विद्यार्थ्यांनी दहावी किंवा बारावीनंतर आपल्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे हे ठरविण्यासाठी स्वत:च्या मनाचा वेध घ्या. स्वत:ला कोणते विषय आवडतात ते समजून घ्या. त्यानंतर करिअरची दिशा निवडा. सध्याचे विद्यार्थी हे भवताली सुरू असणाऱ्या स्पर्धेत अडकलेले दिसून येतात. या स्पर्धेत ते स्वत:ला हरवून बसतात. त्यामुळे करिअरची दिशा निवडताना स्वत:ला ओळखायला हवे. असा मौलिक सल्ला मनोविकारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यांनी विद्यार्थ्यांना दिला. प्रत्येक विद्यार्थ्यांची विचारपद्धती, कलागुण त्याची आवड – निवड या पूर्णत: भिन्न असतात. त्यामुळे पालकांनीदेखील या गोष्टी लक्षात घ्यायला हव्या. विद्यार्थ्यांच्या पसंतीनुसार करिअरची पुढील दिशा ठरली तर त्यांना नक्कीच यश मिळू शकते. कारण विद्यार्थी त्यात स्वत:ला झोकून देऊन अभ्यास करतात. अनेकदा करिअर निवडताना नेमक्या कोणत्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा, अशा संभ्रमावस्थेत पालक आणि विद्यार्थी वर्ग दिसून येतो. यामुळे मानसिक तणावात वाढ होते.
तणावात वाढ झाल्याने करिअर निवडीच्या निर्णयातही चूक होऊ शकते. अशा परिस्थितीत पालकांनी स्वत: गोंधळून न जाता विद्यार्थ्यांची मन:स्थिती समजून घ्यावी. त्यांचे करिअर बाबतीत काय विचार आहेत, हे ऐकून घेऊन त्यानुसार पुढील निर्णय घ्यावेत. यामुळे भविष्यातील बऱ्याचशा अडचणी आपोआप दूर होतात. असे मत डॉ. बर्वे यांनी व्यक्त केले. करिअर निवडताना जसे सद्य:परिस्थिती काय आहे हे जाणून घेणे जसे महत्वाचे तसेच दूरदृष्टी ठेवणेसुद्धा तितकेच गरजेचे आहे. दहावी आणि बारावी हे करिअरच्या दृष्टीने महत्वाचे टप्पे आहेत. या वळणांवर जर विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी मानसिक तणावाखाली करिअरचे निर्णय घेण्याचे परिणाम दूरगामी ठरतात. त्यामुळे ताण कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वत:ची आवड, छंद आणि विविध कला जोपासाव्यात. यामुळे विद्यार्थी कायम प्रसन्न राहतात. प्रसन्न राहिल्याने कायम सकारात्मक विचार येतात. हेच सकारात्मक विचार करिअर निवडीच्या बाबतीत मोलाची भूमिका बजावतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनीदेखील तणावमुक्त राहण्यासाठी कायम एकमेकांशी संवाद ठेवावा.