प्राण्यांची आवड असणाऱ्यांसाठी पेट ग्रूमिंग हे एक छान क्षेत्र म्हणता येईल. ‘पेट ग्रूमर्स’ काय करतात? याचा विचार करायचा झाल्यास, थोडक्यात सांगायचं तर प्राणी सुंदर दिसावेत म्हणून विविध प्रयत्न पेट ग्रूमर्स करतात. त्याचबरोबर प्राण्यांची काळजी घेणे, स्वच्छता हीदेखील ग्रूमर्सची जबाबदारी असते. कुत्र्यांना आंघोळ घालणे, केस कापणे, केसांच्या स्टाइल्स करणे, नखे कापणे, गरज असल्यास मसाज करणे, स्पा, प्राण्यांच्या त्वचेची निगा राखणे अशी कामे ग्रूमर्स करतात. म्हणजेच माणसांसाठी जसे ब्यूटी पार्लर, स्पा असते तशा सुविधा प्राण्यांना देण्याचे काम म्हणजे ग्रूमिंग. ऐच्छिक कालावधीसाठी काम करण्याची मुभा, कमी भांडवलावर व्यवसायाची सुरुवात करता येणे ही या क्षेत्राची बलस्थाने आहेत.
पात्रता – ठरावीक शैक्षणिक पात्रता या क्षेत्रासाठी नाही. मात्र कुत्रे किंवा मांजरांच्या प्रजाती, स्वभाव वैशिष्टय़े, शरीररचना, प्राथमिक वैद्यकीय माहिती असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर संयम आणि एका जागी खूप वेळ उभे राहून काम करण्याची क्षमताही गरजेची आहे.
संस्था – परदेशात पेट ग्रूमिंगचे प्रशिक्षण अनेक विद्यापीठ आणि संस्थांमधून दिले जाते. इंग्लंडमधील हॅडलो कॉलेज, ऑस्टेलियन स्कूल ऑफ पेटकेअर स्टडीज येथे पदविका अभ्यासक्रम आहेत. एसीएस डिस्टंस एज्युकेशन, नॅशनल असोसिएशन ऑफ प्रोफेशनल पेट सिटर्स या संस्था ऑनलाइन अभ्यासक्रम चालवतात.
भारतात काही खासगी संस्था या विषयाचे प्रशिक्षण देतात.
बंगळुरू येथील फुझी-वुझी हे स्पा याचे प्रशिक्षण देते
पत्ता – फुझी-वुझी,
६७० सीएमएच रस्ता, बंगळुरू
ईमेल – info@fuzzywuzzy.in
संकेतस्थळ http://www.fuzzywuzzy.in
दिल्ली येथील स्कूबी स्क्रब ही संस्था प्रशिक्षण वर्ग चालवते. बेसिक आणि अॅडव्हान्स असे दोन स्तरात हे प्रशिक्षण दिले जाते. या संस्थेच्या पुण्यासह देशात १९ शाखा आहेत
ईमेल – info@scoopyscrub.com
संकेतस्थळ – scoopyscrub.com
संधी कुठे?
पेट बोर्डिग म्हणजे प्राणी ठरावीक कालावधीसाठी ठेवण्यात येतात असे आश्रम, पशूवैद्य, पेट स्पा किंवा पार्लर्स, प्राण्यांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था या ठिकाणी कामाची संधी मिळू शकते. त्याचप्रमाणे स्वत:चे स्पा सुरू करणे, फिरते पार्लर सुरू करणे, घरोघरी जाऊन सेवा देणे अशा प्रकारे स्वत:चे व्यवसायही करता येऊ शकतात. साधारण १० हजार ते ५० हजारांपर्यंत उत्पन्न मिळू शकते.