सोशल मीडिया मार्केटिंग हे जरी फक्त सोशल नेटवर्किंगशी संबंधित असले तरी त्याला पूरक अशी यंत्रणा कार्यरत असावी लागते. एखादे उत्पादन तयार करण्यासाठी ज्या पद्धतीने एक यंत्रणा उभी असते त्याचप्रमाणे उत्तम एसएमएम सेवा पुरवण्यासाठीही पूरक क्षेत्रांची गरज असते. त्यापैकीच एक म्हणजे डिजिटल पीआर म्हणजेच पब्लिक रिलेशन्स (जनसंपर्क) आणि मार्केटिंग. एसएमएम आणि डिजिटल पीआर हे डिजिटल मार्केटिंगचे दोन प्रमुख आधारस्तंभ आहेत असे म्हटले तरी चालेल. एखाद्या ब्रँडचा ऑनलाइन वावर आणि प्रतिमा तयार करण्यासाठी डिजिटल पीआर हे उत्तम माध्यम आहे.

*   फायदा काय?

कुठलेही उत्पादन किंवा सेवा ही यशस्वी करायची असेल तर अधिकाधिक लोकांपर्यंत त्याची माहिती पोहोचणे गरजेचे असते. तुमचे उत्पादन कितीही उत्तम असेल पण कुणी विकतच घेत नसेल तर त्याचा काहीही उपयोग नाही. त्यामुळेच लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवणे हे कुठल्याही कंपनीसाठी महत्त्वाचे असते. आजच्या डिजिटल युगात वर्तमानपत्रांपेक्षाही दुसरे प्रभावी माध्यम कुठले असेल तर ते म्हणजे इंटरनेट. इंटरनेटवर उपलब्ध असणाऱ्या असंख्य वेबसाइट्सच्या माध्यमातून एकाच वेळी मोठय़ा संख्येने लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी डिजिटल पीआरचा फायदा होतो.

*   कामाचे स्वरूप

पब्लिक रिलेशन्स किंवा जनसंपर्क हे जनमत तयार करण्यासाठीचे प्रभावी माध्यम आहे, हे तर जगजाहीर आहे. त्यामुळेच एखाद्या ब्रँडविषयी पोषक जनमत तयार करणे आणि कंपनीची योग्य पद्धतीने पब्लिसिटी करणे हे डिजिटल पीआरचे मुख्य काम असते. सामान्यत: एखादे उत्पादन, सेवा यांच्या संदर्भातल्या महत्त्वाच्या कार्यक्रमांच्या वेळी डिजिटल पीआर आघाडीवर असते. एखादे उत्पादन बाजारात येण्याचा दिवस, सिनेमा प्रदर्शित होण्याचा दिवस अशा ब्रँडच्या दृष्टीने महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठी लोकांपर्यंत माहिती पोहोचवणे गरजेचे असते. विशिष्ट ब्रँड किंवा सिनेमाविषयी लोकांमध्ये सकारात्मक चर्चा होणे हे डिजिटल पीआरचे यश समजले जाते. याशिवाय ऑनलाइन न्यूज पोर्टल्सना माहिती पुरवणे आणि त्यातून कंपनीसाठी उपयुक्त वातावरण निर्माण करणे हेसुद्धा डिजिटल पीआरकडूनच केले जाते.

*   पात्रता

एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की, डिजिटल मार्केटिंग हे क्षेत्र सतत बदलत राहणारे आहे. तसेच ज्या क्षेत्राशी संबंधित कामकाज करायचे आहे त्या क्षेत्राची माहिती असणेही गरजेचे आहे. ज्या ब्रँडसाठी काम करायचे आहे त्या ब्रँडची इत्थंभूत माहिती आवश्यक आहे. याशिवाय दोन महत्त्वाच्या गोष्टींची जाण असणे फायदेशीर असते. एक म्हणजे माहितीची मांडणी. ऑनलाइन बातम्या आणि वर्तमानपत्रे यांच्यातला फरक माहीत असणे गरजेचे असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओळखी, संपर्क. जितक्या जास्त ओळखी, तितका जास्त फायदा.

’   प्रशिक्षण

जनसंपर्क या विषयामध्ये डिप्लोमा अथवा पदव्युत्तर शिक्षण असल्यास या क्षेत्रातील शिरकाव सोपा आहे. अर्थात प्रत्यक्षात काम करायला लागल्यानंतर मिळणारा अनुभवच महत्त्वाचा ठरेल. त्यासाठी कुठल्याही विषयात पदवी घेऊन कामाला नव्या जोमाने सुरुवात करणे उपयुक्त ठरेल.

 

जनसंपर्क (पब्लिक रिलेशन्स) विषयी

प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत.

*  मास्टर्स इन पब्लिक रिलेशन्स, मुंबई विद्यापीठ

*  संज्ञापन आणि पत्रकारिता विभाग, दुसरा  मजला, हेल्थ सेंटर, कलिना कॅम्पस, मुंबई.

*  डिप्लोमा इन अ‍ॅडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग कम्युनिकेशन्स

*  झेवियर्स इन्स्टिटय़ूट ऑफ कम्युनिकेशन्स, महापालिका मार्ग, मुंबई.

*  डिप्लोमा इन अ‍ॅडव्हर्टायझिंग अँड पब्लिक रिलेशन्स

*  वेलिंगकर इन्स्टिटय़ूट, एल. एन. रोड, पोदार कॉलेजजवळ, माटुंगा, मुंबई.

गौतम ठक्कर

(लेखक एव्हरीमीडिया टेक्नॉलॉजी या कंपनीचे सीईओ आहेत.)

शब्दांकन- पुष्कर सामंत

 

Story img Loader