इटलीमधील ‘आयएमटी स्कूल फॉर अ‍ॅडव्हान्स्ड स्टडीज’ या संशोधन संस्थेत विविध विषयांची सांगड घालत आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमातील पीएच.डी कार्यक्रम राबवला जातो. पीएच.डीसाठी प्रवेश, नि:शुल्क शिक्षण व एकूण तीन वर्षांच्या कालावधीकरिता शिष्यवृत्ती असे या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचे स्वरूप आहे. संबंधित विषयामध्ये पदव्युत्तर पदवी घेतलेल्या अर्हताप्राप्त आंतरराष्ट्रीय अर्जदारांना संस्थेकडे १३ जुल २०१६ पूर्वी अर्ज करता येतील.
शिष्यवृत्तीबद्दल..
२०१६ च्या युरोपमधील विद्यापीठांच्या रँकिंग्जनुसार मध्य इटलीमधील लुक्का या शहरात असलेली ‘आयएमटी स्कूल फॉर अ‍ॅडव्हान्स्ड स्टडीज’ ही संस्था संशोधनासाठी इटलीमध्ये अव्वल तर संपूर्ण युरोपात तृतीय क्रमांकाची गणली जाते. संस्थेच्या आद्याक्षरांतील आयएमटी म्हणजेच इन्स्टिटय़ूशन्स, मार्केट्स, टेक्नोलॉजी. शैक्षणिक, वैज्ञानिक, बाजारपेठ व तंत्रज्ञान या साऱ्यांचा मिलाफ साधून विविध विषयांतील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता आकर्षति करण्याकडे या संस्थेचा कल दिसून येतो.
हा आंतरविद्याशाखीय पीएच.डी. कार्यक्रम अर्थशास्त्र, पदार्थविज्ञान, संगणक विज्ञान, अभियांत्रिकी, मानसशास्त्र, गणित व सांस्कृतिक वारसा आदी विषयांची सांगड घालू पाहात आहे. म्हणूनच संस्थेला आज मूलभूत व नावीन्यपूर्ण अशा संशोधनासाठी असलेले युरोपातील एक सर्वोत्कृष्ट केंद्र अशी आंतरराष्ट्रीय ओळख प्राप्त झालेली आहे.
या शिष्यवृत्ती कार्यक्रमाअंतर्गत ३४ आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना पीएच.डी.च्या संशोधन अभ्यासक्रमासाठी प्रवेशासहित शिष्यवृत्ती बहाल केली जाते. पीएच.डी. कार्यक्रमासह शिष्यवृत्तीचा एकूण कालावधी तीन वर्षांचा आहे. शिष्यवृत्तीधारकाला त्याचा पीएच.डी. अभ्यासक्रमासाठीचा सल्लागार तज्ज्ञ निवडण्याची मुभा देण्यात येईल. या शिष्यवृत्तीच्या अंतर्गत तीन वर्षांदरम्यान शिष्यवृत्तीधारकाला संशोधनातील नि:शुल्क प्रशिक्षण दिले जाईल. दरम्यान संस्थेकडून तीन वर्षांच्या कालावधीकरता विद्यार्थ्यांला सुमारे १४ हजार युरो एवढी वार्षकि रक्कम शिष्यवृत्ती म्हणून बहाल करण्यात येईल. सर्व शिष्यवृत्तीधारकांना शैक्षणिक शुल्क माफ असेल, तसेच शिष्यवृत्तीधारकासाठी नि:शुल्क निवासाची व उपाहारगृहाची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. याव्यतिरिक्त शिष्यवृत्तीअंतर्गत शिष्यवृत्तीधारकाला आंतरराष्ट्रीय आरोग्य विमा व अपघातापासूनच्या सुरक्षिततेसाठी विमा यांसारख्या इतर सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातील.
आवश्यक अर्हता
ही शिष्यवृत्ती कोणत्याही वयोगटातील सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे. या शिष्यवृत्तीकरता अर्ज करण्यासाठी उमेदवार संबंधित विद्याशाखांमधील पदव्युत्तर पदवीधर असावा किंवा त्याच्याकडे किमान चार वर्षांच्या अभ्यासक्रमाची पदवी असावी. आंतरराष्ट्रीय अर्जदाराच्या पदवीची अर्हता संस्थेच्या पीएच.डी समितीद्वारे तपासली जाईल. अर्जदाराची पदवी- पदव्युत्तर पदवी स्तरावरील शैक्षणिक पाश्र्वभूमी उत्तम असणे आवश्यक आहे. हा पीएच.डी अभ्यासक्रम इंग्रजीत असल्याने उमेदवाराचे बोली व लेखी इंग्रजीवर प्रभुत्व असावे. अर्जदारांनी ‘आयईएलटीएस’ या इंग्रजी भाषेच्या परीक्षेत अतिशय उत्तम गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक ठरते. त्याला इटालियन भाषेचे ज्ञान असणे आवश्यक नाही. उमेदवाराकडे पदवी स्तरावर प्रयोगशाळेतील किंवा एखाद्या संस्थेतील संशोधनाच्या अनुभवाचे
प्रशस्तीपत्र असावे.
अर्ज प्रक्रिया
या शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराने त्याचा अर्ज ऑनलाइन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून दुव्यामध्ये दिलेल्या संस्थेच्या वेबसाइटवर जमा करावा. अर्जासोबत अर्जदाराने त्याच्या व्यक्तिगत व शैक्षणिक पाश्र्वभूमीबद्दल सविस्तर माहिती देणारे त्याचे एसओपी, त्याचा सीव्ही, त्याने पदवी/पदव्युत्तर अभ्यासक्रमात केलेल्या संशोधनाचा लघु संशोधन प्रबंध किंवा त्याने शोधनिबंधाच्या स्वरूपात प्रकाशित केलेले त्याचे एखादे संशोधन, तसेच त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीशी संबंधित असलेल्या दोन प्राध्यापकांची किंवा तज्ज्ञांची शिफारसपत्रे, आतापर्यंतच्या सर्व शैक्षणिक ट्रान्सक्रिप्ट्सच्या अधिकृत प्रती, त्याचे ‘आयईएलटीएस’चे गुणांकन, आरोग्य तपासणी अर्ज, संशोधन अनुभवाचे प्रशस्तीपत्र, पारपत्राची व राष्ट्रीय ओळखपत्राची साक्षांकित प्रत इत्यादी गोष्टी जोडाव्यात. अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची संबंधित विषयातील शैक्षणिक गुणवत्ता व संशोधनातील आवड लक्षात घेऊन मुलाखतीसाठी त्याची निवड केली जाईल. मुलाखतीसाठी निवडलेल्या उमेदवारांची संस्थेच्या परिसरात किंवा व्हिडीओ कॉन्फरिन्सगद्वारा मुलाखत घेतली जाईल आणि त्यानंतर त्याला अंतिम निकाल कळवला जाईल.
अंतिम मुदत
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत
१३ जुल २०१६ आहे.
महत्त्वाचा दुवा
http://www.imtlucca.it n
प्रथमेश आडविलकर – itsprathamesh@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा