मी पुणे विद्यापीठातून बी.एस्सी केमिस्ट्री हा अभ्यासक्रम केला आहे. मुंबई विद्यापीठातून एम.ए. एज्युकेशन हा अभ्यासक्रम केला आहे. शिक्षक म्हणून १९ वर्षे कार्यरत आहे. सध्या मी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून एम.एस्सी हा अभ्यासक्रम करीत आहे. मला यापुढे काय शिकता येईल. मराठी माध्यमातून पीएच.डी. करता येईल का? विकास राणे
विकासजी, तुमची शिकण्याची आवड वाखाणण्याजोगी आहे. सध्या मुक्त विद्यापीठांनी विविध प्रकारचे अभ्यासक्रम सुरू केल्याने कोणताही अभ्यासक्रम घरबसल्या करता येणे शक्य आहे. आता आयुष्यभर शिकता येणे सुलभ झाले आहे. तथापी कोणताही विषय शिकण्याऐवजी सध्या तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्याविषयीच पुढील अभ्यासक्रम केले तर तुमच्यासोबतच विद्यार्थ्यांना फायदा होईल. शिवाय तुमची या विषयातील तज्ज्ञता वाढेल. मराठीमधून पीएच.डी. करिता येणे शक्य आहे.
मी कॉम्प्युटर सायन्समध्ये एम.एस्सी केले आहे. पण मला बँकिंग क्षेत्रात काम करायची इच्छा आहे. त्यासाठी मी काय केले पाहिजे?
मंदाकिनी शिंदे
मंदाकिनी तू, पुढीलप्रमाणे बँकिंग क्षेत्रात जाऊ शकतेस –
(१) लिपिक संवर्ग- रिझव्र्ह बँक, नाबार्ड आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लिपिक संवर्गपदाची भरती स्वतंत्ररीत्या केली जाते. इतर राष्ट्रीयकृत बँकांतील लिपिक संवर्गपदाची भरती प्रक्रिया सामायिकरीत्या आयबीपीएस (इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या संस्थेमार्फत राबवली जाते. ग्रामीण बँकांतील या पदांची भरती आयबीपीएसमार्फतच राबवली जाते. या पद भरतीच्या जाहिराती वेळोवेळी महत्त्वाच्या वृत्तपत्रांमधून जाहीर केल्या जातात. खासगी बँकांतील अशा पदाच्या भरतीची माहिती संबंधित बँकांच्या संकेतस्थळावर बहुधा दिली जाते. (२) रिझव्र्ह बँक आणि नाबार्ड ऑफिसर्स- या पदासाठी स्वतंत्र परीक्षा अनुक्रमे संबंधित बँकेमार्फत घेतली जाते. (३) स्टेट बँक प्रोबेशनरी ऑफिसर- या पदासाठी चाळणी परीक्षा स्टेट बँकेमार्फत घेतली जाते.
(४) राष्ट्रीयकृत बँकांमधील प्रोबेशनरी ऑफिसर्स- देशातील साधारणत: वीस ते बावीस अशा बॅंकामधील प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या निवडीसाठी आयबीपीएसमार्फत परीक्षा घेतली जाते.
(५) ग्रामीण बँकांमधील ऑफिसर्स- देशातील साधारणत: १५ ते २० अशा बॅंकांमधील ऑफिसर्सच्या निवडीसाठी आयबीपीएसमार्फत परीक्षा घेतली जाते.
(६) खासगी बँकांमधील प्रोबेशनरी ऑफिसर्स- या पदांच्या भरतीसाठी प्रत्येक खासगी बँका वेगवेगळ्या पद्धती अवलंबतात. उदा- आयसीआयसीआय बँक चाळणी परीक्षा घेऊन, आयसीआयसीआय मणिपाल प्रोबेशनरी ऑफिसर्स प्रोग्रॅम या एक वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी उमेदवारांची निवड करते. एक वर्षांच्या प्रशिक्षणानंतर प्रोबेशनरी ऑफिसर्स या पदावर नियुक्ती दिली जाते.
(७) स्पेशॅलिस्ट ऑफिसर्स- माहिती तंत्रज्ञान, विधी, विपणन, विक्री, मनुष्यबळ विकास, सनदी लेखापाल या स्पेशालिस्ट पदांसाठी स्वतंत्र परीक्षा घेतली जाते.
(८) कॅम्पस भरती- दर्जेदार एमबीए महाविद्यालयातील प्लेसमेंट सेलच्या साहाय्याने खासगी व सार्वजनिक बँकांसाठी अधिकारी पदाची निवड केली जाते.
तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.)