’ पर्यटन छायाचित्रण –
तुम्हाला छायाचित्रण करण्याचा आणी निसर्ग भ्रमंतीचा छंद आहे का? तर पर्यटन छायाचित्रण हा तुमच्यासाठी एक चांगला करिअर पर्याय ठरू शकतो. एखाद्या पर्यटनस्थळाची उत्तमोत्तम छायाचित्रे घेऊन त्यातून त्या ठिकाणाची नैसर्गिक, भौगोलिक, सांस्कृतिक वास्तव जसेच्या तसे दर्शकांसमोर ठेवणे हे या छायाचित्रकारांचे काम असते. ही छायाचित्रे वृत्तपत्रे, प्रवासविषयक मासिके, वृत्त वाहिन्या किंवा दूरदर्शन वाहिन्या यांच्याकडूनही प्रकाशित केली जातात. छायाचित्रणाचा हा छंद तुम्ही मुक्त व्यावसायिक म्हणून जोपासू शकता. तुम्ही स्वत:चा फोटोब्लॉगही चालवू शकता.
या व्यवसायात तुम्हाला स्वत:च संधी शोधाव्या लागतील. उदा. पर्यटन कंपन्यांना, जाहिरातींसाठी किंवा ब्रोशर्ससाठी छायाचित्रांची गरज भासते त्यावेळी मुक्त छायाचित्रकार त्यांना ते पुरवू शकतात. काही वेळा या पर्यटन कंपन्या आपल्या सहलींचे विशेष छायाचित्रण करून घेतात. त्यासाठीही तुम्ही काम करू शकता. तसेच अनेक हॉटेल्स वेबसाइट बनवण्यासाठी किंवा जाहिरातींसाठी म्हणून खास छायाचित्रण करून घेतात. प्रवास पर्यायांचे किंवा हॉटेल्सचे ऑनलाइन बुकिंग करण्यासाठी साइट्सना या छायाचित्रणाची गरज भासते.
पर्यटन छायाचित्रकार व्हायचे असेल तर महत्त्वाचे म्हणजे भटकण्याची आवड हवी. छायाचित्रणाच्या तांत्रिक बाबींचे उत्तम ज्ञान हवे. त्यातील योग्य ते प्रशिक्षणही हवे. निसर्गाची आवड, उत्तम संवाद कौशल्यसुद्धा गरजेचे आहे. अतिशय महत्त्वाचे म्हणजे कामाचे फिरते आणि अनियमित स्वरूप पाहता निरोगी शरीरप्रकृतीही आवश्यक असते. छायाचित्रणाचे रीतसर प्रशिक्षण तुम्ही नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फोटोग्राफी, मुंबई इथूनही घेऊ शकता.
* विशिष्ट उद्देशाने केलेले पर्यटन –
साहसी पर्यटन हा गेल्या काही वर्षांत नव्याने उदयास येऊ लागलेला प्रकार. आता खासगी किंवा सरकारी संस्थांच्या प्रयत्नांतून अनेक स्थळे अशा प्रकारे विकसित होत आहेत. कोकण किंवा केरळ किनारपट्टीवरील अनेक आडवाटांवरच्या पर्यटनस्थळांना लोक आवर्जून भेटी देऊ लागले आहेत. काही पर्यटनस्थळे तेथील साहसी खेळांसाठी प्रसिद्ध होत आहेत. हिमालयाच्या किंवा सह्य़ाद्रीच्या रांगातून विशिष्ट मोसमात ट्रेकिंग करणारे अनेक ग्रुप्स तयार होतायत. अशा प्रकारे ट्रेक टूर्सही अरेंज करणाऱ्या संस्था वाढत आहेत. एकूणच पर्यटनाच्या या वेगळ्या प्रकाराकडेही आता विशेष लक्ष दिले जातेय. त्यामुळेच साहसी पर्यटनातील संधींची वाढ होत आहे. साहस शिबिरांसारख्या प्रकारांनाही लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
वेगवेगळ्या साहसी खेळांचा अनुभव घेण्यासाठी किंवा अशा खेळांचे प्रशिक्षण घेण्यासाठी साहसी पर्यटन प्रसिद्ध होतेय. तर वैद्यकीय उपचारांसाठी एखाद्या विशिष्ट ठिकाणी जाणे म्हणजे वैद्यकीय पर्यटन लोकांना आकर्षून घेत आहे. उदा. केरळ. काही वेळा खेळांचे प्रशिक्षण घेण्यासाठी किंवा खेळांचे सामने पाहण्यासाठी, खेळांच्या स्पर्धामधून सहभागी होण्यासाठी लोक पर्यटन करतात, त्यालाच क्रीडा पर्यटन म्हटले जाते. तर उद्योगाच्या उभारणीसाठी आवश्यक जागेची निवड करणे, कारखाने, औद्योगिक प्रदर्शन, परिसंवाद, कंपन्यांच्या वरिष्ठ वर्गाच्या सभा, चर्चासत्रे यानिमित्तानेही आता पर्यटन केले जाते. याला औद्योगिक पर्यटन म्हटले जाते.
हे उपक्रम पार पाडण्यासाठी विविध स्तरांवर कर्मचारी वर्गाची नेमणूक केली जाते. सदस्यांसाठी प्रशिक्षण, माहिती, मनोरंजन, निवास, भोजन याची व्यवस्था करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची निवड केली जाते. यातूनच इच्छुकांसाठी संधींची द्वारे खुली होत आहेत. गरज आहे, ती फक्त त्या संधी योग्य वेळी पटकावण्याची.