देशाला खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम, निरोगी, सुदृढ, प्रदूषणमुक्त, निर्मळ करायचे असेल तर सुरुवात स्वच्छतेपासूनच व्हायला हवी. त्यासाठीच आरोग्य आणि स्वच्छता निरीक्षक या पदाला बरीच मागणी आहे. महानगरांमध्ये या पदावर काम करण्यासाठी अनेक उमेदवारांची गरज आहे. ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट ही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करणारी देशातील आघाडीची संस्था आहे. या संस्थेच्या वतीने स्वच्छता निरीक्षक (सॅनिटरी इन्स्पेक्टर) हा एक वर्षांचा कालावधी असलेला अभ्यासक्रम, संपूर्ण देशभरात शिकवण्यात येतो. या संस्थेची देशभर २६केंद्रे आहेत. संस्थेने आयोजित केलेले विशेष अभ्यासवर्ग पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अर्बन गव्हर्नन्स (पीजीडीयूजी) लोकप्रशासन, प्रशासकीय कायदे, नगर व्यवस्थापन, शहर व्यवस्थापन, पर्यावरण नियोजन आणि व्यवस्थापन, शहरी दारिद्र्यनिर्मूलन, नगरविकास आदी विषयांचे प्रशिक्षण या अंतर्गत दिले जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वच्छता निरीक्षक पदविका – हा अभ्यासक्रम आरोग्य विभागाशी संबंधित आहे.

अभ्यासक्रम कालावधी : १२वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी १२महिने, तर दहावी उत्तीर्ण असलेल्यांसाठी १८ महिन्यांचा कालावधी आहे.

अभ्यासक्रमाचे माध्यम : हिंदी आणि इंग्रजी

अभ्यासक्रम : जलशुद्धीकरण, घनकचरा व्यवस्थापन, रुग्णालय व्यवस्थापन, माता व शिशु आरोग्य, राष्ट्रीय आरोग्यविषयक कार्यक्रम, नगरपालिका अधिनियमांतर्गत आरोग्यविषयक तरतुदी, कुटुंब कल्याण, जन्म-मृत्यू नोंदणी, शरीररचना विज्ञान आणि शरीरक्रिया विज्ञान, प्राथमिक सूक्ष्मजीव विज्ञान, प्राथमिक औषध विज्ञान, प्रथमोपचार, रोग व त्याची लक्षणे, उपचार, प्रतिरोधकशक्ती, पोषण, स्वास्थ्य, प्रशासन, पर्यावरण संरक्षण इत्यादी विषय विशेष मार्गदर्शनासह शिकवले जातात. तसेच प्रत्यक्ष ठिकाणांना भेट देऊन निरीक्षण करून त्याचा अभ्यास करतात.

आवश्यक गुण : उमेदवाराला स्वच्छतेविषयीची तळमळ असावी, उमेदवार संपूर्ण गावाचा तसेच महानगराचा कायापालट करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक दृष्टय़ा पात्र असला पाहिजे.

स्वच्छता निरीक्षकाची कामे

* महानगरामध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या कामावर देखरेख ठेवून त्यांच्याकडून साफसफाईची कामे करवून घेणे. तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कामाची पाहणी करून अहवाल देणे.

* घनकचरा कमी होण्यासाठी लोकांमध्ये प्रबोधन करणे.

* अस्वच्छता पसरवणाऱ्या आणि उघडय़ावर मलमूत्र विसर्जन करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणे.

* सांडपाणी व्यवस्थापन करणे.

* सार्वजनिक आरोग्य / साथीचे रोग यासंबंधी स्वच्छता निरीक्षक जनजागृतीचं काम करतो. पथनाटय़ाच्या प्रसंगी चित्रफितीच्या माध्यमातून किंवा ग्रामपंचायतीसमोर सभा घेऊन किंवा मोठय़ा शहरांमध्ये पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनद्वारे अधिकाधिक लोकांमध्ये प्रबोधन करणे.

* स्वच्छता निरीक्षकांनी मार्गदर्शक पुस्तिकेचा वापर करून कारवाई करावी.

नोकरीची संधी :

* स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना नगर परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था, रुग्णालये व वैद्यकीय शिक्षण संस्था, रेल्वे व हवाई वाहतूक क्षेत्र, हॉटेल्स इत्यादी ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर रोजगार संधी उपलब्ध आहेत. ‘स्वच्छ भारत’ अभियानामुळे या अभ्यासक्रमाचे महत्त्व अधिकच अधोरेखित झाले आहे.

* निमसरकारी किंवा गैरसरकारी असणाऱ्या अनेक कार्यालयांमधील आरोग्य खाते किंवा स्वच्छता विभागात नोकरीची संधी मिळू शकते.

* महाविद्यालये, रुग्णालये यामध्येही चांगल्या संधी आहेत .

* ग्रामपंचायतींपासून ते महानगरपालिकांपर्यंत अनेक ठिकाणी उमेदवार काम करू शकतात.

प्रा. योगेश हांडगे

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanitary inspector diploma course