सिंगापूर सरकारच्या पुढाकाराने व केंब्रिज विद्यापीठाच्या सहकार्याने भारतीय गुणवत्तेला आकर्षित करता यावे व सिंगापूर-भारत यांच्यातील आंतर सांस्कृतिक संबंध वृद्धिंगत व्हावेत या हेतूने पदवीपूर्व, पदवी व पदव्युत्तर अशा विविध शैक्षणिक स्तरावरील शिष्यवृत्ती सुरू करण्यात आल्या. पदवीपूर्व स्तरावरील शिष्यवृत्तीमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना जीसीई-ए या पातळीच्या म्हणजेच ‘सिंगापूर-केंब्रिज जनरल सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन अ‍ॅडव्हान्स्ड’ या किंवा तत्सम स्तरावरील दोन वर्षांचे शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती बहाल करण्यात येते. सिंगापूरच्या शैक्षणिक मंत्रालयाकडून दरवर्षी दहावी उत्तीर्ण भारतीय विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती बहाल केली जाते. दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील या शिष्यवृत्तीसाठी इच्छुक अर्जदारांकडून १७ जुलै २०१६पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.
शिष्यवृत्तीबद्दल :
सिंगापूर सरकारच्या पुढाकाराने व केंब्रिज विद्यापीठाच्या सहकार्याने भारतीय गुणवत्तेला आकर्षित करता यावे व सिंगापूर-भारत यांच्यातील आंतरसांस्कृतिक संबंध वृद्धिंगत व्हावेत या हेतूने पदवीपूर्व, पदवी व पदव्युत्तर अशा विविध शैक्षणिक स्तरावरील शिष्यवृत्ती सुरू करण्यात आल्या. सिंगापूरच्या शैक्षणिक मंत्रालयाकडून जीसीई-ए या नावाचा दोन वर्षांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम चालवला जातो. भारतीय विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठीचे दोन वर्षांचे शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती बहाल करण्यात येते. सिंगापूरच्या शैक्षणिक मंत्रालयाकडूनच या अभ्यासक्रमाचे धोरण, शिक्षण रचना, अभ्यासक्रम, अध्यापनशास्त्र आणि मूल्यांकन इत्यादी ठरवण्यात येते.
शिष्यवृत्तीधारकाच्या संपूर्ण अभ्यासक्रमाचा एकूण कालावधी दोन वर्षांचा असेल. शिष्यवृत्तीधारकाला दिलेल्या मर्यादित कालावधीतच त्याला त्याचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल. या शिष्यवृत्तीअंतर्गत अर्जदाराला त्याचे सर्व टय़ुशन शुल्क, २४०० सिंगापूर डॉलर्स वार्षिक भत्ता, त्याच्या निवासाची वसतिगृहातील सोय, पाचशे सिंगापूर डॉलर्स एवढी अनुदानित रक्कम, भारत-सिंगापूर येण्या-जाण्याचा मोफत विमानप्रवास, परीक्षा शुल्क, वैद्यकीय व अपघात विमा यांसारख्या सर्व सुविधा देण्यात येतील. शिष्यवृत्तीधारकाची त्याच्या अभ्यासक्रमाला जानेवारी २०१७ पासून सुरुवात होईल.
