मुलाखतीसाठी उमेदवाराने परिधान केलेल्या पेहरावातून, उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पलू अभिव्यक्त होत असतात. पेहराव हा अभाषिक (Non-Verbal) मुलाखतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. मुलाखत मंडळासमोर उभे झाल्यानंतर, मंडळासमोर असते ती उमेदवाराची बाह्य छबी! फर्स्ट इम्प्रेशन हे चांगलेच असायला हवे. या प्रथमदर्शनात उमेदवाराचा पेहराव मोलाची भूमिका बजावते.
मुलाखतीला कोणता पेहराव करायचा, हा साधारणपणे सर्वच उमेदवारांना पडणारा एक प्रश्न आहे. प्रत्येकाला आवडणारा पोशाख, रंग हा त्याला चांगला दिसेलच याची खात्री नसते. उमेदवाराचे व्यक्तिमत्त्व आणि वर्णानुसार त्या त्या रंगांचे कपडेच त्याला शोभून दिसतात. या संदर्भात मार्गदर्शकांशी चर्चा करूनच निर्णय घ्यावा. स्वत:च्या सादरीकरणाबाबत तुम्ही किती जागरूक आहात, तुमचे गांभीर्य/ बेफिकीरपणा, सहजता/ अवघडलेपणा या सगळ्या गोष्टी तुमचे कपडे, परफ्यूम, दागिने, केशरचना इत्यादींच्या निवडीवरून जोखता येतात. मुलाखत मंडळाचे सदस्य तुमच्या प्रत्येक लहानसहान गोष्टीचीही दखल घेत असतात. अशा बारकाव्यांतूनच त्यांचे तुमच्याविषयी अनूकूल अथवा प्रतिकूल मत बनत असते. म्हणूनच आपला प्रत्येक निर्णय हा योग्य विचाराअंतीच घेतला पाहिजे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुलाखती सर्वसाधारणपणे एप्रिल, मे महिन्यात होतात. राज्य लोकसेवा आयोगाच्या मुलाखती कोणत्या महिन्यात येतील, याचे निश्चित वेळापत्रक मांडता येत नाही. पेहराव निश्चित करताना मुलाखतीचा काळ, हवामान या बाबी लक्षात घेणे आवश्यक असते.  हवामानानुसार आरामदायी ठरतील असेच कपडे मुलाखतीसाठी निवडा.
मुलाखतीसाठी पुरुष उमेदवारांनी सूट-टाय किंवा महिला उमेदवारांनी साडी नेसावी असा आयोगाचा काही नियम नाही. श्री. मदन नागरगोजे (आयएएस अधिकारी)  यांनी मुलाखतीसाठी सूट-टाय असा पोशाख परिधान केला होता. पण त्यासाठी प्रत्यक्ष मुलाखतीच्या काही दिवस आधीपासून त्या पेहरावाची सवय केली होती. श्री. हेमंत िनबाळकर (आयपीएस अधिकारी) यांनी सॉफ्ट कलरचा शर्ट आणि चेरी कलरचा टाय परिधान केला होता. मुलाखत मंडळातील सदस्यांनी सुरुवातीला ‘वेल ड्रेस्ड!’ अशी टिप्पणी दिली. तद्नंतर एका सदस्यांनी ‘तुम्हाला टाय बांधता येतो का?’ असा प्रश्न विचारला होता. ‘टाय बांधता येत नाही, आज मी पहिल्यांदाच मुलाखतीसाठी टाय बांधून घेतला आहे,’ असे दिलखुलास उत्तर श्री. िनबाळकर यांनी दिले होते. उमेदवाराचा प्रामाणिकपणा, प्रांजळपणा मुलाखत मंडळाला भावतो.
* पेहरावाची निवड करताना एक नियम सर्वच पुरुष किंवा महिला उमेदवारांनी बंधनकारक मानला पाहिजे- मुलाखतीसाठी परिधान केला जाणारा पेहराव हा सौम्य, शालीनतादर्शक आणि सहज, स्वाभाविक वावरता येईल असा असावा.
* महिला व पुरुष दोघांनीही एखादा धर्म, राजकीय पक्ष अशा कशाशीही बांधीलकी दर्शवणाऱ्या पेहरावाचा अथवा अ‍ॅक्सेसरीजचा अजिबात वापर करू नये.
* खास मुलाखतीसाठी म्हणून खरेदी केलेले नवे कोरे कपडे परिधान करून जाण्याचे टाळावे. कपडे नवे असायला हरकत नाही, पण ते मुलाखतीपूर्वी एक-दोन वेळा वापरलेले असावेत. मुलाखत म्हणजे सण- समारंभ नव्हे की तुम्ही नवे/ खूप महागडे कपडे घडी मोडून त्या दिवशी पहिल्यांदाच घालायला हवे.
* कपडे भडक रंगाचे, स्टायलिश नसावेत. कार्यालयीन वातावरणामध्ये शोभतील असे असावेत.
* तीव्र सुगंध असलेल्या परफ्यूमचा वापर करू नये.
पुरुषांसाठी आदर्श पेहराव
* सूट घालणार असाल तर तो लाउंज सूट किंवा ब्लेझरप्रमाणे वापरू शकता.
* वापरायचाच असेल तर टाय एकाच रंगाचा किंवा ठिपक्यांचाच वापरावा. नक्षीचा नको.
* सफारी सूट, डबल ब्रेस्टेडसूट, ओपन गळ्याचे (कॉलरशिवायचे) शर्ट, टीशर्ट जीन्सही नकोत.
* योग्य बेल्टचा वापर करावा.
* कागदपत्रे आणि जाडजूड वॉलेटने खिसे फुगवू नयेत.
* जे बूट तुम्ही वापरताना तुम्हाला
आरामदायी वाटते अशांचाच वापर करावा. बुटांना पॉलिश केलेले असावे. खूप भडक, स्पोर्ट्स किंवा जॉिगग शूजचा वापर करू नये.
* केस, दाढी, मिशा मुलाखतीच्या एक-दोन दिवसांपूर्वी व्यवस्थित केलेल्या असाव्यात.
महिलांसाठी आदर्श पेहराव
* साडी, सलवार कमीज किंवा वेस्टर्न फॉर्मल सूट असा कोणताही पेहराव निवडावा.
* खुप मोठय़ा बॉर्डरची, भडक रंगांची, अ‍ॅबस्ट्रॅक्ट नक्षीची साडी वापरणे टाळावे.
* सलवार कमीजच्या बाबतीत व्यवस्थित रंगसंगती जुळणारा होणारा दुपट्टा
आवश्यक आहे.
* खूप घट्ट अथवा ढिले फिटिंग नसावे.
* ठळक दागिने वापरू नयेत. पैंजण अजिबातच नको.
* मुलाखतीसाठी मेकअप करून जाण्याचे टाळावे. यामुळे तुमचे व्यक्तिमत्त्व बनावट व उथळ भासते, शिवाय मेकअपची सवय नसेल तर तुम्हाला वावरताना सहजता जाणवणार नाही.
* चालताना आवाज होऊ नये, आत्मविश्वासाने चालता यावे अशाच चप्पल / सँडलचा वापर करावा. एक ते दीड इंचापेक्षा जास्त उंच टाचेची चप्पल / सँडल वापरणे टाळावे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा