भारतीय विमा क्षेत्राचा इतिहास शोधला तर त्याची पाळंमुळं मनुस्मृती आणि वेद, उपनिषदांपर्यंत खोलवर गेलेली आढळतात. भारतीय विमा क्षेत्र जीवन विमा, सर्वसाधारण विमा, आरोग्य विमा या तीनही शाखांत किमान १५% CAGR वेगाने प्रगती करत आहे. विमा क्षेत्राच्या खासगीकरणानंतर या क्षेत्राने गरुडझेप घेत लाखो रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. स्वयंरोजगार, व्यापार तसेच नोकरी अशा तीनही सुवर्णसंधीतून विमा क्षेत्र तरुण पदवीधर, अनुभवी निवृत्त, सुशिक्षित गृहिणींना उत्पन्न मिळवून देऊ शकते. Confederation of Indian Industry च्या नवीन निरीक्षणांनुसार २०२१ पर्यंत किमान २० लाख मनुष्यबळाची आवश्यकता विमा क्षेत्राला आहे. भारतीय विमा क्षेत्रात आज प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या ५० लाख मनुष्यबळ कार्यरत आहे. पहिल्या दहा मानांकित रोजगार संधीमध्ये विमा क्षेत्राचा उल्लेख होतो. २०१६ साली जागतिक बाजारपेठेत भारतीय विमा क्षेत्र अत्यंत वेगाने वाढणारे तसेच प्रचंड संभाव्य प्रगती करू शकणारे फायदेशीर क्षेत्र ठरले आहे. २०२० साली विमा ग्राहकांची संभाव्य लोकसंख्या ७५कोटींच्या घरात असताना प्रचंड मोठय़ा प्रमाणात मागणी निर्माण होणार आहे.
विमा विपणन म्हणजेच Marketing वेगवेगळ्या माध्यमांतून होते. त्यामुळे बँका, मोठय़ा खासगी कंपन्या, कौटुंबिक आíथक नियोजनकार, ब्रोकर, विमा एजंट, डिजिटल सल्लागार तसेच ग्राहकाभिमुख सेवा कर्मचारी यांची सातत्याने मागणी वाढत आहे. नोकरी-धंद्याच्या दृष्टीने विमा क्षेत्रात ३० लाख मनुष्यबळाची आवश्यकता पुढील दशकांत निर्माण होणार आहे.
विमा क्षेत्राशी निगडित व्यावसायिक अभ्यासक्रमात बऱ्याच शाखांचा समावेश होतो. अॅक्च्युरिअल सायन्स, लेखा परीक्षक, कायदेतज्ज्ञ, वैद्यकीयतज्ज्ञ, जोखीम व्यवस्थापक, भागभांडवल क्षेत्रातील सल्लागार, मनुष्यबळ विकासतज्ज्ञ, मार्केटिंग, जाहिराततज्ज्ञ, अंडररायटर्स, संगणकतज्ज्ञ, व्यवस्थापनतज्ज्ञ, कॉल सेंटरमधील दूरध्वनीद्वारे ग्राहकसेवा पुरवणारे व्यावसायिक असे विविध अभ्यासक्रमांतील व्यावसायिक विमा क्षेत्रास संलग्न सेवा पुरवू शकतात. या विविध शाखांतील व्यावसायिकांना केवळ विमा क्षेत्राशी निगडित माहिती व तंत्रज्ञान पुरवण्यासाठी, प्रत्येक कौशल्यात निपुण होण्यासाठी अव्याहत प्रशिक्षणाची गरज असते, त्यामुळे विमा क्षेत्रात प्रशिक्षकाची म्हणजेच ट्रेनर्सची कायमस्वरूपी मागणी असते.
सेवा क्षेत्रात निपुण व्यावसायिक होण्यासाठी संभाषणकौशल्याशिवाय सहसंवेदना, जिज्ञासूवृत्ती आणि लोकाभिमुख सेवांकरता लागणारी सबुरी, न कंटाळता तटस्थपणे दुसऱ्याचे ऐकून घेणे अशा विशेष कौशल्यांत पारंगत असावे लागते. या व्यावसायिक कौशल्यांचा व्यक्तिमत्त्व विकासात मोलाचा वाटा ठरतो. यशस्वी आयुष्यासाठी दूरगामी नियोजनाची गरज असते, त्यामुळे विमा क्षेत्रात दूरदर्शीपणे काम करणे, दीर्घ मुदतीत फायदेशीर ठरते.
विमा क्षेत्राशी निगडित अभ्यासक्रम –
१) बीकॉम मुंबई विद्यापीठ(स्पेशलायझेशन बँकिंग आणि इन्शुरन्स-३ वर्षे कालावधी.)
२) व्यवसाय व्यवस्थापनातील पदव्युत्तर अभ्यासक्रम स्पेशलायझेशन इन्शुरन्स – नॅशनल इन्शुरन्स अकॅडमी, पुणे Z(http://www.niapune.org.in/)
३) इन्शुरन्स इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाच्या लायसेन्शिएट / असोसिएट्स / फेलोशिप परीक्षा (https://www.insuranceinstituteofindia.com)
४) आयआयआरएम- इन्स्टिटय़ूट ऑफ इन्शुरन्स अँड रिस्क मॅनेजमेंट २ वर्षे कालावधीचा पदव्युत्तर अभ्यासक्रम. डिप्लोमा इन इन्शुरन्स (१ वर्षे कालावधी)
५) एफपीएसबी इंडिया, सीएफपी सर्टिफिकेशन (१ वर्षे कालावधी)
लेखिका सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर आहेत.
भक्ती रसाळ mfplanner2016@gmail.com