आवश्यक अर्हता :
ही शिष्यवृत्ती फक्त भारतीय विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. ही शिष्यवृत्ती कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी असल्याने ज्या विद्यार्थ्यांनी नुकतीच दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे, असे विद्यार्थी या शिष्यवृत्तीला अर्ज करण्यास पात्र आहेत. अर्जदार हा भारतीय नागरिक असावा. त्याचा जन्म १९९८ ते २००० दरम्यान झालेला असावा. अर्जदाराची दहावीपर्यंतची शैक्षणिक पाश्र्वभूमी अतिशय उत्कृष्ट असावी. तसेच, त्याला दहावीमध्ये किमान ८५ टक्के गुण किंवा ‘अ’ श्रेणी मिळालेली असावी. अर्जदाराच्या इयत्ता दहावीच्या दरम्यान इंग्रजी ही त्याच्या अभ्यासक्रमातील प्रथम भाषा असावी. अर्जदाराने इयत्ता दहावीची परीक्षा सन २०१६ मध्येच उत्तीर्ण केलेली असावी. अर्जदाराला या शिष्यवृत्तीला अर्ज करण्यासाठी कोणतीही परीक्षा देण्याची आवश्यकता नाही. याशिवाय, अर्जदाराच्या
इयत्ता दहावीच्या वर्षांदरम्यान अभ्यासाव्यतिरिक्त इतर कोणत्याही क्षेत्रातील गुणवत्तेसाठी त्याला प्राधान्य दिले जाईल. अर्जदाराने त्याच्या तशा इतर कामगिरीचे प्रशस्तीपत्र जोडावे. अर्जदाराने त्याला शिष्यवृत्ती मिळावी यासाठी लवकरात लवकर अर्ज करावा.
अर्ज प्रक्रिया :
या शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराने त्याचा अर्ज ऑनलाइन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून जमा करावा. अर्जदाराने प्रत्येकी फक्त एकच अर्ज जमा करावा. ऑनलाइन अर्ज भरताना कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवत असेल तर विद्यार्थी + ६५६८७२२२२० या हेल्पलाइन केंद्राला दूरध्वनीवरून संपर्क साधून आपल्या शंकांचे निरसन करू शकतात. अर्जदाराने ऑनलाइन अर्ज भरल्यावर त्याची प्रिंट घेऊन त्याबरोबर स्वत:च्या जन्मतारखेचा दाखला, पासपोर्ट, ओळखपत्र, इयत्ता नववी व दहावीचे गुणपत्रक इत्यादी कागदपत्रांची साक्षांकित प्रत जोडून अंतिम मुदतीपूर्वी सिंगापूर शैक्षणिक मंत्रालयास पाठवावीत. मंत्रालयाकडून कोणतीही पोचपावती मिळणार नसल्याने अर्जदाराने आपली मूळ कागदपत्रे पाठवू नयेत. वरील कागदपत्रांपैकी एखादे कागदपत्र जर इंग्रजीत नसेल तर त्याचे इंग्रजीत भाषांतर केलेले प्रमाणपत्र पाठवावे.
अर्ज जमा करताना अर्जदाराने अर्जाबरोबर त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीबद्दल व या शिष्यवृत्तीसाठी त्याची निवड का व्हावी याबद्दल माहिती देणारे त्याचे एस.ओ.पी., त्याचा थोडक्यात सी.व्ही., त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीशी संबंधित असलेल्या दोन शिक्षकांची शिफारसपत्रे इत्यादी गोष्टी पाठवल्या तर त्याचा अर्ज अजून उठावदार होऊ शकतो.

निवड प्रक्रिया :
या शिष्यवृत्तीसाठी होणाऱ्या निवड प्रक्रियेत दोन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात आलेल्या अर्जामधून छाननी करून उमेदवारांची चाचणी परीक्षा ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात घेतली जाते. या चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड मुलाखतीसाठी केली जाते. त्यानंतर मग दुसऱ्या टप्प्यात नोव्हेंबर महिन्यात तज्ज्ञ समितीकडून या उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यातील हुशार व ध्येयवादी उमेदवारांची अंतिम निवड या शिष्यवृत्तीसाठी केली जाते. निवड झालेल्या उमेदवारांना लगेचच नोव्हेंबरमध्ये त्यांच्या निवडीबाबत कळवले जाते.
अंतिम मुदत :
या शिष्यवृत्तीसाठी पूर्ण झालेले अर्ज जमा करण्याची अंतिम मुदत १७ जुलै २०१६ आहे.
महत्त्वाचा दुवा :
https://www.moe.gov.sg/home
itsprathamesh@gmail.com

Story img Loader