जगातल्या बव्हंशी लोकसंख्येवर होणारा कर्करोगाचा वाढता प्रभाव पाहता, एक गोष्ट त्वरित ध्यानात येते की कर्करोगाशी संबंधित होणारे मूलभूत संशोधन तुलनेने खूपच अपुरे आहे. हे संशोधन फक्त संख्यात्मकच नव्हे तर दर्जात्मक दृष्टीनेही वाढावे आणि त्यातून कर्करोगाच्या अचूक उपचाराच्या अभिनव पद्धतींचा विकास व्हावा यासाठी कार्यरत असणाऱ्या संस्था मुळातच खूप कमी आहेत. जर्मनीतील ‘जर्मन कॅन्सर रिसर्च सेंटर’ हे त्यापैकी एक प्रतिष्ठित संशोधन केंद्र आहे. कर्करोगावरील संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय बुद्धिमत्ता आकर्षित करता यावी व त्यातून या युवा संशोधकांना एक उत्तम व्यासपीठ मिळावे या हेतूने नुकतीच पीएचडी पूर्ण केलेल्या अर्जदारांसाठी पोस्टडॉक्टरल पाठय़वृत्ती कार्यक्रम संस्थेकडून राबवला जातो. या वर्षीच्या या पाठय़वृत्तीसाठी पात्र अर्जदारांकडून ३१ ऑगस्ट २०१६ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.
पाठय़वृत्तीबद्दल :
जर्मनीमधील हेडलबर्ग शहरात असलेले ‘जर्मन कॅन्सर रिसर्च सेंटर (ऊङो)’ हे जर्मनीचे राष्ट्रीय कर्करोग संशोधन केंद्र आहे. दरवर्षी जर्मनीमध्ये साडेचार लाखांपेक्षाही जास्त लोकांना कर्करोग झाल्याचे निदान होते. प्रत्येक कर्करोग हा वेगळा असतो व प्रत्येक रुग्णाचा कर्करोग हा त्यातील अजून वेगळेपण दर्शवीत असतो. त्यामुळे कर्करोगाच्या संशोधनात अनेक आव्हाने असतात. ही सगळी आव्हाने पेलून आपली स्वतंत्र ओळख बनवणारी ऊङो ही जर्मनीतील सर्वात मोठी जैववैद्यकीय संशोधन संस्था आहे. हेडलबर्गमधील प्रख्यात सर्जन प्रा. कार्ल हेनरिक यांनी १९६४ मध्ये या संस्थेची स्थापना केली. ऊङो ही जर्मनीतील अग्रगण्य वैज्ञानिक संस्था ‘हेल्मोल्त्झ असोसिएशन ऑफ नॅशनल रिसर्च सेंटर’ची सदस्यदेखील आहे. संस्थेत एकूण ९० संशोधन विभाग आहेत. संस्थेच्या एकूण २७०० कर्मचाऱ्यांपैकी १२०० कर्मचारी हे शास्त्रज्ञ आहेत. हे सर्व शास्त्रज्ञ कर्करोगाच्या विविध कारणांचा सखोल अभ्यास करत असून, लोकांना कर्करोग होण्यापासून कसा बचाव करता येईल इथपासून ते कर्करोगाच्या अचूक उपचाराच्या अभिनव पद्धतींचा विकास करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीचे संशोधन करण्यामध्ये गुंतलेले आहेत. या तज्ज्ञ शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टडॉक्टरेट करण्याचे इतर मार्गदेखील आहेत. मात्र, ऊङो पोस्टडॉक्टरल पाठय़वृत्ती कार्यक्रम हा येथील प्रवेशाचा सर्वात प्रतिष्ठित व स्पर्धात्मक मार्ग आहे. उच्च ध्येयाने प्रेरित असलेल्या, जागतिक बुद्धिमत्तेला आकर्षित करण्याच्या हेतूने ऊङो पोस्टडॉक्टरल पाठय़वृत्ती कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. पाठय़वृत्तीधारकाच्या पोस्टडॉक्टरल संशोधनाचा कालावधी दोन वर्षांचा आहे. पाठय़वृत्तीअंतर्गत पाठय़वृत्तीधारकाला संस्थेकडून या कालावधीसाठी ठरावीक वेतन दिले जाईल. हे वेतन त्याच्या निवडीच्या मुलाखतीदरम्यान ठरवले जाईल. याव्यतिरिक्त त्याला इतर सर्व सुविधा देण्यात येतील. पाठय़वृत्तीधारकाने शक्यतो दिलेल्या मर्यादित कालावधीतच त्याचे संशोधन पूर्ण करून पदवी घेणे योग्य राहील. पाठय़वृत्तीसाठी निवड झाल्यानंतर अर्जदाराला ही पाठय़वृत्ती इतर कुणालाही देता येणार नाही. याशिवाय, त्याला त्याचा पोस्टडॉक्टरल अभ्यासक्रम पूर्ण करणे बंधनकारक राहील. संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या एकूण पीएचडी पाठय़वृत्तींची संख्या दहा एवढी आहे.
