*  मी बी.टेक कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षांला आहे. पण मला आयटी कंपनीमध्ये नोकरी करण्याची इच्छा नाही. मी नोकरीसाठी स्पर्धा परीक्षा आणि इतर कोणत्या परीक्षांना प्राधान्य द्यावे?

– वरुण भोकारे

तुम्ही इंडियन इंजिनीअरिंग सर्विस एक्झामिनेशन देऊन भारत सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या देशस्तरिय संस्थांमध्ये उच्च श्रेणीचे अधिकारी पद मिळवू शकता. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना स्पेशलाइज्ड अधिकाऱ्यांची गरज असते. त्यासाठी घेण्यात येणारी विशेष परीक्षा (स्पेशालिस्ट ऑफिसर्स एक्झामिनेशन) आपण देऊ  शकता. गेट परीक्षेत उत्तम गुण मिळवून तुम्ही भारत सरकारच्या ताब्यात असलेल्या नवरत्न/ महारत्न/ मिनीरत्न या कंपन्यांमधील निवडप्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यासाठी पात्र ठरू शकता. कम्बाइन्ड डिफेन्स सर्विस एक्झामिनेशन या परीक्षेद्वारे लष्करातसुद्धा भरती होऊ  शकता.

*   मी बी.कॉम पूर्ण केले आहे. मी एका वर्षांपासून एमपीएससीची तयारी करत आहे. पण एक दुसरा सुरक्षित पर्याय म्हणून मला पत्रकारितेची डिग्री करायची आहे. तर मी कम्युनिकेशन अँड जर्नालिझममधील पदव्युत्तर पदवी करू की पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा करू? मला अल्पकाळातील अभ्यासक्रमाची पदवी हवी आहे. त्यासाठी मुंबईत कोणत्या संस्था आहेत?

– सुशांत भोसले

आपण एमपीएससीची तयारी करत आहात ही चांगली बाब आहे. मात्र एमपीएससीला पर्याय म्हणून पत्रकारितेचा अभ्यासक्रम योग्य ठरणार नाही. पत्रकारितेची पदवी किंवा पदविका घेतल्यावर लगेचच उत्तम करिअर सुरू होणार नाही. त्यामुळे हा अभ्यासक्रम गंभीरतेने घ्यावा लागेल. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी मुंबईमध्ये पत्रकारितेचे अर्धवेळ अभ्यासक्रम नाहीत. हे पूर्णवेळ अभ्यासक्रम उपलब्ध करून देणाऱ्या संस्था आहेत,

गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर अँड डेव्हलपमेंट (http://giced.edu.in/ )के. जे. सोमय्या इन्स्टिटय़ूट ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम   (https://www.somaiya.edu/)

झेवियर इन्स्टिटय़ूट ऑफ कम्युनिकेशन   http://www.xaviercomm.org/

*   मी १२वी कला शाखेत शिकत असून मला आयपीएस व्हायचे आहे. त्यासाठी कोणती परीक्षा द्यावी लागेल?

– अक्षय चव्हाण

आयपीएस होण्यासाठी तुम्हाला केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी नागरी सेवा परीक्षा द्यावी लागेल. या परीक्षेद्वारे आयएएस, आयपीएस होण्याची संधी मिळते.

*   दहावी, बारावी न करता नाशिकच्या मुक्त विद्यापीठातून इतिहास विषय घेऊन पदवी घेतली असेल तर त्याला कोणत्या संधी आहेत? ही पदवी राज्य आणि केंद्राच्या स्पर्धा परीक्षेसाठी पात्र आहे काय? 

– योगेश कोलगेरा

मुक्त विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रम हा मान्यताप्राप्त आहे. त्यामुळे तो राज्य आणि केंद्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ग्राह्य धरला जातो. सार्वजनिक बँकेच्या परीक्षासुद्धा तुम्हाला देता येतात.

*   मी २००७ साली केमिकल इंजिनीअरिंगची पदवी प्रावीण्यासह मिळवली आहे. त्यानंतर तांत्रिक अधिकारी म्हणून कार्यही केले आहे. त्यानंतर एका शाळेत शिक्षक म्हणून कामही केलेय. आता मात्र पुढे नेमके काय करावे, याबाबत गोंधळ उडाला आहे. मी काय करू?

– स्वाती पाटील

तांत्रिक अधिकारी ते शिक्षक हा आपला प्रवास जरा वेगळाच वाटतो. केमिकल इंजिनीअर्सला नोकरी मिळण्याच्या चांगल्या संधी कायमच उपलब्ध असतात. तथापी आता आपणास ही पदवी घेऊन जवळपास १० वर्षे झाली आहेत. त्यामुळे नव्याने नोकरीसाठी आपणास बरेच प्रयत्न करावे लागतील. आपण वयोमर्यादा ओलांडली नसल्यास ॅअळए परीक्षा देऊन आपल्या शाखेत आयआयटी/एनआयटीसारख्या दर्जेदार संस्थांमधून पदव्युत्तर पदवी घेऊ  शकता. या परीक्षेत चांगले गुण प्राप्त केल्यास सार्वजनिक कंपन्या व उपक्रमांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध होऊ  शकते. वयोमर्यादेच्या अटींचे पालन होत असल्यास यूपीएससी किंवा एमपीएससीच्या परीक्षा देण्यास हरकत नाही. तथापी यासाठी आपणास कठोर परिश्रम करावे लागतील. तशी मानसिक तयारी असल्यासच आपण हा मार्ग अवलंबवावा.

Story img Loader