दहावी आणि बारावीनंतर करिअरचे कोणकोणते मार्ग आहेत, ते कसे मिळवावे, याविषयी विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात. म्हणूनच लोकसत्तातर्फे ‘मार्ग यशाचा’ ही करिअर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये विविध तज्ज्ञांनी केलेल्या मार्गदर्शनाचा सारांश आजपासून देत आहोत..

एखादा अभ्यासक्रम चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो म्हणजे करिअर घडले असे होत नाही. तुम्ही स्वत:च्या मनातील ताण कसा कमी करू शकता, तुम्ही किती जणांशी संपर्क साधू शकता, तुम्ही लोकांमध्ये किती लवकर मिसळता, तुम्ही किती मोकळे मनाने बोलता, तुमच्यामध्ये किती लवचीकता आहे हे ओळखणे म्हणजेच करिअर घडविणे होय. त्यामुळे फक्त शिकूनच करिअर घडते असे नसते.

मुलांचे करिअर घडत असताना पालकांनीही काही ठोस भूमिका घेणे आवश्यक असते. पालकांनी आपल्या मुलांवर अमुक एक अभ्यासक्रमच शिक असे करू नये. त्यामुळे त्यांच्यावर अभ्यासक्रम हा लादला जाण्याची शक्यता आहे. मुलांना जे करायचे आहे, ते त्यांना मनापासून करू द्या. पालकांनी लादलेल्या एखाद्या करिअरमध्ये त्या मुलाला यश मिळेलही. मात्र, त्यामध्ये त्याला काम करण्याचा आनंद मिळेल का? हे पाहणे गरजेचे आहे. त्याला त्यात आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटवता येत नाही. या लादलेल्या करिअरमध्ये तो प्रचंड ऊर्जेने काम करू शकत नाही. त्यामुळे अशा करिअरला काही अर्थ उरत नाही. अनेक वेळा पालक मुलांना मोकळीक देतात. त्याला ज्या क्षेत्रात आवड आहे, ते करण्यास सांगतात. मात्र, कधी-कधी मुलांकडूनही काही चुकीचे निर्णय घेतले जातात. त्यामुळे मुलांनीही ज्या क्षेत्रात करिअर करणे शक्य आहे तेच निवडावे.

करिअर घडविण्यासाठी तीन मुद्दे महत्त्वाचे ठरतात. पहिला म्हणजे मुलांनी त्यांची क्षमता ओळखावी. आपली बुद्धिमत्ता ओळखून आपल्याला कोणत्या क्षेत्रात जास्त चांगले काम करता येते हे समजून घेणे, गरजेचे आहे. उदाहरणार्थ, एखाद्याला अभियंता व्हायचे असेल. मात्र, तशा प्रकारची दूरदृष्टी नसेल तर तो अभियंता घडण्यात काही अर्थ नसतो.

दुसरा मुद्दा हा कामातील आनंदाचा आहे. आपल्याला ज्या करिअरमध्ये आनंद मिळतो. त्या दृष्टीने काम करावे, त्यासाठी लोकांसोबत संपर्क वाढविणे अपेक्षित आहे. अनेक मुलांना वेगवेगळ्या कामांत करिअर करण्याची आवड असते. यासाठी मुलांनी त्या क्षेत्रातील नामांकित व्यक्तीशी संपर्क साधणे आवश्यक आहे. त्या व्यक्तीशी जितका प्रत्यक्ष संबंध साधता येईल तितका प्रयत्न करा. त्यांच्याकडून ते क्षेत्र समजून घ्या. त्या क्षेत्रासंबंध वेगवेगळ्या लोकांशी चर्चा करा. भेटताना एकच प्रश्न डोक्यात ठेवा. त्यांना काम करताना आनंद मिळतोय का? .. त्याचं उत्तर हो असेल तर नक्कीच तुम्हाला त्या क्षेत्राची योग्य माहिती मिळेल.

तिसरा मुद्दा आहे व्यक्तिमत्त्वाचा. व्यक्तिमत्त्वामध्ये पाच प्रकार पडतात. यात पहिला प्रकार आहे अनुभवाचा. वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव घ्यायला तुमच्या मनाची तयारी आहे का, तुम्हाला नव्याने विचार सुचतात का, एखादी गोष्ट सांगितल्यानंतर पटकन समजते का, कठीण शब्द आले की मजा येते का, तुमची कल्पनाशक्ती चांगली आहे का हे ओळखणे अपेक्षित आहे. दुसरा प्रकार आहे, व्यवस्थित काम करणे. तुम्हाला दिलेले काम व्यवस्थित करता येत असले, वेळापत्रक पाळता येत असेल तर तुम्ही करिअरमध्ये दिलेली कामे नक्कीच वेळेत पूर्ण कराल. तिसरा प्रकार आहे, लोकांशी संवाद साधण्याचा. जर तुम्हाला लोकांशी संवाद साधायला आवडत नसेल तर तुम्ही या व्यक्तिमत्त्वाच्या विरोधी आहात. उदाहरणार्थ, जर तुम्ही वैज्ञानिक झालात आणि तुम्हाला एखाद्या गटात काम करायचे आहे आणि तुमचे व्यक्तिमत्त्व हे आपल्या सहकाऱ्यांशी संवाद न साधणारे असेल तर, तुम्हाला त्या कामात तग धरता येणार नाही. चौथा प्रकार आहे, आपल्या सहकाऱ्यांना समजून घेण्याचा. सहकाऱ्यांना समजून घेण्याची वृत्ती तुमच्यामध्ये असणे हे देखील करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. आपल्यासोबत काम करणाऱ्यांसोबत मनमिळाऊपणे वागणे हे करिअर घडविण्यात मदत करते. पाचवा प्रकार आहे, लहान गोष्टींचा तणाव मनात येणे. प्रत्येक करिअरमध्ये तणाव असतो, परंतु तो तणाव आपण कितपत झेलू शकतो हे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही ताणाला नियंत्रित करू शकाल तर नक्कीच तुम्ही नक्कीच यशस्वी करिअर घडवू शकता. व्यक्तिमत्त्वाच्या या पाच प्रकारांपैकी आपण कोणत्या प्रकारात बसतो, याविषयी माहिती करून घेणेही सोपे आहे. बिग फाइव्ह नावाच्या संकेतस्थळावरील काही चाचण्या देऊन तुम्ही यातून आपले व्यक्तिमत्त्व ओळखू शकता.

जर आयुष्यात व्यक्तिमत्त्व विकास, क्षमता, कामातील आनंद ओळखला तर करिअर घडवणे, अवघड नाही. करिअर घडवताना या सर्व गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे. आयुष्य जगताना आनंदी राहा. आपल्याकडे असलेली क्षमता लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करा.

 

प्रायोजक

टायटल पार्टनर -अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटी, मुंबई.

असोसिएशन पार्टनर – विद्यालंकार आणि एमआयटी-एडीटी युनिव्हर्सिटी, पुणे</p>

सपोर्टेड बाय पार्टनर्स – आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स

पॉवर्ड बाय पार्टनर – युक्ती, गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट, लक्ष्य अ‍ॅकॅडमी, विजय शेखर अकॅडमी, अरेना अ‍ॅनिमेशन, आदित्य ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स, आयडीईएमआय, मराठा मंदिर बाबासाहेब गावडे इन्स्टिटय़ूटस, रिलायन्स एज्युकेशन, सासमिरा, श्रीनिवासन्स आयआयटी अ‍ॅकॅडमी

हेल्थ पार्टनर – युअरफिटनेस्ट

शब्दांकन – किशोर कोकणे

 

 

Story img Loader