मी बारावी उत्तीर्ण आहे. विज्ञान शाखेतील पदवी अभ्यासक्रम कोणते?
अजय भोसले, अंबाजोगाई
आपण बारावी विज्ञान शाखेत गणित आणि जीवशास्त्र हे विषय घेतले असल्यास वैद्यकीय, अभियांत्रिकी या शाखांमध्ये प्रवेश घेऊ शकता. वैद्यकीय शाखेमध्ये एमबीबीएस शिवाय बीएएमस, बीएचएमएस, बीडीएस, बॅचलर ऑफ फिजिओथेरपी, बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी इत्यादींचा समावेश आहे. मेडिकल लॅबोरेटरी, टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी नर्सिग या विषयात पदवी अभ्यासक्रम करता येतात. गणित / भौतिकशास्त्र / रसायनशास्त्र / भूगर्भशास्त्र / सांख्यिकी या विषयांमध्ये बीएससी ऑनर्स किंवा बी.एससी अभ्यासक्रमही करता येतील. विज्ञान शाखेतील पाच वर्षे कालावधीचे अभ्यासक्रमही करता येतात.
मी बी.ए पूर्ण केले आहे. सध्या पुणे पोलीस दलात कार्यरत आहे. मला राज्यसेवा परीक्षा द्यायची आहे. खासगी शिकवणी लावणे, गरजेचे आहे काय? मी स्वयंअध्ययन करतोय. मला अभ्यासासाठी काही टिप्स द्याल का?
संदीप जायभाये
कोणताही खासगी शिकवणी वर्ग यशाची हमखास खात्री देऊ शकत नाही, ही बाब कायम लक्षात ठेवावी. तुमच्या कामाचे स्वरूप पाहता तुम्हाला तसेही खासगी शिकवणी लावणे शक्य नाही. तुम्ही स्वयंअध्ययनावरच भर द्या. मात्र हे करताना राज्य लोकसेवा आयोगाने प्राथमिक आणि मुख्य परीक्षेसाठी घोषित केलेल्या अभ्यासक्रमातील सर्व विषयांचा सखोल अभ्यास करा. त्यातील एकही टॉपिक सुटणार नाही याची विशेष काळजी घ्या. यासाठी चांगल्या लेखकांची मूलभूत पुस्तके अवश्य वाचा. स्वत:च्या नोंदी करत चला. कामावर असताना सुद्धा जो काही वेळ मिळू शकत असेल तेव्हा काय वाचायचे, याचे नियोजन आदल्या दिवशीच करून ठेवा. ते साहित्य सोबत लिखित स्वरूपात किंवा स्कॅन करून किंडलमध्ये ठेवा. वेळ मिळाला की वाचत चला. वरिष्ठांना विनंती करून अशीच डय़ूटी मिळवायचा प्रयत्न करा की जिथे कामासोबतच अभ्यास करणेही सुलभ होईल.
मी बी.एस्सीच्या पहिल्या वर्षांला आहे. मला नेट आणि सेट परीक्षा देऊन लेक्चरर व्हायचे आहे. या परीक्षेची तयारी कशी करावी लागेल?
ऋतुजा मेश्राम
नेट आणि सेट या परीक्षा पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर देता येतात. त्यामुळे तुम्ही पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम उत्तम रीतीने उत्तीर्ण व्हा. या पाच वर्षांतील रसायनशास्त्राचा अभ्यास सूक्ष्मपणे आणि सर्व संकल्पना समजून करणे आवश्यक आहे. केवळ विद्यापीठीय पदवी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करू नका. या दोन बाबींवर तुम्ही अंमलबजावणी केल्यास नेट / सेटच्या तयारीसाठी स्वतंत्र अभ्यास करण्याची वा शिकवणी वर्ग लावण्याची गरज भासणार नाही.
मी बी.कॉमच्या दुसऱ्या वर्षांला आहे. मला आयएएस व्हायचे आहे. या परीक्षेची तयारी कशी करायची?
नितेश पिंपळे
आयएएस होण्यासाठी स्वतंत्र परीक्षा घेतली जात नाही. संघ लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षेद्वारे आयएएस पदासाठी निवड केली जाते. ही परीक्षा आपण पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षांला असताना देऊ शकता. या परीक्षेच्या प्राथमिक परीक्षेच्या तयारीसाठी आपण १०वी आणि १२वी पर्यंतच्या भूगोल / इतिहास / समाजशास्त्र / नागरीशास्त्र / अर्थशास्त्र / राजकीय व्यवस्था / विज्ञान / कृषी आदींचा समजून उमजून अभ्यास करायला हवा. त्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची किंवा एनसीईआरटीची पुस्तके वाचावीत. सामान्य ज्ञान व अध्ययनाच्या अभ्यासासाठी भारत वार्षिकी/ योजना/ कुरुक्षेत्र ही मासिके वाचावीत.