युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन
प्रथमेश आडविलकर itsprathamesh@gmail.com
* विद्यापीठाची ओळख -अमेरिकेतील अॅन अबरेरमध्ये असलेले मिशिगन विद्यापीठ (युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन) हे अमेरिकेतील एक महत्त्वाचे विद्यापीठ आहे. मिशिगन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या विद्यापीठाचा क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार जागतिक क्रमवारीत विसावा क्रमांक आहे. या विद्यापीठाची स्थापना १८१७ साली झालेली आहे. मिशिगन हे शासकीय संशोधन विद्यापीठ आहे.
‘ arts knowledge truth ‘ हे या विद्यापीठाचे ब्रीदवाक्य आहे. मिशिगन विद्यापीठ एकूण ७८० एकर क्षेत्रफळामध्ये पसरलेले आहे. सध्या मिशिगनमध्ये जवळपास सात हजार प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत असून जवळपास ४६,००० पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण पूर्ण करत आहेत. विद्यापीठाचा अॅन अबरेर येथील मुख्य परिसर चार इतर छोटय़ा परिसरांमध्ये विभागाला गेला आहे. उत्तम दर्जाचे संशोधन करणाऱ्या पहिल्या शंभर विद्यापीठांमध्ये या विद्यापीठास स्थान मिळालेले आहे. अमेरिकेतील सर्व विद्यापीठांचे नेतृत्व करणाऱ्या ‘असोसिएशन ऑफ अमेरिकन युनिव्हर्सिटीज’ या संस्थेची स्थापना करण्याचा मान मिशिगन विद्यापीठाकडे जातो.
* अभ्यासक्रम – मिशिगन विद्यापीठातील पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम हे चार वर्षांचे संशोधन अभ्यासक्रम आहेत तर बहुतांश पदव्युत्तर अभ्यासक्रम हे दोन वर्षांचे आहेत. हे सर्व अभ्यासक्रम ‘हायर लर्निंग कमिशन’ या संस्थेकडून मान्यताप्राप्त आहेत. विद्यापीठामध्ये सर्व मिळून एकोणीस प्रमुख विभाग (स्कूल्स) आहेत. यामध्ये इंजिनीअरिंग, आर्ट्स अॅण्ड डिझाइन, बिझनेस, डेंटिस्ट्री, आर्किटेक्चर, एज्युकेशन, एन्व्हायर्नमेंट अॅण्ड सस्टेनेबिलिटी, इन्फोम्रेशन, लॉ, मेडिसिन, म्युझिक, थियेटर, डान्स आर्ट्स अॅण्ड सायन्सेस, नìसग, पब्लिक पॉलिसी या विभागांचा समावेश आहे. विद्यापीठातील या विभागांच्या माध्यमातून सर्व पदवी, पदव्युत्तर व पीएचडी अभ्यासक्रम चालवले जातात. मिशिगन विद्यापीठामध्ये एकूण २६३ अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. पदवी अभ्यासक्रमांसाठी सरासरी दर १५ विद्यार्थ्यांमागे एका अध्यापकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व विभागांमधून विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी वा संशोधन पातळीवरील अभ्यासक्रमांचे सर्टििफकेट, ऑनलाइन व ऑफलाइन पर्याय विद्यापीठाने उपलब्ध करून दिले आहेत. अमेरिकेमध्ये सर्व विद्यापीठांच्या प्रत्येक अभ्यासक्रमांचे स्वतंत्र मूल्यमापन केले जाते. त्यानुसार मिशिगन विद्यापीठाचे १०२ अभ्यासक्रम हे ‘टॉप टेन’ या यादीमध्ये निवडले गेले आहेत.
* सुविधा – मिशिगन विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्क, शैक्षणिक कर्ज, निवास व भोजन आदी सुविधा बहाल केल्या आहेत. विद्यापीठाच्या परिसरात जवळपास दहा हजार विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय उपलब्ध आहे. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून शिष्यवृत्ती दिली जाते. पदवी स्तरावर विद्यापीठाच्या प्रत्येक तीन विद्यार्थ्यांपैकी किमान दोन विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिली जाते. विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाकडून करिअर मदत केंद्र, क्रीडा सुविधा व स्टुडंट एम्प्लॉयमेंट ऑफिससारख्या सोयी विद्यापीठ परिसरातच उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. मिशिगन विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडून ‘द मिशिगन डेली’ हे वर्तमानपत्र चालवले जाते. विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांनी विविध खेळांमध्ये सहभागी व्हावे म्हणून प्रोत्साहन दिले जाते. विद्यापीठाच्या क्रीडा संघाला ‘व्होल्व्हरिन्स’ या नावाने संबोधले जाते.
* वैशिष्टय़- मिशिगनच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये अमेरिकेतील राजकारण, चित्रपट, उद्योग, व्यवस्थापन, संशोधन, पत्रकारिता व कायदा क्षेत्रातील अनेक नामवंतांचा समावेश आहे. विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष गेराल्ड फोर्ड, जेरोम कार्ल व स्टॅनले कोहेनसारखे नोबेलविजेते शास्त्रज्ञ, मायकेल डन व डॅरेन ख्रिससारखे हॉलीवूडमधील अभिनेते इत्यादींचा समावेश आहे. विद्यापीठाने पाच लाखांपेक्षाही अधिक माजी विद्यार्थ्यांचे जाळे विणलेले आहे, जे सध्याच्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी मदत करते. २०१८ पर्यंतच्या सांख्यिकीनुसार, आतापर्यंतचे एकूण २५ नोबेल पारितोषिक विजेते, ५० मॅकआर्थर फेलोज व ६ टय़ुरिंग पुरस्कार विजेते हे या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. विद्यापीठातील अनेक प्राध्यापक गुगनहेम फेलोज व पुलित्झर पुरस्कार विजेते आहेत.
* संकेतस्थळ – https://umich.edu/