ओपन सोर्स ड्रग डिस्कव्हरी इनिशिएटिव्ह, नवी दिल्ली

प्रथमेश आडविलकर itsprathamesh@gmail.com

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) देशभरात ठिकठिकाणी अनेक संशोधन संस्था आहेत. सीएसआयआरच्या या संस्थांबरोबरच सीएसआयआरचे काही स्वतंत्र संशोधन गटदेखील आहेत. संशोधन गट म्हणून कार्यरत असलेल्या या संस्थांना सीएसआयआर रिसर्च युनिट म्हणून संबोधले जाते. देशात विविध ठिकाणी हे संशोधन गट आहेत. त्यांपैकी एक महत्त्वाचा संशोधन गट म्हणजे ओपन सोर्स ड्रग डिस्कव्हरी इनिशिएटिव्ह. नवी दिल्लीमध्ये हा गट स्वतंत्रपणे संशोधन करीत आहे.

 संस्थेविषयी

ओपन सोर्स ड्रग डिस्कव्हरी इनिशिएटिव्ह (ओएसडीडी) हा सीएसआयआरच्या आधिपत्याखालील आरोग्य सेवांसंबंधी संशोधन करणारा देशातील एक महत्त्वाचा आणि प्रमुख संशोधन गट आहे. ही संस्था सीएसआयआरच्या अकराव्या पंचवार्षिक योजनेचा प्रकल्प म्हणून प्रा. डॉ. समीर ब्रह्मचारी यांच्या कल्पनेतून आकाराला आली. डॉ. ब्रह्मचारी म्हणजे तत्कालीन इन्स्टिटय़ूट ऑफ जिनॉमिक्स अ‍ॅण्ड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी (आयजीआयबी) संस्थेचे संस्थापक संचालक आणि नंतर सीएसआयआरचे महासंचालक म्हणून नियुक्ती झालेले ज्येष्ठ संशोधक. भारत सरकारने सुमारे बारा दशलक्ष अमेरिकन डॉलर्स मंजूर करून संस्थेच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतला. अविकसित आणि विकसनशील देशांना ओएसडीडी या एका सामायिक व्यासपीठाद्वारे जागतिक मंच उपलब्ध करून देऊन स्वस्त आरोग्य पुरवणे या हेतूने संस्थेची स्थापना झालेली आहे. संस्थेने आरोग्य सेवांसंबंधित आवश्यक क्षेत्रातील सर्वोत्तम मनुष्यबळ एकत्रित करून समोर असलेल्या जटिल समस्यांचे निराकरण करण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याच्या दृष्टिकोनातून आपले संशोधन कार्य चालू ठेवलेले आहे. या समस्यांमध्ये मग टय़ूबरक्युलोसिस, मलेरिया, लीशमॅनियास इत्यादींसारख्या दुर्लक्षित उष्णकटिबंधीय आजारांवर उपचार यांसारख्या नानाविध गोष्टींचा समावेश आहे. जगभरातल्या जवळपास १३० देशांमधील संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी, तंत्रज्ञ व उद्योजक यांसारखे साडेसात हजारपेक्षा अधिक मनुष्यबळ संस्थेच्या संशोधन कार्यक्रमाशी संलग्न आहे. या संशोधन प्रकल्पाचे ब्रीदवाक्य ‘सर्वासाठी परवडणारी आरोग्य सेवा’ असे आहे. संस्था ओपन सोर्स म्हणजेच मुक्त स्रोत आणि सहकार्यातून संशोधन या संकल्पनेवर चालते. संस्थेने नावीन्याला उत्तेजन देत संशोधक समुदायाद्वारे तयार केलेली सर्व माहिती (डेटा) आणि स्रोत खुलेपणाने र८२ु१ॠ 2.0 या नावाच्या वेब पोर्टलद्वारे उपलब्ध करून दिलेले आहेत.

