नॅशनल मेटॅलर्जिकल लॅबोरेटरी, जमशेदपूर, झारखंड

ब्रिटिशकालीन भारतापासून ते अगदी आजपर्यंत औद्योगिकदृष्टय़ा महत्त्वाचे असलेले शहर म्हणजे जमशेदपूर. येथे तेवढय़ाच तोलामोलाची एक संशोधन संस्था कार्यरत आहे. नॅशनल मेटॅलर्जिकल लॅबोरेटरी म्हणजेच राष्ट्रीय धातुकर्म प्रयोगशाळा या संशोधन संस्थेची स्थापना १९४४ साली झाली. ही संस्था एनएमएल या नावानेदेखील ओळखली जाते. एनएमएल ही संशोधन संस्था आजघडीला धातुशास्त्र आणि धातू अभियांत्रिकी या विषयांतील संशोधन व शिक्षणक्षेत्रात कार्यरत असलेली अग्रगण्य प्रयोगशाळा आहे. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारित काम करणारी ही संस्था सीएसआयआरशीदेखील (वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद) संलग्न आहे.

संस्थेविषयी

नॅशनल मेटॅलर्जकिल लॅबोरेटरी ही भारतीय संशोधन विश्वातील एक अग्रगण्य संशोधन संस्था आहे. ही संस्था काऊन्सिल ऑफ सायंटिफिक अ‍ॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्चच्या (वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद) स्थापन झालेल्या संशोधन संस्थांपैकी तिसरी संशोधन संस्था आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात १९४४ मध्ये तत्कालीन सरकारने नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी आणि नॅशनल मेटॅलर्जकिल लॅबोरेटरी (एनएमएल) स्थापन करण्यासाठी एक कोटी रुपयांची (१४९०३७ अमेरिकन डॉलर्सची) तरतूद केली. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात उद्योग विकसित करण्याच्या हेतूने आणि औद्योगिक संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी, तसेच खासगी कंपन्यांना प्रोत्साहन म्हणून हे एक पाऊल उचलले गेले. तेव्हा टाटा ट्रस्टने एनएमएलला १.१७ दशलक्ष (यूएस द्द्र १७०००) दान देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर बरोबर एक वर्षांनंतर, सरकारच्या नियोजन आणि विकासाचे तत्कालीन सदस्य अर्देशीर दलाल यांनी एनएमएल हे संशोधन संस्था जमशेदपूरमध्ये स्थापित व्हावी यासंबंधी पाठपुरावा केला आणि त्यानंतर १९४६ मध्ये तत्कालीन नियमन मंडळाने एनएमएलसाठी जमशेदपूर या ठिकाणासहित प्रयोगशाळेची अंतिम योजना मंजूर केली. त्यानुसार, तत्कालीन ४.२८ दशलक्ष रुपये (यूएस द्द्र ६४०००) एवढय़ा प्रारंभिक भांडवली खर्चासह नॅशनल मेटॅलर्जिकल लॅबोरेटरी ही संशोधन संस्था अस्तित्वात आली. अमेरिकन धातू शास्त्रज्ञ डॉ. जॉर्ज सॅक्स यांची एनएमएलचे प्रथम संचालक म्हणून नेमणूक झाली.

