पूर्वीच्या काळी बाजारातून किंवा रेशनच्या दुकानातून तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी असं धान्य घरी आलं की ते निवडायचं मोठ्ठं काम असायचं. आधी चाळणीने चाळून घ्यायचं म्हणजे बारीक, मोठे खडे खाली पाडायचे. मग धान्य सुपात घ्यायचं. दोन हातांनी हलकेच धक्का देत पुढची मोठी लांब बाजू वर खाली करायची. धान्य उडय़ा मारायचं आणि हलकी सालपटं, टरफलं, भातकोटे पुढे जायचे. हाताने किंवा फुंकरीने ते काढून टाकले जायचे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘रति, जरा सूप आण गं दाणे पाखडायला,’’ लपाछपी खेळण्यात दंग असलेल्या रतिच्या कानांनी ‘सूप’ हा शब्द बरोबर टिपला. मस्त गरम गरम सूप प्यायला मिळणार या कल्पनेने चेहरा उजळलाही.
‘‘वेडाबाई, प्यायचं ‘सूप’ नाही, पाखडायचं सूप म्हणायचंय मला. स्वयंपाकघराच्या दाराच्या मागे खिळ्याला अडकवलंय बघ, आण जरा.’’
रतिने काहीतरी अँटिक पीस बघतोय या भावनेनं सूप हाताळलं आणि माझ्या पुढय़ात टाकत ती बाहेर पळाली.
..तर असं हे (जुनं की जुनाट) सूप, स्वयंपाकघरातील साधंसुधं उपकरण. वजनाला, किमतीला हलकं, विजेशिवाय, जास्त श्रमांशिवाय चालणारं, सहजतेने उद्दिष्ट पुरं करणारं, धान्याच्या साफसफाईला वाहून घेणारं. जेवणाच्या आधी प्यायच्या सुपाचा या ‘सुपाशी’ काहीही संबंध नाही. बदलत्या संस्कृतीमुळे इन्स्टंट सूप पॅकेटस्ची घरातली वाढती आवक, हॉटेलच्या मेनूकार्डात त्याला असलेला अग्रक्रम, ‘त्या’ जेवणाच्या स्टाईलशी नवीन पिढीशी जमलेली गट्टी, यामुळे सूप म्हटलं की प्यायचं सूपच उमलत्या पिढीच्या डोळ्यांसमोर तरळू लागतं. त्यातच भर पडली आकर्षक, आरोग्यपूर्ण तयार पिठांच्या पॅकेटस्ची. गहू, ज्वारी, बाजरी, डाळींनी ‘सरळ’ घरात न येता, गिरणीतून, कारखान्यातून, प्लॅस्टिकच्या पिशव्यांतून, रूप पालटून घरात यायला सुरुवात केली. साहजिकच कट्टी करत पाखडायच्या सुपाने घरातून काढता पाय घ्यायला सुरुवात केली. तरीही काही अपवादात्मक घरातून त्याचं आस्तित्व आजही ‘तग’ धरून आहे, पण प्रमाण अगदी नगण्य.
..तर असं हे सूप म्हणजे बुरूडकाम करणाऱ्या लोकांची खास कारागिरी. बांबूच्या साधारण १ सें.मी. रुंदीच्या दोन पातळ लांबलचक पट्टय़ा उभ्या-आडव्या एकमेकांत (बाजेसारख्या) विणून हे तयार केलं जातं. आपल्या घरातील केरभरणी असते ना तसा आकार, फक्त मोठी आवृत्ती (समलंब चौकोन). पुढच्या लांब बाजूला ओवलेली काठी, मागची बाजू ४/५ इंच उंच तर उरलेल्या दोन्ही बाजू, पुढच्या आडव्या बाजूला उतरत जाऊन मिळणाऱ्या तिन्ही बाजूंवर दोन-तीन जरा मोठय़ा एकदीड इंच रुंदीच्या बांबूच्या पट्टय़ांनी सलग दोन ठिकाणी वाकवत बांधलेला काठ. त्यामुळे मागच्या दोन्ही कोपऱ्यांत आलेला किंचित खोलगटपणा. सूप खूप दिवस टिकावं म्हणून घराला रंग देताना त्याला आवर्जून रंगाचा हात मारला जायचा. असं हे सूप खिळ्यावर दारामागे लपून बसायचं.
पूर्वीच्या काळी बाजारातून किंवा रेशनच्या दुकानातून तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी असं धान्य घरी आलं की ते निवडायचं मोठ्ठं काम असायचं. आधी चाळणीने चाळून घ्यायचं म्हणजे बारीक, मोठे खडे खाली पाडायचे. मग धान्य सुपात घ्यायचं. दोन हातांनी हलकेच धक्का देत पुढची मोठी लांब बाजू वर खाली करायची. धान्य उडय़ा मारायचं आणि हलकी सालपटं, टरफलं, भातकोटे पुढे जायचे. हाताने किंवा फुंकरीने ते काढून टाकले जायचे. जरा सूप आडवं हलवून धान्य घोळायचं आणि मग सुपाच्या एखाद्या कर्णावर जरा दुमडून पन्हळीसारखा आकार देत वरचं जरा उत्तम प्रतीचं धान्य निवडायला सोपं म्हणून वेगळं काढायचं. ज्याच्यात काढायचं त्या भांडय़ाचं तोंड जरी लहान असलं तरी काही अडचण येणार नाही. बांबूच्या पट्टय़ांमध्ये थोडी वाकायची इच्छा असते. सुपात मागे कोपऱ्यात राहिलेल्या धान्याचा ‘दाणा’ही जरा लहान असायचा. गणंग, निवड यात जास्त असायची. त्यामुळे हे काळजीपूर्वक निवडायला लागायचं. परंतु अशा पद्धतीने धान्य कमी वेळात, सोयीनं आणि चांगल्या प्रकाराने पाखडलं जाऊन साफ केलं जायचं. शेंगदाण्याची सालं पाखडायला सुपासारखं दुसरं साधन नाही. राजगिऱ्याच्या लाह्य़ा फोडल्या की गणंग किंवा न फुटलेला राजगिरा सुपात कोपऱ्यात राहतो. पिवळट, पांढरट हलक्याफुलक्या लाह्य़ा झरझर खाली उडय़ा मारतात. ज्याने या उपकरणाचा शोध लावला असेल त्याला धन्यवाद द्यायला हवेत. कामाचा निपटा होतोच शिवाय हाताचे सांधे व्यायाम घडल्याने कुरकुरत नाहीत.
आजकाल निवडलेलं धान्यच मिळतं. वाणी लगेच चाळण मारून सामान पाठवतो. त्यामुळे लगेच गिरणीची वाट पकडली जाते. याच्यापेक्षा सोपा पर्याय म्हणून पीठच घरी येतं. ‘पोळ्या गव्हाच्या करत नाहीत, पिठाच्या करतात’ असा बालमनाचा समज होतो. कारण गहू कधी बघायलाच मिळत नाही. दाण्याचं कूटही तयार मिळतं. त्यामुळे दाणे भाजणं, सोलणं, पाखडणं यावर फुलीच. तापलेल्या कढईत मूठमूठ राजगिरा टाकून गोल गोल फडकं फिरवत त्याच्या लाह्य़ा फुटताना बघण्यातली गंमत आणि ‘लाह्य़ा फुटणं’ हा वाक्प्रचार कळणार तरी कसा? त्यामुळे सुपाला विश्रांतीचे दिवस आले आहेत. घरातली त्याची लुडबूड कमी झाली असली तरी शेतातली पिकांची मळणी झाली की वाखणीची भिस्त अजून तरी त्याच्यावर आहे.
‘सार सार को गही रहे थोथा देई उडाय’ असा संत कबीरांनी सुपाच्या कार्याचा गौरव केला आहे. म्हणजेच जणू सत्त्व जवळ करायचं आणि नि:सत्त्व बाजूला सारायचं. सगुणांना प्राधान्य देऊन अवगुण दूर करायचे. अशा शुभ करणाऱ्या, चांगल्या मनोवृत्तीचे हे प्रतीक. याच कारणास्तव वैदिक कार्यात, लग्नमुंजीत देवक ठेवताना, लहानग्यांची ‘शांत’ करताना सूप वापरत असावेत असं वाटतं. बाळाला सुपात ठेऊन गाईपुढे हुंगायला ठेवतात. दळणाच्या वेळी जात्याच्या जवळ बसून ‘दाण्यांना’ हसवत ठेवायचं काम इमानेइतबारे मोठय़ा मनाच्या सुपाने निभावलं आहे.
झुरळं होतात म्हणून उरल्यासुरल्या बांबूच्या सुपांच्या आस्तित्वावर गदा आली आहे. अल्युमिनियमची टिकाऊ सुपं ‘बदली कामगार’ म्हणून घरांत टिकून राहण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. मंगळागौरीच्या खेळात भाग घेऊन ‘नाच गं घुमा’ म्हणत हातातून नाचायचं मात्र सुपांनी सोडलेलं नाही. काही जणी पूर्वा नक्षत्रावर श्रद्धेने ‘ओसा’ (वाणवसा) देण्याच्या कामी सुपाला आठवणीने सहभागी करून घेतात. त्यावेळी रंगीत कापड, झालर, लेस लावून नट्टापट्टा करत त्याला ‘सेलिब्रेटीज’चा दर्जा देतात. ‘सुपासारखे कान याचे, दिसतो किती छान’ असं ज्याचं रूप त्या गणपती बाप्पाने सुपासारखा आकार कानांना देऊन सुपाच्या चांगलेपणाचा गौरवच केला आहे. पाखडून कचरा बाहेर टाकणं हे सुपाचं विहित कर्म; मग रागाने अपशब्दांचा कचरा तोंडातून बाहेर पडू लागला की ‘आगपाखड’ म्हणत नेमकं वर्मावर बोट ठेवलं जातं. लग्नाची धामधूम आटोपली की सूप वाजतंच. सुपासारखं काळीज केलं तरी सुपाचं सूप वाजायचं थोडंच राहाणार आहे.