेची बीजे रोवली गेली आहेत. १९८२ साली हा विभाग एनआयआयमध्ये विलीन करण्यात आला. मात्र सुरुवातीला एनआयआय या संस्थेचे संशोधन कार्य एम्सच्या प्रयोगशाळेतून होत राहिले. १९८३ साली संस्थेची जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी (जेएनयू) कॅम्पसमध्ये बांधलेली नवीन इमारत पूर्ण झाली, त्यानंतर एनआयआयने आपला सगळा मुक्काम तिकडे हलवला. ही एक स्वायत्त शासकीय संशोधन संस्था असून संस्थेच्या स्वायत्त दर्जामुळे ते एक मान्यताप्राप्त विद्यापीठदेखील आहे. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करणारी ही संस्था मात्र सीएसआयआरशी (वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद) संलग्न नाही. मात्र संस्था भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागाअंतर्गत कार्यरत असलेली एक अग्रगण्य प्रयोगशाळा निश्चितच आहे.

*  संशोधनातील योगदान

एनआयआय या संशोधन संस्थेने इम्युनॉलॉजी या विषयातील मूलभूत व उपयोजित संशोधनाला पूर्णवेळ वाहून घेतलेले आहे. संस्था मानवी शरीराची रोग प्रतिबंधात्मक प्रणाली हाताळण्याच्या विविध पद्धती विकसित करण्यासाठी, शरीराच्या संरक्षणाची यंत्रणा समजून घेण्यासाठी सतत प्रगत संशोधन करण्यासाठी वचनबद्ध आहे. तसेच जैवविज्ञान क्षेत्रातील इतर विषय जसे की, बायोकेमिस्ट्री, मॉलिक्युलर बायोलॉजी, सेल बायोलॉजी आणि स्ट्रक्चरल बायोलॉजी इत्यादी विषयांमध्ये संस्था आंतरविद्याशाखीय संशोधन (Interdisciplinary research) करत आहे.

आधुनिक जैवविज्ञानातील संशोधनासहितच इन्फेक्शन अ‍ॅण्ड इम्युनिटी, मॉलिक्युलर डिझाइन, जीन रेग्युलेशन, रिप्रॉडक्शन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट हे विषयदेखील एनआयआयच्या संशोधनाचे प्रमुख विषय आहेत. संस्थेकडे जीवशास्त्र आणि जैवतंत्रज्ञानातील संशोधन आणि विकासाशी संबंधित विविध विषयांमध्ये मूलभूत संशोधन करण्यासाठी तज्ज्ञ संशोधकांचे पुरेसे पाठबळ उपलब्ध आहे. या कुशल  संशोधकांच्या पाठबळाच्या आधारे संस्थेने ‘मायकोबॅक्टेरियम इंडिकस प्राणि’ (Mycobacterium indicus pranii) या नावाने कुष्ठरोगाची भारतातील सर्वात पहिली लस विकसित केलेली आहे. ही लस संस्थेचे संशोधन क्षेत्रातील हे सर्वात मोठे यश म्हणता येईल.

* विद्यार्थ्यांसाठी संधी

एनआयआय ही संशोधन संस्था आणि विद्यापीठाच्या दर्जाचे एक स्वायत्त शैक्षणिक केंद्रही आहे. त्यामुळे या संस्थेमध्येही विद्यार्थ्यांना पदव्युत्तर, पीएचडी व पोस्ट डॉक्टरल संशोधन अभ्यासक्रम पूर्ण करता येतात. इम्युनॉलॉजीमधील संशोधनासाठी कुशल मनुष्यबळ मिळावे व संशोधनाच्या माध्यमातून या क्षेत्राशी संबंधित असलेल्या समस्यांचे निराकरण व्हावे या उद्दिष्टाने केंद्र शासनाने संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण व संशोधनाची संधी दिलेली आहे. संस्थेचे अनेक पीएचडी पदवीधारक भारतात व परदेशातदेखील संशोधन, औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत आहेत. संस्था देश-विदेशातील विविध विद्यापीठांबरोबर संलग्न होऊन अनेक शैक्षणिक व संशोधन प्रकल्प राबवत आहे.

तसेच विद्यापीठ/ संस्थांशी एनआयआय पदव्युत्तर व पीएचडी अभ्यासक्रमासाठी संलग्न आहे. महाविद्यालय किंवा विद्यापीठामधील विद्यार्थी त्यांचे पदवी व पदव्युत्तर स्तरावरील संशोधन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी येथे येतात.

*  संपर्क

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इम्युनॉलॉजी (एनआयआय),

अरुणा असफ अली मार्ग,

नवी दिल्ली- ११००६७.

दूरध्वनी : +९१-११-२६७१ ७१२१- २६७१ ७१४५.

ई-मेल : amulya@nii.res.in

संकेतस्थळ : http://www.nii.res.in/

Story img Loader