संशोधनातील योगदान –

ओएसडीडी ही सोर्स ड्रग डिस्कव्हरी म्हणजेच पूर्णपणे नवीन औषधांचे संशोधन करणारी संस्था आहे. या संशोधनाबरोबरच संस्थेने आंतरविद्याशाखीय संशोधनाला (Interdisciplinary research) प्राधान्य देत इतर शाखांमधील मूलभूत संशोधनाशी योग्य समन्वय साधलेला आहे. त्यामुळेच ओएसडीडीने आपल्या संशोधनाच्या माध्यमातून अनेक उत्पादने आणि प्रक्रिया (प्रोडक्ट्स अ‍ॅण्ड प्रोसेसेस) विकसित केलेल्या आहेत. त्यापैकी अनेक औषधी उत्पादनांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवले गेले आहे. संस्थेने अनेक पेटंट्स दाखल केले आहेत. ओएसडीडीच्या माध्यमातून सध्या सुमारे ११० संशोधन प्रकल्प राबवले जात आहेत. विविध विभागांतील शास्त्रज्ञांच्या सहकार्याने एम.टय़ूबरक्युलोसिससाठी साठपेक्षा जास्त संभाव्य औषधे शोधलेली आहेत. ओएसडीडीने आपला प्रथम आंतरराष्ट्रीय शोधनिबंध २००९ साली प्रकाशित केला होता. हा शोधनिबंध इंटिग्रेटिव्ह जिनॉमिक्स ऑफ एम.टय़ूबरक्युलोसिस या विषयावर होता. तेव्हापासून ओएसडीडीने याच विषयावर दीर्घ संशोधन करून बारा आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रकाशित केलेले आहेत.

ओपन सोर्स मॉडेलचे यश उदाहरणार्थ, माहिती तंत्रज्ञानामधील वेब टेक्नॉलॉजी, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम आणि बायोटेक्नॉलॉजीमधील ह्युमन जीनोम सिक्वेन्सिंग इत्यादी गोष्टी या आरोग्य सेवेमध्ये ओपन सोर्स मॉडेलसारखे एखादे मॉडेल सुरू करणे अत्यावश्यक आहे याची साक्ष देते. ओएसडीडीने आपले संशोधन सध्या टीबी आणि मलेरियासाठी नव्या औषधांच्या शोधावर केंद्रित केले आहे. ओएसडीडी वैज्ञानिकांना उपलब्ध असलेली जैविक, आनुवांशिक आणि रासायनिक माहिती एकत्रित करून संस्थेतील वैज्ञानिक, डॉक्टर, टेक्नोक्रॅट्स, विद्यार्थी आणि विविध तांत्रिक कर्मचारी यांच्या सांघिक सहकार्याने नव्या औषधाचा शोध लावला जातो.

 विद्यार्थ्यांसाठी संधी

सीएसआयआरच्या तत्त्वप्रणालीनुसार ओएसडीडी व संलग्न विविध विद्यापीठे व संशोधन संस्थांच्या साहाय्याने Academy of Scientific & Innovative Research (AcSIR) च्या अंतर्गत पदव्युत्तर, पीएचडी व पोस्ट डॉक्टरल संशोधन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना पूर्ण करता येतात. संस्था सध्या ओएसडीडी केमिस्ट्री आऊटरीच प्रोग्राम (ओएसडीडीकेम) नावाचा एक अभ्यासक्रम रसायनशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी चालवते आहे. या अभ्यासक्रम प्रणालीअंतर्गत विद्यार्थ्यांना सिंथेटिक केमिस्ट्रीमध्ये संशोधन प्रशिक्षण दिले जाते. तसेच देशातील अनेक विद्यापीठे, शैक्षणिक संस्था आणि महाविद्यालयांमधील संश्लेषित संयुगे ओएसडीडीकडे डेटाबेसला पाठविली जातात. दरवर्षी गुणवत्ता मिळवलेले अनेक जेआरएफ वा एसआरएफ विद्यार्थी ओएसडीडीमध्ये पीएचडीचे संशोधन करण्यासाठी प्रवेश घेतात.

 संपर्क 

ओपन सोर्स ड्रग डिस्कव्हरी इनिशिएटिव्ह,

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर),

अनुसंधान भवन, २ रफी मार्ग,

नवी दिल्ली – ११०००१.

ई-मेल –  info@osdd.net

दूरध्वनी – +९१-३४३-२५४६४०१.

संकेतस्थळ – http://www.osdd.net/

Story img Loader