हॉटेल व्यवसायात बल्लवाचार्य म्हणजेच शेफ होण्याकरिता फूड प्रॉडक्शन अर्थात पदार्थनिर्मितीमध्ये स्पेशलायझेशन करावे लागते. हॉटेल मॅनेजमेंटच्या शेवटच्या वर्षांत हे स्पेशलायझेशन निवडायचे असते. या ठिकाणी विद्यार्थ्यांना कॉलेजच्या बल्क किचनमध्ये मोठय़ा प्रमाणावर स्वयंपाक करायला शिकवले जाते. हॉटेलमध्ये मोठय़ा मेजवान्यांचा स्वयंपाक मुख्य मुदपाकखान्यात केला जातो, ज्यामध्ये अनेक विभाग असतात. बुचरी म्हणजे जिथे मांसाहारी जिन्नस साफ करून स्वयंपाकासाठी तयार केले जातात. व्हेज प्रेप म्हणजे भाज्यांची पूर्व तयारी, गार्द माँजेर म्हणजे सर्व प्रकारची सलाड्स आणि थंड पदार्थ बनवण्याची जागा, जी वातानुकूलित असते. सूप सेक्शन, बेकरी, तंदूर, इंडियन, चायनीज, कान्टिनेंटल हे विभाग जवळजवळ प्रत्येक मोठय़ा हॉटेलमध्ये असतातच. मुख्य स्वयंपाकखोलीच्या व्यतिरिक्त विविध प्रकारच्या उपाहारगृहांना लागून स्पेश्ॉलिटी किचन्स अर्थात वैशिष्टय़पूर्ण, खास स्वयंपाक खोल्या असतात. तिथे एका विशिष्ट प्रकारचा स्वयंपाक होतो, जो फक्त उपाहारगृहामध्ये येणाऱ्या लोकांनाच दिला जातो. या सर्व प्रकारच्या मुदपाकखान्यांतून काम करण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. त्यानंतर विद्यार्थी आपले स्पेशलायझेशन निवडतात. अभ्यासक्रमात औद्योगिक प्रशिक्षणाचाही सहभाग असतो. इथेच विद्यार्थ्यांना आपल्याला नक्की कोणत्या विभागात काम करायचे आहे, याचा अंदाज येतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा