कॅनडामधील एक प्रमुख संशोधन केंद्र व महत्त्वाचे विद्यापीठ असलेल्या अल्बर्टा विद्यापीठाकडून वेगवेगळ्या विषयांतील पदव्युत्तर पदवी ग्रहण केलेल्या आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून पुढे त्या विषयांत पीएच.डी. करण्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. जानेवारी २०१७ मध्ये सुरू होणाऱ्या हिवाळी सेमिस्टरमधील पीएच.डी. अभ्यासक्रमांसाठी ही शिष्यवृत्ती असून अर्जदारांना यासाठी १ नोव्हेंबर २०१६ पूर्वी अर्ज सदर करायचा आहे.
शिष्यवृत्तीविषयी
कॅनडामधील युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टा हे जगातल्या पहिल्या नामांकित शंभर तर देशातल्या पहिल्या पाच विद्यापीठांपैकी एक आहे. १९०८ मध्ये स्थापन झालेले हे शासकीय विद्यापीठ पश्चिम प्रांतातील अल्बर्टा राज्याच्या राजधानीत म्हणजे एडमंटन या शहरात क्षेत्रफळाने मोठय़ा भूभागावर वसलेले आहे. एडमंटनमध्ये विद्यापीठाचे चार कॅम्पस आहेत, ज्यामध्ये दीडशे देशांमधील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसह जवळपास चाळीस हजार विद्यार्थी वेगवेगळ्या एकूण चारशे विद्याशाखांमध्ये आपले शिक्षण घेत आहेत. एवढी मोठी विद्यार्थीसंख्या व तीन हजार प्राध्यापक वर्गासह असलेला एकूण पाच हजारांच्या घरात जाणारा विद्यापीठाचा सर्व कर्मचारी वर्ग विद्यापीठाची व्यापकता अधोरेखित करतो.
अल्बर्टा विद्यापीठ हे कॅनडातील सर्वात मोठे संशोधन केंद्र आहे. जागतिक स्तरावरीलसुद्धा या विद्यापीठाचे संशोधनातील योगदान हे नेहमी वाखाणण्याजोगेच राहिले आहे. कॅनडातल्या विद्यापीठीय संशोधनात महत्त्वाच्या असलेल्या ‘यु-१५’ या गटाचा अल्बर्टा विद्यापीठ एक प्रमुख सदस्य आहे. विद्यापीठाच्या विविध विभागांमध्ये चालू असलेल्या संशोधनातील गुणवत्ता वाढावी या हेतूने ही शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. शिष्यवृत्तीधारकाच्या पीएच.डी.च्या कालावधी एवढाच शिष्यवृत्तीचा कालावधी असेल. शिष्यवृत्तीधारकाला दिलेल्या मर्यादित कालावधीतच त्याचे पीएच.डी.चे संशोधन पूर्ण करावे लागेल. या शिष्यवृत्तीअंतर्गत अर्जदाराला विद्यापीठातील त्याच्या विभागाकडून दरमहा निवासी भत्ता, वेतन भत्ता, प्रवास भत्ता व संशोधनासाठीची अनुदानित रक्कम यांसारख्या सर्व सुविधा देण्यात येतील. विद्यापीठाकडून दिल्या जाणाऱ्या एकूण पीएच.डी. पाठय़वृत्तींची संख्या संस्थेकडून सांगण्यात आलेली नाही. शिष्यवृत्तीधारकाच्या पीएच.डी. अभ्यासक्रमाला १ जानेवारी २०१७ पासून सुरुवात होईल.
अर्ज प्रक्रिया
या शिष्यवृत्तीच्या अर्जप्रक्रियेसाठी विद्यापीठाने स्वतंत्र अर्ज वेबसाइटवर उपलब्ध करून दिलेला आहे. अर्जदाराने त्याचा पीएच.डी.चा अर्ज ऑनलाइन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून यादीमध्ये दिलेल्या कागदपत्रांच्या सॉफ्ट प्रतींसह ईमेल करावा. अर्जासह अर्जदाराने त्याचे एसओपी, सीव्ही, निबंध, आतापर्यंतच्या सर्व शैक्षणिक ट्रान्सक्रिप्ट्सच्या अधिकृत प्रती, जीआरई, जीमॅट व आयईएलटीएस किंवा टोफेल यापैकी आवश्यक परीक्षांचे गुण, कार्यानुभवाचे प्रशस्तिपत्र इत्यादी गोष्टी जोडाव्यात. शिफारसपत्रांसाठी मात्र अर्जदाराने त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीशी संबंधित असलेल्या दोन प्राध्यापकांची अथवा तज्ज्ञांचे ई-मेल अर्जामध्ये नमूद करावेत. विद्यापीठ स्वतंत्रपणे संबंधित प्राध्यापकांस संपर्क करून शिफारसपत्र देण्यासाठी विनंती करेल.
आवश्यक अर्हता
ही शिष्यवृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे. अर्जदार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवीधर असावा. त्याने विद्यापीठाच्या कोणत्याही विभागामध्ये पूर्णवेळ पीएच.डी.साठी प्रवेश घेतलेला असावा किंवा घेणारा असावा. अर्जदाराचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. अर्जदाराची पदवीपर्यंतची शैक्षणिक पाश्र्वभूमी उत्कृष्ट असावी. त्याचा पदव्युत्तर पातळीवर किमान ३.७ एवढा जीपीए असावा. अर्जदाराने परदेशी विद्यापीठांच्या प्रवेशप्रक्रियेसाठी महत्त्वाची असलेली जीआरई किंवा जीमॅटसारखी परीक्षा उत्तीर्ण असावे अशी कोणतीही अट घातलेली नाही. मात्र, परदेशी विद्यापीठांच्या प्रवेशप्रक्रियेतील स्पर्धात्मकता लक्षात घेतली तर या परीक्षांपैकी शक्यतो जीआरई या परीक्षेत अर्जदाराने चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे त्याच्यासाठी फायद्याचे ठरेल. भारतीय अर्जदारांसाठी आयईएलटीएस किंवा टोफेल या इंग्रजीच्या दोन्हींपैकी एका परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. शिष्यवृत्तीसाठी विद्यापीठाने याव्यतिरिक्त कोणतीही किमान आवश्यक अर्हता नमूद केलेली नाही. मात्र अर्जदाराचा सीव्ही अतिशय उत्तम असावा. त्याच्याकडे जर पूर्णवेळ कार्यानुभव (Full-time Work Experience) असणे किंवा किमान एका विदेशी भाषेचे उत्तम ज्ञान असणे इत्यादी बाबी त्याला अंतिम निवड प्रक्रियेमध्ये निश्चितच प्राधान्यक्रम मिळवून देऊ शकतात.
निवड प्रक्रिया
अर्जदाराची सीव्हीसह त्याच्या अर्जातील एकूण गुणवत्ता लक्षात घेऊन व निवड समितीकडून अर्जाची छाननी झाल्यानंतर त्याची मुलाखतीसाठी निवड करण्यात येईल. मुलाखतीतून अंतिम विद्यार्थ्यांची निवड होईल. मुलाखतीनंतर सर्व अर्जदारांना विद्यापीठाकडून त्यांच्या निकालाबाबत कळवण्यात येईल.
अंतिम मुदत
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १ नोव्हेंबर २०१६ आहे.
महत्त्वाचा दुवा : //www.ualberta.ca/
प्रथमेश आडविलकर itsprathamesh@gmail.com

Story img Loader