हसत खेळत शिक्षण ही संकल्पना सविता बरंडवाल प्रत्यक्ष राबवतात. जि.प. उच्च प्रा.शा. बुटखेडा इथले त्यांचे विद्यार्थी अगदी मधल्या सुट्टीतही अभ्यास करतात, पण खेळाच्या माध्यमातून.

गेली १७ वर्ष सविता बरंडवाल शिक्षक म्हणून काम करत आहेत. सुरुवातीला सहशिक्षिका असलेल्या सविताताई आता पदवीधर शिक्षक म्हणून काम पाहत आहेत. सध्या त्या जिथे शिकवतात त्या जालना जिल्ह्यतल्या बुटखेडा शाळेतल्या विद्यार्थ्यांना गणित समजून देण्यासाठी त्यांनी एक अभिनव प्रयोग केला आहे. त्याचे नाव आहे, समोशातून शिक्षण. हे समोसे खायचे नव्हेत तर स्ट्रॉचे समोसे आहेत.  सविताताई इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान शिकवतात. पण अनेकांच्या  गणिताच्या मूलभूत संकल्पनाच पक्क्या नव्हत्या. मग काय करायचे? या शाळेत आधीच्या शिक्षकांनी गटअभ्यासाची पद्धत आखून दिली होती. मधल्या सुट्टीतही डबा खाऊन झाल्यावर विद्यार्थ्यांना गटात बसून अभ्यास करावा लागत असे. मग तर ते आणखीच कंटाळत. यावर उपाय म्हणून  आकर्षक अभ्याससाहित्य तयार करण्याचे सविता यांनी ठरवले. तेव्हा त्यांना आठवले, लहानपणी शिकलेले स्ट्रॉपासून तयार केलेले समोसे.

गुलाबी, पिवळा, हिरवा, आकाशी आणि पांढरा अशा पाच रंगात त्यांनी समोसे तयार केले. प्रत्येक समोशाला एक किंमत ठरवून दिली, उदा. गुलाबी म्हणजे एकक तर हिरवा म्हणजे दशक. आपल्याकडे २ गुलाबी समोसे असतील तर त्यांची किंमत २०, तर अधिक एक हिरवा समोसा असला की त्याची किंमत शंभर. प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना अंकओळख होण्यासाठी हा समोशांचा खेळ आवडला. समोशाच्या रंगाप्रमाणे त्याची बेरीज करून किंमत ओळखायला विद्यार्थ्यांना फार मजा येऊ लागली. माध्यमिकच्या विद्यार्थ्यांनाही अपूर्णाक-पूर्णाकसारख्या कठीण क्रिया या समोशांच्या साहाय्याने समजून घेता येऊ लागल्या. मग सविता समोश्यांचे  विविध खेळ घेऊ लागल्या. कॅरम खेळताना सोंगटय़ाऐवजी हे समोसे वापरायचे. मग कोणाकडे किती किमतीचे समोसे जमले, यावरून कोण जिंकले ते ठरवायचे. एकक, दशकाचे स्तंभ आखायचे. ज्या रंगाचा समोसा आपण जिंकलेला नाही तिथे शून्य लिहायचे. यातून शून्याची समजही विकसित झाली. याच्यापुढचा खेळ होता, गोटय़ा खेळणे. मुलांना खडे, गोटय़ांनी खेळायला फार आवडते. तोच खेळ त्यांना समोशांद्वारे खेळायला लावला. ज्याच्याकडे विविध रंगाचे म्हणजे किमतीचे समोसे जमतील तो जिंकला. हा खेळ अगदी पहिलीतली मुलेही खेळतात आणि सातवीतलीही. अर्थात, हे एवढे समोसे बनवले तरी कसे? त्यावर सविता म्हणाल्या, त्यांनी आधी वर्गातल्याच ७-८ विद्यार्थ्यांना ते बनवायला शिकवले आणि दोनच दिवसांत सगळ्या शाळेला ते येऊ लागले.

या समोशांच्या उपयोग अभ्यासासाठीचे चलन म्हणूनही केला जातो. त्याचीही एक गंमतच आहे. विद्यार्थ्यांना बाजारहाट करायला फार आवडते. विशेषत: वजनाचा काटा धरणे, त्यानुसार माल-पैसे देणे घेणे. म्हणूनच शाळेमध्ये सविताताईंनी नकली बाजार भरवला. त्यात विद्यार्थ्यांच्याच वह्य़ा, पेन्स, पेन्सिली, खोडरबर होते. बाजार तयार झाला. विक्रेते, ग्राहक तयार झाले. सामानही आले पण मग खरेदी-विक्रीसाठी चलन काय द्यावे, याचा विचार करताना डोळ्यासमोर समोसे आले. हे चलन अधिकाधिक प्रमाणात आणि सुट्टे करून देण्यासाठी समोश्याची बँकही आली.  व्यवहारामध्ये चलनाची किंमत आणि महत्त्व विद्यार्थ्यांना समजले.

या समोशांच्या खेळामुळे विद्यार्थ्यांचे गणितही सुधारले, शिवाय त्यांना आपल्या बाईंविषयी आपुलकी वाटू लागली. त्यांच्यातील गुरू-शिष्याचे हे नाते बहरू लागले. सविताताईंना आधीच्या शाळेतही असेच प्रेम मिळाले होते. त्यांची बदली झाल्यावर, ती रद्द करण्यासाठी तिथल्या तिसरीच्या विद्यार्थिनींनी  आपल्या मोडक्यातोडक्या अक्षरात चक्क शिक्षणाधिकाऱ्यांना पत्रच लिहिले. बुटखेडातल्या शाळेतले विद्यार्थीही सविताताईंच्या प्रेरणेने सतत काहीतरी नवे करू पाहत असतात.  विशाल या त्यांच्या विद्यार्थ्यांने पत्र्याच्या काडय़ांपासून एक  संख्यायंत्र तयार केले आहे.

सध्या त्यांनी वर्गात अभ्यासाच्या जोडय़ा लावल्या आहेत. एक हुशार विद्यार्थी, तर एक अप्रगत विद्यार्थी. अभ्यासक्रमातील नवी गोष्ट हुशार विद्यार्थी लगेच आत्मसात करतात आणि आपल्या जोडीच्या अप्रगत विद्यार्थ्यांला ती समजावूनही सांगतात. या पद्धतीत हुशार आणि अप्रगत दोघांचीही ती संकल्पना पक्की होते.

अप्रगत विद्यार्थ्यांसाठीही सविता स्वत: मेहनत घेतात. एका पाचवीतल्या मुलांला उलटे लिहायची सवय होती. त्याच्या कलाने घेऊन शिकवत सविताताईंना दोन वर्षांत त्याला बरेच तयार केले आहे. सुरुवातीला शाळेकडे न फिरकणारा तो मुलगा आता रोज आवडीने शाळेत येतो. विद्यार्थ्यांना समजून घेऊन शिकवल्याने सविताताई विद्यार्थ्यांच्या लाडक्या बाई आहेत. त्यांच्याच भाषेत सांगायचे तर, ‘मी विद्यार्थ्यांची विद्यार्थी माझे!’

स्वाती केतकर- पंडित swati.pandit@expressindia.com

Story img Loader