संगणकशास्त्र विषयातील विद्यार्थ्यांसाठी आता जर्मनीतही शिक्षणाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. The International Max Planck Research School for Computer Science (IMPRS-CS) या संशोधन संस्थेकडून संगणकशास्त्र विषयातील पीएच.डी. करण्यासाठी विद्यार्थ्यांना पाठय़वृत्ती दिली जाते. या पाठय़वृत्ती कार्यक्रमाअंतर्गत पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी प्रवेश व त्यासहित पाठय़वृत्तीचे लाभ देण्यात येतात. या पाठय़वृत्तीसाठी पदव्युत्तर पदवी पूर्ण केलेल्या आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

पाठय़वृत्तीविषयी

द मॅक्स प्लँक रिसर्च स्कूल फॉर कॉम्प्युटर सायन्स (कटढफर-उर) ही संगणकशास्त्र या विषयातील मूलभूत व उपयोजित संशोधन करणारी संस्था आहे. फक्त जर्मनीतच नव्हे तर जागतिक स्तरावरही या संस्थेला अतिशय महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. या संस्थेने अनेक आंतरराष्ट्रीय विद्यापीठांच्या सहकार्याने शैक्षणिक व संशोधन उपक्रम राबवले आहेत. जर्मनी व युरोपमधील जागतिक दर्जाची अनेक विद्यापीठे संस्थेला यामध्ये मोलाचे सहकार्य करत आहेत. संस्थेने सारलँड विद्यापीठाच्या संगणकशास्त्र विभाग म्हणजेच सारबृकेन ग्रॅज्युएट स्कूल ऑफ कॉम्प्युटर सायन्सच्या सहकार्याने संगणक शास्त्रातील पदव्युत्तर व पीएच.डी. अभ्यासक्रम राबवले आहेत. या दोन्ही संस्थांकडून संयुक्तपणे दरवर्षी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी मोफत प्रवेश व पाठय़वृत्तीचे संपूर्ण लाभ या पाठय़वृत्ती कार्यक्रमाच्या माध्यमातून दिले जातात. या पाठय़वृत्ती कार्यक्रमासाठी मॅक्स प्लँक संस्थेला मायक्रोसॉफ्ट रिसर्च केंब्रीजच्या वतीने भरीव आर्थिक सहकार्य मिळालेले आहे. हा पाठय़वृत्ती कार्यक्रम २०१८ साली सुरू होणार आहे. त्यामध्ये पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी एकूण १५ अर्जदारांची निवड केली जाणार आहे. पाठय़वृत्ती व पीएच.डी. अभ्यासक्रम या दोन्हींचा कालावधी संस्थेने संकेतस्थळावर नमूद केलेला नाही.

आवश्यक अर्हता

ही पाठय़वृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे. अर्जदार नामांकित विद्यापीठ किंवा संशोधन संस्थेमधून संगणकशास्त्र या विषयांमध्ये पदव्युत्तर पदवीधर असावा. अर्जदाराची पदवी व पदव्युत्तर स्तरावर शैक्षणिक पाश्र्वभूमी अतिशय उत्तम असावी. पदव्युत्तर पातळीवर त्याचा प्रथमश्रेणी जीपीए असावा. अर्जदाराने पदव्युत्तर अभ्यासक्रमादरम्यान केलेल्या संशोधनाचा, प्रकल्प अहवाल हा संस्थेने निवडीकरिता एक महत्त्वाचा निकष  ठरवलेला आहे. त्यामुळे अर्जदाराने गुणात्मक संशोधन व दर्जात्मक अहवाल या बाबींना प्राधान्यक्रम द्यावा. अर्जदाराचे इंग्रजी व जर्मन भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे.

अर्जदार जीआरई परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेला असावा. तसेच अर्जदाराने संगणकशास्त्र या विषयातील जीआरई

परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवले असल्यास त्याच्या निवडीची शक्यता वाढेल. मात्र, संगणक शास्त्रातील जीआरई परीक्षा देणे अर्जदाराला बंधनकारक नाही. अर्जदाराने टोफेल या इंग्रजीच्या परीक्षेमध्ये किमान आवश्यक गुण मिळवलेले असावेत. सारलँड विद्यापीठाचा टोफेल कोड ८३९९ आहे.

अर्ज प्रक्रिया 

या पाठय़वृत्तीसाठी अर्जदाराने त्याचा अर्ज ऑनलाइन अर्जप्रणालीद्वारे भरायचा आहे आणि यादीमध्ये दिलेल्या कागदपत्रांच्या सॉफ्ट प्रतींसह संस्थेच्या संकेतस्थळावरच जमा करायचा आहे. अर्जासह अर्जदाराने त्याचे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रशस्तिपत्र, एसओपी, सीव्ही, जीआरई व टोफेल या परीक्षांचे गुण, शाळा सोडल्याचे प्रशस्तिपत्र, तीन शिफारसपत्रे संशोधनाचे किंवा कार्यानुभवाचे प्रशस्तिपत्र, पदवी/पदव्युत्तर अभ्यासक्रमादरम्यान केलेल्या संशोधनाचा प्रकल्प अहवाल, अर्जदाराच्या प्रस्तावित संशोधनाचा लघुप्रबंध, तसेच त्याच्या आवडीच्या संशोधन-विषयांची माहिती व त्यातील अनुभव विशद करणारा एकपानी लघू अहवाल इत्यादी गोष्टी जोडाव्यात.

शिफारसपत्रांसाठी मात्र अर्जदाराने त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीशी संबंधित असलेल्या वा संशोधनाशी परिचित असलेल्या तीन प्राध्यापकांचे ई-मेल अर्जामध्ये नमूद करावेत. विद्यापीठ स्वतंत्रपणे संबंधित प्राध्यापकांस संपर्क करून शिफारसपत्र देण्यासाठी विनंती करेल.

निवड प्रक्रिया

अर्जदाराची संशोधनातील गुणवत्ता लक्षात घेऊन गुणवत्तेनुसार अंतिम निवड करण्यात येईल. अंतिम निवड झालेल्या अर्जदारांना त्यांच्या निवडीबाबत कळवले जाईल.

उपयुक्त संकेतस्थळ 

http://www.imprs-cs.de/

अंतिम मुदत 

  • या पाठय़वृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. १५ नोव्हेंबर २०१७ आहे.

itsprathamesh@gmail.com

Story img Loader