स्वाती केतकर- पंडित swati.pandit@expressindia.com

नांदगाव तालुक्यातील अनकवाडे शाळेतले पहिली-दुसरीचे विद्यार्थीही इंग्रजीतून इंट्रो देतात. या लहानशा गावाने आणि इथल्या विद्यार्थ्यांनी यंदा पहिल्यांदाच वृक्षदिंडी, ग्रंथदिंडीही अनुभवली.  त्यांच्यासाठी शाळा म्हणजे आनंदाचे झाड झाले आहे. या सर्व बदलाचे कारण आहेत, त्यांच्या शिक्षिका गायत्री आहेर.

समाजात बदल घडवण्यासाठी गायत्री आहेर यांना प्रशासकीय अधिकारी व्हायचे होते. घरच्या परिस्थितीमुळे आणि काही जबाबदाऱ्यांमुळे त्या अधिकारी तर होऊ शकल्या नाहीत, पण बदल घडवण्याचे स्वप्न त्या जगत आहेत. जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून काम करताना अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत.

इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव शाळेत गायत्री रुजू झाल्या ते शिक्षणसेवक म्हणून. नॅशनल प्रोग्रॅम फॉर एज्युकेशन ऑफ गर्ल्स एनहान्समेंट अ‍ॅण्ड लर्निगसाठी काम करता करता हळूहळू त्यांना ही अध्ययनाची गोडी लागली. पुढे २० जून २००७ मध्ये गायत्री तिथेच रुजू झाल्या. इथे आदिवासी वस्ती असल्याने सुरुवातीला भाषेची अडचण आली, पण सहशिक्षकांच्या मदतीने गायत्रींनी त्यातून मार्ग काढला. शासनाच्या अनेक योजनांसाठी काम करता करता इथल्या बायामाणसांशी त्यांची गट्टी जमली. आधी इथल्या मुलींनाकलाकुसरीच्या वस्तू शिकवून मग त्यांचे मोठे प्रदर्शन भरवले. बायकांना शिक्षणाचे जगण्याचे महत्त्व सांगण्यासाठी त्या आडगावात गायत्री यांनी ‘जागर स्त्रीशक्तीचा’ हा कार्यक्रम सुरू केला. पोलीस, सरकारी अधिकारी अशा क्षेत्रांतील विविध स्त्रिया या कार्यक्रमात सहभागी झाल्या. चूल आणि मूल यापलीकडे बाईचे कार्यक्षेत्र आहे, हे हळूहळू तिथल्या आयाबायांना पटू लागले. आपल्या लेकीबाळींना त्या आग्रहाने शाळेत धाडू लागल्या.

