कॅनडा सरकारकडून व्हेनियर कॅनडा पदवी शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत पीएच.डी. अभ्यासक्रमाचे संशोधन पूर्ण करण्यासाठी ही शिष्यवृत्ती देण्यात येते. कॅनडातील कोणत्याही विद्यापीठामध्ये आपले उच्चशिक्षण पूर्ण करणाऱ्या अर्जदाराला तीन वर्षांसाठी ती मिळू शकते. मूलभूत विज्ञान, कला शाखेतील विविध विषय, सामाजिक शास्त्रे, पर्यावरण, मानववंशशास्त्र, अभियांत्रिकी व वैद्यकीय आदी विषयांतील संशोधन करण्यासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. २०१७ मधील पीएच.डी.च्या शिष्यवृत्तीसाठी वर उल्लेखिलेल्या विषयांमध्ये किंवा विषयांशी संबंधित पदव्युत्तर पदवी असणाऱ्या अर्जदारांकडून दि. २ नोव्हेंबर २०१६ पूर्वी  अर्ज मागवण्यात आले आहेत.

आवश्यक अर्हता

ही शिष्यवृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे. अर्जदाराला कॅनडामधील कोणत्याही एका विद्यापीठामध्ये पीएच.डी.साठी प्रवेश मिळालेला असावा. अर्जदाराकडे तो ज्या विषयात पीएच.डी. करणार असेल त्या विषयातील किंवा त्या विषयाशी संबंधित पदव्युत्तर पदवी असावी. अर्जदाराची पदवी व पदव्युत्तर स्तरावर शैक्षणिक पाश्र्वभूमी अतिशय उत्तम असावी. अर्जदाराकडे संबंधित क्षेत्रातील संशोधन अनुभव असावा. एवढेच नव्हे, तर त्याच्याकडे त्याच्या विषयाच्या संशोधनातील नावीन्यपूर्ण अशा कल्पना असाव्यात. संस्थेने या शिष्यवृत्तीच्या प्रवेशासाठी हा एक प्रमुख निकष ठेवलेला आहे. अर्जदाराने संशोधनातील अनुभवाचे प्रशस्तीपत्र जोडावे. पीएच.डी.चा संपूर्ण अभ्यासक्रम हा इंग्रजीमध्ये असून अर्जदाराकडे इंग्रजीचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे. त्याचे इंग्रजीवरील प्रभुत्व अर्थातच त्याच्या टोफेल किंवा आयईएलटीएसच्या गुणांवरून ठरवले जाईल. आंतरराष्ट्रीय अर्जदारांनी टोफेल किंवा आयईएलटीएसपैकी एक परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण असावे. संस्थेच्या या पीएच.डी. कार्यक्रमास अर्ज करण्यासाठी वयाची कोणतीही अट नाही.

शिष्यवृत्तीबद्दल

जागतिक दर्जाची बुद्धिमत्ता आपल्या देशाकडे आकर्षित व्हावी आणि त्या माध्यमातून अध्यापन-संशोधन व उच्चशिक्षणातील एक प्रमुख आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून जगासमोर यावे या हेतूने कॅनडा सरकारकडून व्हेनियर कॅनडा पदवी शिष्यवृत्ती कार्यक्रम २००८ पासून राबवला जातो. ही शिष्यवृत्ती सामाजिक शास्त्रे, मानववंशशास्त्र, मूलभूत विज्ञान,अभियांत्रिकी व वैद्यकीय या विद्याशाखांमधील सर्व विषयांसाठी दिली जाते. या सर्व क्षेत्रांमधील जागतिक तोडीची विद्वत्ता गेल्या काही वर्षांमध्ये तयार होण्याचे श्रेय या शिष्यवृत्तीलाही द्यावे लागेल. या शिष्यवृत्तीअंतर्गत शिष्यवृत्तीधारकाला पीएच.डी.च्या संशोधनातील तीन वर्षांच्या

कालावधीसाठी शिष्यवृत्ती बहाल

करण्यात येईल. शिष्यवृत्तीधारकाला विद्यापीठाकडून या तीन वर्षांसाठी सुमारे ५०,००० कॅनेडीयन डॉलर्स एवढे वार्षिक विद्यावेतन दिले जाईल. तसेच पीएच.डी.च्या या कालावधीकरिता संपूर्ण शिक्षण शुल्क त्याला दिले जाईल. याव्यतिरिक्त त्याला विमाभत्ता, प्रवासभत्ता व संशोधनासाठीची अनुदानित रक्कम यांसारख्या इतर सर्व सुविधा देण्यात येतील. शिष्यवृत्तीधारकाने शक्यतो दिलेल्या मर्यादित कालावधीतच त्याचे संशोधन पूर्ण करून पदवी घेणे योग्य राहील. शिष्यवृत्तीधारकाला ही शिष्यवृत्ती पीएच.डी.च्या संशोधन अभ्यासक्रमासाठी उपलब्ध असेल व अंतिमत: त्याला पीएच.डी. पूर्ण करणे बंधनकारक राहील. यावर्षी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तींची एकूण संख्या १६७ एवढी आहे.

अर्ज प्रक्रिया

या शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराने अर्ज विहित नमुन्यात ऑनलाइन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून दुव्यामध्ये दिलेल्या विद्यापीठाच्या वेबसाइटवर अंतिम मुदतीपूर्वी जमा करावा. अर्ज जमा करताना अर्जदाराने अर्जाबरोबर त्याचे टोफेल किंवा आयईएलटीएस या दोन्हींपैकी कोणत्याही एका परीक्षेत मिळवलेले गुण किंवा बॅण्डस, त्याचे एस.ओ.पी., त्याचा सी.व्ही., लघु संशोधन अहवाल, प्रकाशित केला असल्यास शोधनिबंधांच्या प्रती, तज्ज्ञांची शिफारसपत्रे, ट्रान्सक्रिप्टस व कार्य अनुभवाचे प्रशस्तीपत्र इत्यादी गोष्टी जोडाव्यात. याबरोबरच, अर्जदाराने पूर्ण झालेल्या अर्जाची प्रिंट घेऊन त्याबरोबर वरील सर्व कागदपत्रांच्या प्रती स्वतंत्रपणे विद्यापीठाकडे पोस्टाने किंवा आंतरराष्ट्रीय कुरिअर सेवेने जमा करावीत.

निवड प्रक्रिया

अर्जदाराची त्याच्या विषयातील गुणवत्ता व संशोधनातील पाश्र्वभूमी लक्षात घेऊन निवड समितीकडून त्याची अंतिम निवड करण्यात येईल. अंतिम निवड झालेल्या अर्जदारांना त्यांच्या निवडीबाबत ई-मेलने कळवले जाईल.

महत्त्वाचा दुवा

http://www.vanier.gc.ca

अंतिम मुदत

या शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. २ नोव्हेंबर २०१६ आहे.

itsprathamesh@gmail.com

Story img Loader