येत्या दशकभरात भरभराटीला येणाऱ्या उद्योगांपैकी एक म्हणजे पर्यटन. दिवसेंदिवस अनेक नवनवी ठिकाणे पर्यटनस्थळे म्हणून विकसित होत आहेत. फक्त प्रसिद्धच नव्हे तर अप्रसिद्ध ठिकाणी जायलाही लोक उत्सुक आहेत. परदेशातल्या पर्यटनालाही उत्तम दिवस आलेले आहेत. त्यामुळेच यासंदर्भातल्या करिअरच्या संधी वाढलेल्या आहेत.

टूर गाइड  – या व्यक्ती पर्यटकांसोबत सहलीत हजर राहून सहल सुरळीत पार पाडण्यासाठी मदत करतात, सहलीत कोणतीही अनाहूत अडचण आल्यास या व्यक्ती स्वत: लक्ष घालून ती सोडवतात. खरे पाहता कोणत्याही सहलीची यशस्विता बऱ्याच अंशी टूर गाइडवर अवलंबून असते. टूर गाइडना पर्यटन व्यवसायात सरकारी, निमसरकारी पर्यटन विभाग, टूर ऑपरेटर्स, ट्रॅव्हल एजन्सीज येथे नोकरी मिळू शकते. तसेच ते स्वत:चा व्यवसायही करू शकतात. टूर गाइडने कायम हसतमुख, सकारात्मक असायला हवे. तरच पर्यटकांच्या अडचणी सोडवणे सोपे जाते.

वेळेचे व्यवस्थापन, उत्तम निर्णयक्षमता, भौगोलिक ज्ञान, निसर्ग, इतिहास, कला या विषयांमध्ये रुची असणे आवश्यक आहे. टूर गाइडला एखाददुसरी परदेशी भाषा किंवा आपल्या देशातीलच इतर बोलीभाषा बोलता येत असतील तर उत्तमच. हिंदी आणि इंग्रजीचे ज्ञान विशेष आवश्यक.

टिकिटिंग स्टाफ सहलीसाठी पर्यटक ग्राहकांच्या चौकशीपत्रांची, मेल्सची दखल घेणे, तिकिटांचे वेळच्या वेळी आरक्षण करणे ही टिकिटिंग स्टाफची कामे. यामध्ये काम करणाऱ्यांना ग्लोबल डिस्ट्रिब्युशन सिस्टीम सॉफ्टवेअर अवगत असणे आवश्यक आहे. संगणक सफाईदारपणे वापरता यायला हवा. सोबतच अस्खलित इंग्रजी बोलता येणेही अत्यंत आवश्यक आहे.

ट्रॅव्हल कन्सल्टंट या व्यक्ती टूर ऑपरेटर किंवा ट्रॅव्हल एजन्सीसाठी काम करतात. एखाद्या व्यक्तीला प्रवासाला जायची इच्छा आहे, पण नेमके कुठे जावे याबद्दल माहिती नसेल तर ट्रॅव्हल कन्सल्टंट त्याच्या मदतीला येतात. इच्छुक पर्यटकांसाठी सहलींचे विविध पर्याय सुचवतात. ट्रॅव्हल कन्सल्टंटनाही आता पर्यटन व्यवसायात विशेष मागणी आहे.

पात्रता पर्यटन व्यवसाय हा उत्तम संवादकौशल्यावर चालतो, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये. कारण या व्यवसायातील प्रत्येक व्यक्तीला मुळात संवाद साधण्याचे ज्ञान आवश्यक असते. सोबतच जनसंपर्काची आवड, पर्यटन व्यवसायातील घडामोडींचे ज्ञान, बदलणाऱ्या सरकारी नियमांचे ज्ञान आणि संयम गरजेचा आहे.

पूर्वी या व्यवसायातील अनेक व्यक्तींनी कोणतेही विशेष शिक्षण घेतलेले नसे. केवळ पदवी, पदव्युत्तर शिक्षण, निरनिराळ्या भाषांचे ज्ञान सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनुभव यावरच त्यांचे काम चालत असे. पण बदलत्या काळानुसार आणि वाढत्या स्पर्धेनुसार पर्यटन विषयातील विशेष शिक्षण घेणे आवश्यक झालेले आहे. त्यामुळेच टुरिझम आणि टूर मॅनेजमेंटमधील पदवी, पदविका किंवा पदव्युत्तर शिक्षणाच्या अभ्यासक्रमांना महत्त्व प्राप्त झाले आहे. भाषेचेही उत्तम ज्ञान आवश्यक आहे. इंग्रजी किंवा परदेशी भाषेसोबतच एखादी स्थानिक बोलीभाषाही अवगत असणे गरजेचे असते.

अभ्यासक्रम

*  पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन टुरिझम ट्रॅव्हल इंडस्ट्री गरवारे इन्स्टिटय़ूट. (मुंबई विद्यापीठाशी संलग्न) कालावधी १८ महिने  http://results.mu.ac.in/garware/pgtravel.html

* अंडर ग्रॅज्युएट डिप्लोमा इन टुरिझम इंडस्ट्री http://results.mu.ac.in/garware/travel_tourism.html

*  आय.ए.टी.ए.तर्फे (इंटरनॅशनल एअर ट्रॅव्हल असोसिएशन) एअर ट्रॅव्हल कार्यक्षेत्रातील अनेक अभ्यासक्रम राबविले जातात.  http://www.iata.org

Story img Loader