आजच्या लेखामध्ये आपण भारतीय वारसा आणि संस्कृती या घटकातील चित्रकला, साहित्य आणि उत्सव या मुद्दय़ांची चर्चा करणार आहोत. भारतातील सांस्कृतिक इतिहासाची सुरुवात सिंधू संस्कृतीपासून करावी लागते. काही वेळा यावर विचारण्यात येणारे प्रश्न प्रागतिहासिक इतिहासाशी संबंधितही विचारले जातात पण हे प्रश्न त्या पुढील काळातील घटनांना जोडून विचारले जातात. अर्थात याचे स्वरूप तुलनात्मक पद्धतीचे असते. या घटकावर विचारण्यात येणारे प्रश्न हे काही वेळा विशिष्ट माहितीला गृहीत धरून विचारले जातात म्हणून या विषयाशी संबंधित संकीर्ण माहिती अचूकपणे अभ्यासावी लागते. तसेच अनेक मुद्दय़ांवर अजूनही प्रश्न विचारण्यात आलेले नाहीत. या विषयाचे स्वरूप हे पारंपरिक पद्धतीचे असल्यामुळे याचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे.
मागील परीक्षेत विचारलेले प्रश्न आणि त्याचे आकलन कसे करावे याचे स्पष्टीकरण
* ‘गुप्त काळातील नाणीशास्त्र कलेमधील उत्कृष्टतेची पातळी नंतरच्या काळात मुळीच लक्षणीय नाही. तुम्ही या मताला कशा प्रकारे योग्य सिद्ध कराल?’ (२०१७)
भारतात नाणीशास्त्रामध्ये जी प्रगती झालेली होती याचे महत्त्वाचे कारण, गुप्त काळाच्या अगोदरपासूनच भारताचे युरोपमधील ग्रीक व रोमन साम्राज्यासोबत संबंध प्रस्थापित झालेले होते. युरोपमधील नाणीशास्त्र हे भारताच्या तुलनेत अधिक विकसित होते आणि याचा प्रसार भारतातही झाला आणि येथील सत्तेनेही या नाणीशास्त्राचे अनुकरण केले. गुप्त कालखंडाच्या शेवटी भारताचा रोमन साम्राज्यासोबत व्यापार संपुष्टात आलेला होता आणि भारतात गुप्तनंतरच्या काळात भारतीय सरंजामशाहीचा उदय झालेला होता, ज्यामुळे नंतरच्या काळात गुप्त काळातील नाणीशास्त्र कलेमधील उत्कृष्टतेची पातळी पाहावयास मिळत नाही असे मानले जाते. अशा पद्धतीने संकीर्ण माहितीचा आधार देऊन उत्तर लिहिणे अपेक्षित आहे.
* ‘विजयनगर साम्राज्याचा राजा कृष्णदेवराय हा फक्त एक कुशल विद्वानच होता असे नाही, हा विद्या आणि साहित्याचाही आश्रयदाता होता, चर्चा करा.’ (२०१६)
हा प्रश्न एका व्यक्तीच्या कार्याशी संबंधित आहे. या प्रश्नाचे योग्य पद्धतीने उत्तर लिहिण्यासाठी राजा कृष्णदेवराय याचे सांस्कृतिक योगदान नेमके काय होते याची माहिती असणे गरजेचे आहे. तो कशा प्रकारे एक कुशल विद्वान होता हे उदाहरणासह स्पष्ट करावे लागते. तसेच त्याच्या दरबारात असणारे विद्वान आणि त्यांनी लिहिलेले साहित्य याची थोडक्यात माहिती देऊन याने विद्या आणि साहित्यवाढीसाठी कशा पद्धतीने विद्वानांना राजाश्रय दिलेला होता इत्यादी सर्व पलूंचा आधार घेऊन चर्चात्मक पद्धतीने उत्तर लिहिणे येथे अपेक्षित आहे.
* ‘आधुनिक चित्रकलेच्या तुलनेत भारतातील मध्याश्मयुग शिल्प स्थापत्य हे फक्त त्यावेळेचे सांस्कृतिक जीवनच दर्शवत नसून त्यामधील सुरेख सौंदर्यसुद्धा दाखवते, या भाष्याचे चिकित्सक मूल्यमापन करा.’ (२०१५)
या प्रश्नाचे व्यवस्थित आकलन केल्यास असे दिसून येते की मध्याश्म युगातील कलेचा सर्वात आधी आढावा घ्यावा लागतो. या काळातील मानवाने नैसर्गिक गुहांमध्ये चित्रकला केलेली आहे आणि या चित्रकलेच्या माध्यमातून तत्कालीन जीवनाचे रेखाटन केलेले आहे व याचे सद्य:स्थितीतील पुरावे भारतात भीमबेटका येथे उपलब्ध आहेत. या चित्रकलेची वैशिष्टय़े व यातील सुरेखपणा आणि याची तुलना आधुनिक चित्रकलेशी करून आधुनिक चित्रकलेची वैशिष्टय़े पण नमूद करावी लागतात. तसेच या दोन्ही बाबींचा एकत्रित विचार करून मूल्यमापन करावे लागते. अर्थात यामध्ये यातील समानता आणि भिन्नता अशा अनुषंगाने चिकित्सा करणे अपेक्षित आहे.
* ‘सुरुवातीच्या भारतीय शिलालेखामध्ये नोंद करण्यात आलेल्या ‘तांडव’ नृत्याची चर्चा करा.’ (२०१३)
हा प्रश्न संकीर्ण माहितीबरोबरच तांडव नृत्याची माहिती या दोन बाबी लक्षात घेऊन विचारण्यात आलेला आहे हे सर्वप्रथम लक्षात घेतले पाहिजे. या कलेची माहिती शिलालेखामध्ये तर मिळतेच पण लेणी, मंदिरे, तसेच साहित्यात पण माहिती उपलब्ध आहे. या प्रश्नामध्ये शिलालेखामधील माहितीच्या आधारे चर्चा करणे अपेक्षित आहे तसेच या शिलालेखाची माहिती म्हणजे कोणत्या कालखंडातील शिलालेख, त्याचे नाव इत्यादी विशिष्ट माहिती देऊनच चर्चा करावी लागते.
उपरोक्त विश्लेषणावरून विचारण्यात आलेल्या प्रश्नांची योग्य उकल करण्यासाठी नेमक्या कोणत्या पलूंचा विचार करावा लागतो याची एक स्पष्ट समज येते. या विषयाचा आवाका मोठा आहे आणि बहुतांश प्रश्नांना संकीर्ण माहितीचा आधार द्यावा लागतो म्हणून या विषयाशी संबंधित संकीर्ण माहितीचाही अभ्यास आवश्यक आहे.
या घटकाची मूलभूत माहिती अभ्यासण्यासाठी सर्वप्रथम एनसीईआरटीच्या शालेय पुस्तकांचा आधार घ्यावा लागतो. इयत्ता ११वीचे An Introduction to Indian Art Part – क हे पुस्तक सर्वप्रथम अभ्यासणे गरजेचे आहे, तसेच १२वीचे Themes in Indian History Part – I आणि कक. जुन्या एनसीईआरटीच्या प्राचीन आणि मध्ययुगीन भारत या पुस्तकातील भारतीय वारसा आणि संस्कृती संबंधित कालखंडनिहाय अभ्यास करावा. त्याचबरोबर The Wonder That Was Indian Basaham या संदर्भ पुस्तकातून या मुद्दय़ांचा अधिक सखोल आणि सर्वागीण पद्धतीने अभ्यास करता येऊ शकतो.