इंग्लंडमधील ‘शेफील्ड हॅलम विद्यापीठा’कडून सर्व विद्याशाखांमधील विविध विषयांतील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ  इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘ट्रान्सफॉर्म टुगेदर स्कॉलरशिप’ या शिष्यवृत्ती कार्यक्रमाच्या माध्यमातून शिष्यवृत्ती दिली जाते. याअंतर्गत दरवर्षीप्रमाणे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. शेफिल्ड हॅलम विद्यापीठामध्ये प्रवेश व त्यासहित शिष्यवृत्तीचे लाभ असे या शिष्यवृत्तीचे स्वरूप आहे.

शिष्यवृत्तीविषयी –

इंग्लंडमधील साऊथ यॉर्कशायरमध्ये असलेल्या शेफिल्ड महानगरात, शेफिल्ड हॅलम विद्यापीठ (रऌव) वसलेले आहे. क्षेत्रफळाने भरपूर मोठय़ा असलेल्या या विद्यापीठात बहुविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. राष्ट्रीय क्रमवारीत ९१ व्या क्रमांकावर असलेल्या या विद्यापीठाची जागतिक क्रमवारी अलीकडील काही वर्षांत घसरलेली आहे. या विद्यापीठात कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, व्यवस्थापन, पर्यटन, पर्यावरण, कायदा, स्थापत्यशास्त्र, मानववंशशास्त्र, यांसारख्या शाखांपासून ते जैवविज्ञान, रेडिओग्राफी, ऑक्युपेशनल थेरपी, पॅरामेडिकल विज्ञान यांसारख्या आरोग्य विज्ञान शाखेमधील नानाविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त विद्यापीठाची तीस संशोधन केंद्रे स्वतंत्रपणे कार्यरत आहेत.

शेफिल्ड हॅलम विद्यापीठाकडून दरवर्षी ‘ट्रान्सफॉर्म टुगेदर स्कॉलरशिप’ या शिष्यवृत्ती कार्यक्रमाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाचे शिक्षण शुल्क कमी व्हावे व दरम्यानचे परदेशातील वास्तव्य ताणरहित व्हावे या हेतूने ही शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्ती कार्यक्रमाअंतर्गत आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना २०१७-१८ या शैक्षणिक वर्षांतील विषयांतील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती बहाल केली जाते.   शिष्यवृत्तीचा एकूण कालावधी पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या कालावधीएवढा असेल. शिष्यवृत्तीधारकाला दिलेल्या मर्यादित कालावधीतच त्याला त्याचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल. शिष्यवृत्तीअंतर्गत या कालावधीदरम्यान शिष्यवृत्तीधारकाला त्याच्या अभ्यासक्रमाचे अर्धे शिक्षण शुल्क दिले जाईल. याव्यतिरिक्त त्याला किमान आवश्यक सुविधा दिल्या जातील.

आवश्यक अर्हता –

ही शिष्यवृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे. अर्जदार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा. अर्जदाराची शैक्षणिक पाश्र्वभूमी उत्तम असावी. तो अर्ज करू इच्छित असलेल्या अभ्यासक्रमाबद्दल अधिक माहिती त्याने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाऊन मिळवावी. विद्यापीठाने प्रत्येक विषयानुसार किमान आवश्यक गुण ठरवले आहेत. अर्जदाराने आपल्या अगोदरच्या शैक्षणिक पातळीवर किमान तेवढे गुण मिळवलेले असावेत. अर्जदाराचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे.

आयईएलटीएस किंवा टोफेल या इंग्रजीच्या परीक्षांपैकी कोणत्याही एका परीक्षेमध्ये अर्जदाराला किमान आवश्यक बँडस् किंवा गुण मिळालेले असावेत. अर्जदाराचा सीव्ही अतिशय उत्तम असावा. त्याच्याकडे जर कार्यानुभव असेल तर त्याने तो तसा त्याच्या एसओपी व सीव्हीमध्ये नमूद करावा. तसेच या शिष्यवृत्तीच्या अर्जप्रक्रियेला पात्र होण्यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम शेफिल्ड हॅलम विद्यापीठातील त्याला हव्या असलेल्या पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अर्ज करावयाचा आहे. त्याने अभ्यासक्रमासाठी एकदा अर्ज केला की मग आपोआपच या शिष्यवृत्तीसाठीही अर्ज केला, असे गृहीत धरण्यात येईल.

अर्ज प्रक्रिया –

या शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराला सर्वप्रथम शेफिल्ड हॅलम विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जावे लागेल. त्यानंतर त्याला ज्या अभ्यासक्रमासाठी अर्ज करायचा आहे, त्या अभ्यासक्रमाचा अर्ज ऑनलाइन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून यादीमध्ये दिलेल्या कागदपत्रांच्या सॉफ्ट प्रतींसह संकेतस्थळावरच जमा करायचा आहे. अर्जासह अर्जदाराने त्याचे एसओपी, सीव्ही, आतापर्यंतच्या सर्व शैक्षणिक ट्रान्सस्क्रिप्ट्सच्या अधिकृत प्रती, आयईएलटीएस किंवा टोफेल यापैकी आवश्यक परीक्षांचे गुण, कार्यानुभवाचे प्रशस्तिपत्र (असेल तर) इत्यादी गोष्टी जोडाव्यात. शिफारसपत्रांसाठी मात्र अर्जदाराने त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीशी संबंधित असलेल्या दोन प्राध्यापकांचे ई-मेल अर्जामध्ये नमूद करावेत. विद्यापीठ स्वतंत्रपणे संबंधित प्राध्यापकांना संपर्क करून शिफारसपत्र देण्यासाठी विनंती करेल.  लवकर अर्ज करणाऱ्या अर्जदारांना प्रवेश मिळण्याची शक्यता नेहमीच अधिक असते. त्यामुळे अर्थातच शिष्यवृत्तीसाठी त्यांचा अर्ज लवकर तपासाला जाऊ  शकतो. हे समीकरण लक्षात घेऊन अर्जदाराने लवकरात लवकर त्याचा अर्ज पूर्ण करून जमा करावा.

निवड प्रक्रिया –

अर्जदाराची गुणवत्ता लक्षात घेऊन त्याच्या अर्जाची तपासणी केली जाईल. तपासणीमधून गुणवत्तेनुसार निवडक विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात येईल. समितीचा निर्णय अंतिम राहील. अंतिम निवड झालेल्या अर्जदारांना त्यांच्या निवडीबाबत कळवले जाईल.

उपयुक्त संकेतस्थळ –

https://www.shu.ac.uk/

अंतिम मुदत –

या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. १ नोव्हेंबर २०१७

itsprathamesh@gmail.com