संशोधनातील योगदान 

एनएमएल ही संस्था धातूशास्त्र व धातू अभियांत्रिकीमध्ये मूलभूत व उपयोजित संशोधन करणारी संस्था आहे. संस्थेकडे संशोधनातील अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध आहेत व संस्था सर्व प्रकारच्या उत्तम पायाभूत सुविधांसह सुसज्ज आहे. एनएमएल धातुशास्त्र, विज्ञानाच्या इतर शाखा व अभियांत्रिकीमध्ये इंटरडिसीप्लिनरी संशोधन करणारी देशातील एक महत्त्वाची संशोधन संस्था आहे. संस्थेमध्ये जास्तीत जास्त भर उपयोजित संशोधनावरतीच दिला जातो. यामुळेच संस्थेची सेवा घेणाऱ्या प्रमुख आस्थापनांमध्ये उद्योगक्षेत्र व देशांतर्गत व देशाबाहेरील संशोधन संस्थांचा यांचा समावेश आहे. संस्थेकडे क्रीप टेस्टिंग नावाची एक सुविधा उपलब्ध असून ती या प्रकारची भारतातील सर्वात मोठी व आशिया खंडातील एकमेव अशी सुविधा आहे. तसेच संस्थेची मटेरियल्स इव्हॅल्युएशन अ‍ॅण्ड कॅरॅक्टरायझेशन सुविधा ही या क्षेत्रातल्या इतर जागतिक दर्जाच्या संशोधन संस्थांबरोबर स्पर्धा करू शकेल अशा क्षमतेची आहे. संस्थेचे महत्त्वाचे संशोधन प्रामुख्याने मिनरल्स, मेटल्स अ‍ॅण्ड मटेरियल्स या विषयांवर होते. त्याबरोबरच एनएमएल मॅग्नेटिक मटेरियल्स, रॅपिडली सॉलिडीफाइड अ‍ॅलॉयज, सरफेस कोटिंग्ज, मेटॅलिक फोम्स, मेकॅनोकेमिकल अ‍ॅक्टिव्हेशन, सेमीसॉलिड प्रोसेसिंग, बायोमिमिक्री, थर्मोमेकॅनिकल ट्रीटमेंट, हाय टेंपरेचर सिंथेसिस, अ‍ॅडव्हान्स्ड जॉइनिंग, ग्रेन बाउंड्री इंजिनीअरिंग, हाय स्ट्रेन रेट फॉर्मिग या इतर विषयांमध्येही संशोधन करते.

विद्यार्थ्यांसाठी संधी

मेटॅलर्जकिलमधील संशोधनासाठी कुशल मनुष्यबळ मिळावे व संशोधनाच्या माध्यमातून धातू उद्योगाशी संबंधित असलेल्या समस्यांचे निराकरण व्हावे या उद्दिष्टाने संस्थेने आतापर्यंत धातुशास्त्राच्या अनेक विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवी बहाल केलेली आहे. संस्थेचे अनेक पीएच.डी. पदवीधारक भारतात व परदेशातदेखील संशोधन, औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत आहेत. एनएमएल ही संस्था आजसुद्धा देशातील विविध विद्यापीठांबरोबर संलग्न होऊन अनेक शैक्षणिक व संशोधन प्रकल्प राबवत आहे. भारतातील इतर संशोधन संस्थांसारखे या संस्थेमध्येही अ‍ॅकॅडमी ऑफ सायंटिफिक अ‍ॅण्ड इनोव्हेटिव्ह रिसर्च (अउरकफ) या प्रकल्पाच्या अंतर्गत पदव्युत्तर, पीएच.डी. व पोस्ट डॉक्टरल संशोधन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना पूर्ण करता येतात. एनएमएल देशातील व देशाबाहेरील अनेक विद्यापीठांशी पदव्युत्तर व पीएच.डी. अभ्यासक्रमांसाठी संलग्न आहे. विद्यापीठांमध्ये पीएच.डी.चे संशोधन करणारे अनेक विद्यार्थी संशोधनाचा विशिष्ट भाग अथवा माहिती संकलन किंवा माहिती प्रक्रिया इत्यादीसारख्या बाबी पूर्ण करण्यासाठी इथे ठरावीक काळ व्यतीत करत असतात. तसेच दरवर्षी सीएसआयआरच्या परीक्षांमधून गुणवत्ताप्राप्त अनेक जेआरएफ व एसआरएफ विद्यार्थी इथे पीएच.डी.चे संशोधन करण्यासाठी प्रवेश घेतात. या संशोधक विद्यार्थ्यांना देश-विदेशातील अनेक कार्यशाळांना पाठवून त्यांचे कार्य सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते.

संपर्क

नॅशनल मेटॅलर्जकिल लॅबोरेटरी,

गेट क्रमांक १,  टाटा स्टीलजवळ, बर्मा माइन्स

जमशेदपूर, झारखंड – ८३१००७ .

दूरध्वनी   – ०६५७- २३४ ५०२८.

संकेतस्थळ  – http://www.nmlindia.org/

itsprathamesh@gmail.com

Story img Loader