सर्व शाखांतील बारावी उत्तीर्ण असलेल्या व पदवी अभ्यासक्रम पूर्ण करू इच्छिणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी अमेरिकेतील वांडरबिल्ट विद्यापीठाकडून एक शिष्यवृत्ती कार्यक्रम राबवला जातो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना त्यांच्या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश व त्यासोबत आर्थिक मदत दिली जाते. दरवर्षीप्रमाणे २०१८-१९ च्या प्रवेशासाठीही आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.
शिष्यवृत्तीविषयी –
अमेरिकेतील दक्षिण-पूर्व भागात वसलेल्या टेनेसी या राज्याची राजधानी असलेल्या नॅशविले या शहरात वांडरबिल्ट विद्यापीठ आहे. १८७३ साली स्थापना झालेलं हे खासगी विद्यापीठ तेथील एक प्रमुख व जुने शैक्षणिक केंद्र आहे. प्रसिद्ध अमेरिकन उद्योजक कॉर्नेलियस वांडरबिल्ट यांच्या नावावरून ओळखले जाते. वांडरबिल्ट विद्यापीठात कला, वाणिज्य, विज्ञान-तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, पर्यावरण, कायदा, स्थापत्यशास्त्र, जैवविज्ञान व वैद्यकीय शाखेमधील भरपूर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या शंभर विद्यापीठांपैकी एक असलेल्या या विद्यापीठाची राष्ट्रीय क्रमवारीदेखील तेवढीच उत्कृष्ट आहे. टाइम्स हायर एज्युकेशनच्या क्रमवारीनुसार जागतिक क्रमवारीत ८७व्या क्रमांकावर असलेले हे विद्यापीठ राष्ट्रीय क्रमवारीमध्ये पंधराव्या क्रमांकावर आहे.
वांडरबिल्ट विद्यापीठाकडून पदवी अभ्यासक्रम पूर्ण करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी एक शिष्यवृत्ती कार्यक्रम राबवला जातो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना त्यांच्या पदवी अभ्यासक्रमादरम्यान आर्थिक मदत केली जाते. ज्यायोगे त्यांचे शिक्षण सहज पूर्ण व्हावे. या शिष्यवृत्ती कार्यक्रमाअंतर्गत आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना २०१८-१९ या शैक्षणिक वर्षांत पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश व शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. शिष्यवृत्तीचा कालावधी एक वर्षांचा असेल. शिष्यवृत्तीचे भवितव्य शिष्यवृत्तीधारकाच्या पदवी अभ्यासक्रमातील गुणवत्तेवर अवलंबून असेल. शिष्यवृत्तीअंतर्गत या कालावधीदरम्यान शिष्यवृत्तीधारकाला त्याच्या अभ्यासक्रमाचे संपूर्ण शिक्षण शुल्क, उन्हाळी सुट्टीदरम्यान वेतन, प्रकल्पासाठी पूर्ण सहाय्य दिले जाईल. याव्यतिरिक्त त्याला किमान आवश्यक सुविधा बहाल केल्या जातील.
आवश्यक अर्हता –
ही शिष्यवृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे. या शिष्यवृत्तीला अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराने वांडरबिल्ट विद्यापीठातील त्याला हव्या असलेल्या पदवी अभ्यासक्रमासाठी अर्ज करावयाचा आहे. पदवी अभ्यासक्रमासाठी त्याने केलेला अर्ज या शिष्यवृत्तीसाठीही गृहीत धरण्यात येईल. वांडरबिल्ट विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रम प्रवेश व शिष्यवृत्तीस पात्र होण्यासाठी अर्जदार बारावीची परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण असावा. अर्जदाराची बारावीपर्यत शैक्षणिक पाश्र्वभूमी उत्तम असावी. त्याबरोबरच अर्जदाराने रअळया परीक्षेत उत्तम गुण मिळवलेले असावेत. त्याचा सीव्ही अतिशय उत्तम असावा. अर्जदाराचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. त्याने आयईएलटीएसमध्ये किमान सात बँड्स किंवा टोफेलमध्ये किमान शंभर गुण मिळवलेले असावेत. त्याखालील मिळालेल्या बँड्स किंवा गुणांना शिष्यवृत्तीला अपात्र ठरवले जाईल. अर्जदाराने तो अर्ज करू इच्छित असलेल्या अभ्यासक्रमाबद्दल अधिक माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाऊन मिळवावी.
अर्ज प्रक्रिया –
या शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराला स्वतंत्रपणे ‘कॉमनअॅप’वा कोअॅलिशन अॅप्लिकेशन किंवा क्वेस्टब्रिज अॅप्लिकेशनच्या माध्यमातून वांडरबिल्ट विद्यापीठाला तो इच्छुक असलेल्या पदवी अभ्यासक्रमासाठी अर्ज करावयाचा आहे. अर्जदाराने त्याचा अर्ज ऑनलाइन अर्जप्रक्रियेद्वारे पूर्ण करून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या सॉफ्ट प्रतींसह जमा करावयाचा आहे. अर्जासह अर्जदाराने त्याचे एसओपी, सीव्ही, आतापर्यंतच्या सर्व शैक्षणिक ट्रान्सस्क्रिप्ट्सच्या अधिकृत प्रती, आयईएलटीएस किंवा टोफेल यापैकी आवश्यक परीक्षांचे गुण इत्यादी गोष्टी जोडाव्यात. शिफारसपत्रांसाठी मात्र अर्जदाराने त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीशी संबंधित असलेल्या दोन शिक्षक वा प्राध्यापकांचे ई-मेल अर्जामध्ये नमूद करावेत. विद्यापीठ स्वतंत्रपणे संबंधित प्राध्यापकांस संपर्क करून शिफारसपत्र देण्यासाठी विनंती करेल. अर्ज पूर्ण केल्यानंतर अर्जदारास विद्यापीठाकडून विद्यापीठाच्या पोर्टलवर स्वतंत्र अकाउंट उघडून दिले जाईल. ज्याच्या माध्यमातून तो वांडरबिल्ट विद्यापीठाच्या विविध शिष्यवृत्तींस अर्ज करू शकतो.
निवड प्रक्रिया –
अर्जदाराची गुणवत्ता लक्षात घेऊन त्याच्या अर्जाची तपासणी केली जाईल. तपासणीमधून गुणवत्तेनुसार निवडक विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात येईल. समितीचा निर्णय अंतिम राहील. अंतिम निवड झालेल्या अर्जदारांना त्यांच्या निवडीबाबत त्वरित कळवले जाईल.
उपयुक्त संकेतस्थळ –
http://www.vanderbilt.edu/
अंतिम मुदत –
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. १ डिसेंबर २०१७ आहे.
itsprathamesh@gmail.com