आजच्या लेखामध्ये सामान्य अध्ययन पेपर-२ मधील आंतरराष्ट्रीय संघटना या अभ्यास घटकाविषयी चर्चा करूयात. आंतरराष्ट्रीय संघटना कुणाला म्हणायचे? त्यांचे स्वरूप, उद्दिष्टे याविषयी जाणून घेऊ. आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले हितसंबंध व उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संघटनेच्या रूपामध्ये राष्ट्रे संघटित होत असतात.

आंतरराष्ट्रीय संघटना राष्ट्रांमधील सामाजिक, आर्थिक, राजकीय व सुरक्षाविषयक सहकार्य सुलभ करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडतात. युद्धे किंवा संघर्षांचे प्रसंग टाळून जागतिक शांतता व सुव्यवस्था राखण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आंतरराष्ट्रीय स्तरावरील बहुतांश संघटना १९व्या शतकामध्ये उदयास आल्या व २०व्या शतकामध्ये त्यांचा विकास झाला. २१व्या शतकाच्या प्रारंभी राष्ट्र, राज्ये व अशासकीय घटकांबरोबरच आंतरराष्ट्रीय संघटना आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा अत्यावश्यक भाग बनल्या.

सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघटनांमध्ये खासगी व सार्वजनिक, वैश्विक व प्रादेशिक, बहुउद्देशीय व विशेषीकृत अशा सविस्तर संरचना दिसून येतात. सामान्य अध्ययन पेपर २ साठी संयुक्त राष्ट्रसंघ व त्याच्याशी संबंधित इतर संस्था यामध्ये युनिसेफ, युनेस्को, यूएनईपी, जागतिक आरोग्य संघटना या व या प्रकारची इतर अभिकरणे, जागतिक व्यापार संघटना, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक, एशियन डेव्हलपमेंट बँक, आसियान, युरोपीयन संघ, ओईसीडी, ओपेक, अरब लीग, इ. संघटनांचे अध्ययन महत्त्वपूर्ण ठरते. उपरोक्त संघटना अभ्यासताना त्यांची संरचना अधिदेश (mandate) या बाबी लक्षात घेणे महत्त्वपूर्ण ठरेल. या घटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांमध्ये समकालीन मुद्दय़ांच्या पाश्र्वभूमीवर प्रश्न विचारण्यात येतात.

‘ट्रेड वॉर’च्या पाश्र्वभूमीवर जागतिक व्यापार संघटनेला टिकून राहावे लागेल. विशेषत: भारताचे हितसंबंध लक्षात घेऊन सुधारणांकरिता कोणकोणती प्रमुख क्षेत्रे आहेत.

सदर प्रश्न सध्या जागतिक व्यापार संघटनेच्या व्यासपीठावर अनेक देशांमध्ये सुरू असणाऱ्या व्यापार युद्धाच्या पाश्र्वभूमीवर अभ्यासता येईल. या प्रश्नावरून आंतरराष्ट्रीय संघटना या घटकाचा अभ्यास समकालीन घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर करावा लागतो ही बाब स्पष्ट होते.

* २०१७

संयुक्त राष्ट्रसंघाच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेची प्रमुख कार्ये कोणती? या परिषदेशी संबंधित विविध प्रकार्यात्मक आयोग स्पष्ट करा.

* २०१६

‘जागतिकीकरणाच्या युगात जागतिक व्यापार संघटनेची लक्ष्य व उद्दिष्टे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे व्यवस्थापन व प्रोत्साहन देणे ही आहेत. परंतु, प्रगत व प्रगतशील देशांमधील विवादांमुळे दोहा परिषदेचा अस्त झाल्याचे दिसते. भारतीय परिप्रेक्ष्यामध्ये चर्चा करा.

युनेस्कोच्या मॅकब्राइड आयोगाची उद्दिष्टे काय आहेत? यावर भारताची भूमिका काय आहे?

* २०१४

WTO  ही महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय संघटना आहे. जिथे घेतलेल्या निर्णयाचा सदस्य देशांवर दूरगामी परिणाम होतो.  WTO चा अधिदेश (mandate) काय आहे व  WTO चे निर्णय बंधनकारक असतात का? अलीकडच्या अन्नसुरक्षेवरील चच्रेच्या फेरीमध्ये भारताने घेतलेल्या भूमिकेचे टीकात्मक विश्लेषण करा. या प्रश्नामध्ये  WTO शी संबंधित पारंपरिक घटकांबरोबरच समकालीन घडामोडीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला.

* २०१३

‘जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधी एकत्रितपणे ब्रेटनवुड्स संस्था म्हणून ओळखल्या जातात; जे जागतिक, आर्थिक व वित्तीय सुव्यवस्थेच्या संरचनेला साहाय्यभूत ठरणारे दोन आंतरसरकारी स्तंभ आहेत. वरकरणी जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कित्येक समान वैशिष्टय़े दर्शवतात. तरीही त्यांची भूमिका व अधिदेश (Mandate) स्पष्टपणे वेगळे आहेत, विशद करा.

या प्रश्नामध्ये या दोन संघटनांची संरचना, ते पार पडत असलेली भूमिका कशा प्रकारे वेगळी आहे, असे विचारण्यात आले. या दोन संघटनांची काही वैशिष्टय़े समान असली तरी त्यांची रचना भिन्न आहे. कटा ही एकल संस्था असून विश्व बँक ही काही संस्था व अभिकरणांची मिळून बनली आहे. हे मुद्दे उत्तरामध्ये नमूद करावे लागतील. आंतरराष्ट्रीय संघटना या घटकाची तयारी संबंधित माहिती संघटनांच्या संकेतस्थळावर मिळते. त्याचबरोबर वृत्तपत्रांचे नियमित वाचन या घटकाशी संबंधित घटनांचे आकलन करून घेण्यास उपयुक्त ठरते.

Story img Loader