यानंतर २०१३ मध्ये गायत्रीची बदली झाली, शाळा अजंग तालुका मालेगाव इथे. या शाळेमध्ये येणारी मुले विशेषत: फिरस्त्या कुटुंबातील, गावाबाहेरची मुले होती. स्थानिकांनी अजूनही शाळेला तितकेसे स्वीकारले नव्हते. स्थानिकांकडून विश्वास संपादन करण्यासाठी गायत्री आणि सहकाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पहिल्यांदा शाळा डिजिटल केली तरीही मुले येईनात. बहुतांश लोकांचा ओढा इंग्रजी माध्यमाकडे होता. मराठी शाळेतले विद्यार्थीही काही कमी नाहीत, हे दाखवून देण्यासाठी शाळेने इंग्रजीवर काम सुरू केले. गायत्रीचा त्यात पुढाकार होता. इंग्रजीची भीती घालवण्यासाठी गायत्री यांनी शैक्षणिक खेळांचा आधार घेतला. त्यासाठी समाजमाध्यमे, इंटरनेट पालथे घातले. खेळाच्या माध्यमातून शिकताना भाषेची भीती धूम पळाली आणि त्यातूनच अवतरला, इंग्लिशविंग्लिश हा अनोखा कार्यक्रम. इंग्रजीतून नाटक, कविता, गाणी सादर करणारी ही सारी आपल्याच गावातल्या शाळेतील विद्यार्थीमंडळी आहेत, हे पाहून गावाचा शाळेवर विश्वास बसला. पटसंख्येत आपोआप वाढ झाली. यानंतर गायत्री आणि तिच्या सहकाऱ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेचे आव्हान स्वीकारले. गायत्रीने पाचवीच्या वर्गाला शिकवताना संपूर्ण लक्ष या शिष्यवृत्ती परीक्षेवर केंद्रित केले. मुलांना कंटाळा येऊ न देता हा पूरक अभ्यास करायला लावणे, ही एक कसोटीच होती. अनेकदा त्यातील गणिते गायत्रीलाही सुटत नसत. मग आधीची पुस्तके, एमपीएससीची पुस्तके वगैरे शोधाशोध करून त्या त्याचे उत्तर शोधायच्या. विद्यार्थ्यांआधी त्यांचाही असा अभ्यास चालायचा. या धडपडीला फळ आले आणि त्यांचे चक्क आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवत्ता यादीत आले. गावामध्ये शाळेबद्दलचा विश्वास अभिमानात रूपांतरित झाला. या शाळेतील कामही आकाराला येत असतानाच त्यांची बदली झाली ती नांदगाव तालुक्यातील अनकवाडे शाळेत. याआधीच्या दोन्ही शाळा मोठय़ा होत्या, पण अनकवाडेची शाळा मात्र लहान आहे. या द्विशिक्षकी शाळेमध्ये अध्यापनासोबतच इतरही प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. शिवाय इथे गायत्रीकडे पहिली-दुसरी-तिसरी असे जोडवर्ग आहेत. गायत्री म्हणतात, ‘‘इथे शिकवणे ही माझी खरी परीक्षा होती. अजूनही आहे. मी शाळेत रुजू झाल्यावर आठ दिवसांतच उपशिक्षणाधिकारी आले होते. त्यांनी पाहिले की, तिसरीच्या एकाही मुलाला आपले नावही नीट लिहिता येत नव्हते.’’ यात खरे तर गायत्रीची चूक नव्हती कारण त्या आठ दिवसांपूर्वीच तिथे बदली होऊन आल्या होत्या, पण तरी ही गोष्ट त्यांच्या मनाला फार लागली. या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळवून द्यायचेच हे मनाशी पक्के करून गायत्री कामाची आखणी करू लागल्या. सुरुवातीला स्वत: खपून आकर्षक शैक्षणिक साहित्य बनवले. इथे मुलांना वर्गात बसण्यापेक्षा खेळायला आवडायचे त्यामुळे शाळेत उपस्थिती कमी होती. मग वर्गच त्यांनी पटांगणावर आणला. सकाळच्या परिपाठातच भरपूर वेळ घेतला. त्यामध्ये गोष्टी, गाणी, सोपे खेळ घ्यायला सुरुवात केली. पहिला महिना तर जवळपास मैदानातच ही शाळा भरायची, कारण विद्यार्थ्यांना वर्गात बसून अभ्यास म्हणजे काहीतरी कंटाळवाणे वाटायचे. परिपाठातल्या विविध खेळांमुळे मुलांना शाळेची गोडी लागली. घरी नुसते उणगत राहण्यापेक्षा शाळेत येऊन हे वेगळे खेळ खेळणे त्यांना आवडू लागले. विद्यार्थ्यांना शिस्तीचे, नीटनेटकेपणा शिकवण्यासाठी स्मार्ट बॉयह्ण, स्मार्ट गर्लह्ण असे किताब दिले गेले. दररोज एका स्मार्ट बॉय नि गर्लला चॉकलेट, पेन्सिल असे बक्षीस मिळू लागले. मग हे बक्षीस आणि कौतुक दोन्हीच्या ओढीने विद्यार्थी आपोआपच नीटनेटकेपणाने शाळेत येऊ लागले. माइंड मॅपह्ण म्हणजे एक शब्द लिहून त्या संबंधातील इतर शब्द विद्यार्थ्यांकडूनच गोळा करणे. या पद्धतीचाही गायत्री यांनी परिपाठात उपयोग केला. यामुळे विद्यार्थी बोलू लागले, आपली मते मांडू लागले. याचसोबत भाषापेटीचाही वापर गायत्रींनी सुरू केला. यामुळे विद्यार्थ्यांच्या भाषेत आणि पर्यायाने इतर विषयांच्या अभ्यासातही सुधारणा दिसू लागली. इतर शाळांसारखे आपल्याही शाळेत काही कार्यक्रम व्हावेत, असे विद्यार्थ्यांना वाटायचे. त्यामुळेच यंदा पहिल्यांदा शाळेतून वृक्षदिंडी, ग्रंथदिंडी निघाली. या कार्यक्रमांनी शाळा म्हणजे कोंडवाडा नव्हे तर आनंदशाळा आहे, हे मुलांना पटले. त्याचा परिणाम म्हणून हळूहळू पटसंख्या ४२ वरून ६२ वर गेली. गावामध्ये पाण्याची कमतरता आहे, त्यामुळेच पाण्याच्या रिकाम्या बाटल्या झाडाला बांधून त्यापासून सिंचनाचा वेगळा प्रकल्प गायत्री आहेर आणि त्यांचे विद्यार्थी साकारत आहेत.

ही सगळी धडपड कदाचित कुणाला मामुली वाटू शकेल, पण या धडपडीला स्वत:चे असे परिमाण आहे. कारण याच धडपडीमुळे सांजेगाव या शाळेत जिथे दहावीच्या पुढे कुणी मुली कधी शिकल्या नव्हत्या तिथे एक मुलगी चक्क नर्स झाली आहे. ‘स्त्रीशक्तीचा जागर’सारख्या कार्यक्रमांतून प्रेरणा घेऊन कुणा सविताला तिची आई न चुकता शाळेत धाडते आहे. मराठी शाळाही इंग्रजी शाळांइतकीच छान असते, हा संदेश गावांत पोहोचतो आहे.. आणि या सगळ्या ‘अच्छे दिनां’च्या पाठीमागे गायत्रीसारख्या अनेक गुणी शिक्षकांचे धडपडे हात आहेत.

Story img Loader