आवश्यक अर्हता :
ही पाठय़वृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे. अर्जदाराकडे जीवशास्त्र शाखेच्या संबंधित विषयातील पीएचडी पदवी किंवा वैद्यकीय शाखेतील एमडी पदवी असावी. ज्या अर्जदारांनी ही पदवी अगदी अलीकडे म्हणजे दोन वर्षांपर्यंत पूर्ण केलेली आहे, असेच अर्जदार या पाठय़वृत्तीसाठी अर्ज करू शकतात. त्याच्या आधी पीएचडी पदवी पूर्ण केलेले अर्जदार या पाठय़वृत्तीला अर्ज करण्यासाठी अपात्र आहेत. अर्जदाराची पदवी व पदव्युत्तर स्तरावर शैक्षणिक पाश्र्वभूमी अतिशय उत्तम असावी. अर्जदाराच्या त्याच्या पीएचडीच्या संशोधनात गती असावी. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील वैज्ञानिक नियतकालिकांमध्ये शोधनिबंध प्रकाशित झालेले असावेत. आंतरराष्ट्रीय अर्जदारांनी इंग्रजीच्या आयईएलटीएस किंवा टोफेल यापैकी एक परीक्षा दिलेली असावी व त्यात उत्तम गुणांकन प्राप्त केलेले असावे. टोफेलमध्ये ९५ तर आयईएलटीएस ७ बँड्स असे किमान गुण या परीक्षांमध्ये अर्जदाराला मिळालेले असावेत. याशिवाय अर्जदाराचे बोली इंग्रजीवर प्रभुत्व आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रिया :
या पाठय़वृत्तीसाठी अर्जदाराने त्याचा अर्ज एकाच पीडीएफमध्ये पूर्ण करून पीडीएफ स्वरूपात दुव्यामध्ये दिलेल्या इमेलवर (postdoc@dkfz.de) सादर करावा. अर्जदाराने त्याचा संपूर्ण अर्ज इंग्रजीत करावा. अर्जामध्ये अर्जदाराने त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीबद्दल व या पाठय़वृत्तीसाठी त्याची निवड का व्हावी याबद्दल माहिती देणारे त्याचे एसओपी, त्याचा सी.व्ही., त्याने प्रकाशित केलेल्या शोधनिबंधांची यादी, संशोधनाचा एकपानी लघु संशोधन अहवाल (Research Statement), पीएचडी पदवीचे प्रशस्तीपत्राची एक प्रत आणि त्याच्या संशोधन पाश्र्वभूमीशी संबंधित असलेल्या दोन तज्ज्ञांची शिफारसपत्रे या सर्व प्रतींचा एकाच पीडीएफमध्ये समावेश करावा आणि आणि ती पीडीएफ वर दिलेल्या इमेलवर पाठवून द्यावी. अर्जामध्ये याबरोबरच अर्जदाराने विषयाशी संबंधित त्याच्या आवडीच्या तीन संशोधन क्षेत्रांचा उल्लेख करावा. त्यासाठी संस्थेच्या पुढील प्रकल्पांची माहिती अर्जदार विविध विभागप्रमुखांशी संपर्क साधून घेऊ शकतात. अर्जदाराने जीआरई, टोफेल किंवा आयईएलटीएस या परीक्षा दिल्या असतील तर अधिकृत संस्थेमार्फत परीक्षांचे गुण कळवावे.
निवड प्रक्रिया :
संस्थेच्या विविध विभागांतील तज्ज्ञ विभागप्रमुखांपैकी चार विभागप्रमुखांची एक समिती तयार केली जाते. या समितीकडून पाठय़वृत्तीसाठी आलेल्या सर्व अर्जामधून छाननी करून एकूण वीस उमेदवारांची निवड केली जाते. निवड झालेल्या उमेदवारांना हेडलबर्गमध्ये संस्थेला भेट देण्याची व तेथील चर्चासत्रास उपस्थित राहण्याची एक संधी दिली जाते. अर्जदार त्यासाठी संस्थेचे निमंत्रणपत्र व्हिसा मुलाखतीदरम्यान सादर करू शकतो. चर्चासत्रानंतर दोन आठवडय़ांच्या कालावधीदरम्यान अंतिम उमेदवारांची निवड केली जाते व त्यांना त्यांच्या निवडीबाबत कळवले जाते.
अंतिम मुदत :
या पाठय़वृत्तीसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०१६ आहे.
महत्त्वाचा दुवा :
http://www.dkfz.de/en/index.html
प्रथमेश आडविलकर -itsprathamesh@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा