पहिली गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा येत्या १३ जून रोजी प्रस्तावित आहे. परीक्षेचा अभ्यासक्रम आणि काठिण्य पातळी याबाबत मागील लेखांमध्ये चर्चा करण्यात आली. या लेखामध्ये अभ्यासाचे तंत्र कसे असावे याबाबत चर्चा करण्यात येत आहे. गट क सेवा परीक्षेच्या काठिण्य पातळीसाठी बारावीचा स्तर आयोगाने निश्चित केला आहे. या अनुषंगाने दिलेल्या अभ्यासक्रमावर आधारित तयारी करण्यासाठी विषयवार रणनीती पुढीलप्रमाणे असावी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चालू घडामोडी

चालू घडामोडींच्या नोटस् सूत्रबद्धपणे पुढीलप्रमाणे काढता येतील – केंद्र व राज्य सरकारच्या योजना, धोरणे व त्यातील महत्त्वाचे मुद्दे, देशावर प्रभाव टाकू शकणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घटना, घटक विषयांबाबतच्या ठळक घडामोडी, महत्त्वाच्या परिषदा, संघटना, चच्रेतील व्यक्ती, त्यांचे कार्यक्षेत्र, नियुक्त्या-निवड-बढती, पुरस्कार, सन्मान, पारितोषिके, ग्रंथ लेखक, निधन, महत्त्वाच्या चच्रेतील कंपन्या, संस्था त्यांचे प्रमुख, त्यांचे उत्पादन क्षेत्र, चच्रेतील ठिकाणे, विज्ञानातील शोध व त्यातील संकल्पना, महत्त्वाच्या समित्या-आयोग व त्यांचे अहवाल, महत्त्वाची आर्थिक आकडेवारी, महत्त्वाची विधेयके, कायदे व घटनादुरुस्त्या, महत्त्वाचे न्यायालयीन निवाडे इ.

बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित

अंकगणित या उपघटकामध्ये शेकडेवारी, व्याज, नफा तोटा, भागीदारी, गुणोत्तर प्रमाण, समीकरणे, काळ काम वेग अंतर, अपूर्णाक व गणिती समीकरणे हे घटक विशेष महत्त्वाचे आहेत. यांच्यासाठीची सूत्रे आणि १ ते ३० पर्यंत पाढे, १ ते २० पर्यंतचे वर्ग आणि १ ते १५ पर्यंतचे घन पाठ असतील तर सर्वसाधारण गणिती प्रक्रिया करून हे प्रश्न सोडविण्यातही आत्मविश्वास मिळवता येतो.

बुद्धिमत्ता चाचणी घटकामध्ये आकृतीमालिका, अक्षरमालिका, व्यक्तींचा क्रम, छंद, व्यवसाय यांच्या संयोजनावरील प्रश्न, सांकेतिक भाषा, दिशा, कॅलेंडर व घडय़ाळ, नातेसंबंध या महत्त्वाच्या घटकांचा समावेश होतो. हा भाग सोडविण्यासाठी सातत्याने सराव करणे आणि समीकरणे पाठ असणे आवश्यक आहे.

नागरिकशास्त्र

भारतीय राज्यघटनेचा प्राथमिक अभ्यास करताना घटनेतील मूलभूत हक्क, कर्तव्ये, नितीनिर्देशक तत्त्वे, घटनात्मक पदे, महिला, मुले, अपंग, मागासवर्ग, अल्पसंख्याक या सामाजिक घटकांसाठीच्या तरतुदी, घटनादुरुस्ती याबाबतची कलमे व तरतुदी तोंडपाठ कराव्यात. राज्यव्यवस्था (प्रशासन) या घटकामध्ये केंद्र-राज्य संबंध, न्यायालयीन उतरंड, कायदा निर्मिती प्रक्रिया समजून घ्यायला हवेत. चच्रेत असलेले तसेच प्रस्तावित कायदे, नियम, धोरणे यांचाही अभ्यास आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्णय माहीत असावेत. ग्राम व्यवस्थापन – प्रशासन या घटकामध्ये पंचायती राजव्यवस्था बारकाईने समजून घ्यायला हवी. ७३ व ७४ वी घटनादुरुस्तीमधील तरतुदी बारकाईने अभ्यासाव्यात.

अर्थव्यवस्था

या घटकाच्या अभ्यासाची सुरुवात अर्थव्यवस्था विषयाच्या मूलभूत संकल्पना समजून घेऊन करायला हवी. विशेषत: राष्ट्रीय राष्ट्रीय उत्पन्न, परकीय व्यपार, बँकिंग, मुद्रा आणि राजकोषीय नीती या अभ्यासक्रमामध्ये उल्लेख असलेल्या संकल्पना बारकाईने समजून घ्याव्यात. या संकल्पना व्यवस्थित समजून घेतल्यावर संबंधित मुद्दय़ांची आकडेवारी (टक्केवारी) नोंदवून घ्यावी. शेती व उद्योग यांबाबत महत्त्वाची धोरणे, योजना व आकडेवारी यांच्या नोट्स काढाव्यात. रोजगार, दारिद्रय़ या संकल्पनांचा अभ्यास महत्त्वाच्या संज्ञा, व्याख्या, स्वरूप, समस्या, कारणे, परिणाम, उपाययोजना या आयामांचा विचार करून करावा. आर्थिक बाबींवरील महत्त्वाच्या समित्या व त्यांच्या शिफारशींचा आढावा घ्यावा तसेच मानव विकास अहवाल व तत्सम निर्देशांकांची अद्ययावत माहिती करून घ्यावी.

सामान्य विज्ञान

सामान्य विज्ञानामध्ये जास्त भर जीवशास्त्र त्यातही मानवी आरोग्यशास्त्रावर असतो. मानवी आरोग्याशी संबंधित बाबींचा अभ्यास टेबल फॉरमॉटमध्ये करता येईल. अवयव संस्थांचा अभ्यासही गरजेचा आहे. औषधी व आर्थिक महत्त्वाच्या वनस्पतींचा आढावा घ्यावा. रसायनशास्त्राच्या उपयोजित बाबींवर जास्त भर द्यावा तसेच काही मूलभूत संकल्पना व अभिक्रिया समजून घ्याव्यात. भौतिकशास्त्रातील पारंपरिक मूलभूत संकल्पनांबरोबरच ईलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील चालू घडामोडी लक्षात घेणे गरजेचे आहे. उदा. मोबाइल, संगणक, यांतील अद्ययावत उपकरणे किंवा प्रणालींची बेसिक शास्त्रीय माहिती.

भूगोल

जगाच्या भूगोलामध्ये महत्त्वाचे प्राकृतिक प्रदेश, अक्षांश, रेखांश, महत्त्वाची भूरू पे, हवामानाचे घटक, हवामान विभाग मान्सून, जागतिक तापमानवाढ या घटकांचा अभ्यास आवश्यक आहे.

महाराष्ट्रातील जमिनी, मृदा यांचे प्रकार व संबंधित पिके तसेच खनिजे यांचा टेबल तयार करावा. महाराष्ट्राचे पर्जन्यावर आधारित हवामान विभाग, तेथील महत्त्वाची पिके, सिंचन पद्धत यांचाही टेबल करावा. नद्यांचा अभ्यास स्वतंत्रपणे करण्याऐवजी नदीप्रणाली समजून घेतल्यास बहुविधानी आणि जोडय़ा लावा प्रकारचे प्रश्न सोडविण्यासाठीचा अभ्यास बारकाईने होईल. त्याचबरोबर महत्त्वाची शहरे, पर्यटनस्थळे आणि उद्योग ज्या नदीच्या काठावर असतील त्यांचा टेबल तयार करता येईल.

इतिहास

‘आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास’ हा एका वाक्यातील अभ्यासक्रम आयोगाने विहित केला आहे. युरोपियन सत्तांच्या आगमनापासून भारताच्या आधुनिक इतिहासाची सुरुवात मानली जाते. पण प्रश्नांचे विश्लेषण केले तर लक्षात येते की १८५७च्या उठावापासून स्वातंत्र्यचळवळीपर्यंतच्या कालखंडवर भर देण्यात आल्याचे दिसते. यामध्ये क्रांतिकारक चळवळी आणि महाराष्ट्रातील महत्त्वाची व्यक्तिमत्त्वे हा भाग बारकाईने व सविस्तरपणे अभ्यासाणे आवश्यक आहे. स्वातंत्र्यचळवळीच्या विविध टप्प्यांवरील ठळक घटनांशी संबंधित इतर तथ्यात्मक बाबी लक्षात ठेवणेही आवश्यक आहे. पण त्यासाठी केवळ पाठांतर करून भागणार नाही. घटनांमधील परस्पर संबंध, कारणे, परिणाम असे आयाम समजून घेतल्यास घटना व त्यांचा क्रम दोन्ही व्यवस्थित समजतात व लक्षात रहातात. संयुक्त महाराष्ट्र चळ्वळ तसेच महाराष्ट्रातील समाजसुधारक व क्रांतिकारक यांच्यावर प्रश्न विचारण्याचा ट्रेन्ड वाढलेला आहे.