प्रथमेश आडविलकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमेरिकेतील पेन्सिल्वेनिया या राज्यातील पिट्सबर्ग शहरात असलेले कान्रेजी मेलन विद्यापीठ (सीएमयू) हे एक प्रमुख खासगी संशोधन विद्यापीठ आहे. २०१९ सालच्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सटिी रँकिंगनुसार जागतिक क्रमवारीत या विद्यापीठाचा सेहेचाळीसवा क्रमांक आहे. या विद्यापीठाची स्थापना इसवी सन १९०० साली अँड्रय़ू कान्रेजी या तत्कालीन श्रीमंत उद्योगपतीने ‘कान्रेजी टेक्निकल स्कूल्स’ या नावाने केली होती. १९१२ साली त्या संस्थेला विद्यापीठाचे स्वरूप देऊन तिचे ‘कान्रेजी इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ असे नामकरण करण्यात आले. १९६७ मध्ये या संस्थेचे ‘मेलन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडस्ट्रियल रिसर्च’ या अमेरिकेतील दुसऱ्या एका तांत्रिक संस्थेबरोबर विलीनीकरण करण्यात आले. विलीनीकरणानंतर नव्या संस्थेने ‘कान्रेजी मेलन विद्यापीठ’ हे नाव ग्रहण केले. विद्यापीठाचा मुख्य कॅम्पस पिट्सबर्ग शहरातच आहे. त्याशिवाय कॅलिफोर्नियामधील ‘सिलिकॉन व्हॅली’मध्ये दुसरा कॅम्पस तर तिसरा मध्यपूर्वेत आंतरराष्ट्रीय कॅम्पस ‘कतार’ येथे आहे. तसेच विद्यापीठ वीसपेक्षाही अधिक संशोधन संस्थांसह शैक्षणिक कराराच्या माध्यमातून जोडले गेले आहे. पिट्सबर्गमधील कान्रेजी मेलन विद्यापीठाचा मुख्य कॅम्पस जवळपास अडीचशे एकरमध्ये पसरलेला आहे. शिकागोमधील कॅम्पस एकशे चाळीस  एकरांमध्ये व्यापलेला आहे. सध्या कान्रेजी मेलनमध्ये शंभराहून अधिक देशांमधून आलेले एक हजारांहूनही अधिक प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत आहेत. जवळपास पंधरा हजार पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण पूर्ण करत आहेत.

अभ्यासक्रम – कार्नेजी मेलन विद्यापीठात सात प्रमुख विभाग (कॉलेजेस) आणि इतर काही स्वतंत्र विभाग आहेत. यामध्ये कॉलेज ऑफ इंजिनीअिरग, कॉलेज ऑफ फाइन आर्ट्स, डेट्रिक कॉलेज ऑफ ह्युमॅनिटीज अ‍ॅण्ड सायन्सेस, मेलन कॉलेज ऑफ सायन्स, टेपर स्कूल ऑफ बिझनेस, कॉलेज ऑफ इन्फॉम्रेशन सायन्स अ‍ॅण्ड पब्लिक पॉलिसी, स्कूल ऑफ कॉम्प्युटर सायन्स हे सात विभाग आहेत. कान्रेजी मेलन विद्यापीठाचा पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षांचा आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा कालावधी वेगवेगळा आहे. कान्रेजी मेलन विद्यापीठ या सर्व विभागांच्या माध्यमातून हजारांहूनही अधिक अभ्यासक्रम सर्व स्तरांवर चालवते. विद्यापीठाकडे पदवी, पदव्युत्तर आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाबरोबरच ‘समर रिसर्च फेलोशिप्स’सारखे अभ्यासक्रमदेखील उपलब्ध आहेत. अभ्यासक्रमासाठी पर्यायांची भरपूर उपलब्धता असल्याने अभ्यासक्रम वा विषय निवडीसाठी विद्यापीठाचे स्वतंत्र कार्यालय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी सज्ज आहे. विद्यापीठातील अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीसाठी पदवी वा पदव्युत्तर स्तरासाठी आवश्यक असलेल्या जीआरई, टोफेल, सॅट, जीमॅट यांसारख्या प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे विद्यार्थ्यांसाठी गरजेचे आहे. २०१८ सालच्या ‘यूएस न्यूज अ‍ॅण्ड वर्ल्ड रिपोर्ट’च्या जागतिक अहवालानुसार विद्यापीठाचा संगणक विभाग हा जगातील प्रथम क्रमांकाचा शैक्षणिक व संशोधन विभाग आहे. तसेच २०१७ सालच्या हॉलीवूड रिपोर्टरच्या अहवालानुसार विद्यापीठाचा नाटय़ विभाग हा जगभरात दुसऱ्या क्रमांकाचा आहे.

सुविधा – कार्नेजी मेलन विद्यापीठाकडून बहुतांश आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत दिली जाते. विशेष म्हणजे विद्यापीठाचे बहुतांश विभाग स्वत: यामध्ये पुढाकार घेतात. विभागांकडे उपलब्ध असलेल्या एकूण निधीवर विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, पाठय़वृत्ती, शैक्षणिक शुल्कामध्ये कपात यांसारख्या पर्यायांचा वापर करण्याचे ठरवले जाते. विद्यापीठाने आपल्या परिसरात वसतिगृहांची सुविधा, कॅफेटेरिया, रेस्टॉरंट आणि इतर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. याव्यतिरिक्त विद्यापीठाच्या आवारात भरपूर क्लब्स आणि तत्सम केंद्रे आहेत. त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी प्रदर्शने, व्याख्याने, कॉन्सर्ट्स, परफॉर्मन्सेस आयोजित केली जातात. विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना वेळोवेळी करिअर मार्गदर्शन, आरोग्य आणि क्रीडा सुविधा दिल्या जातात.

वैशिष्टय़ – कार्नेजी मेलनच्या आजी-माजी प्राध्यापकांमध्ये वीस नोबेल विजेत्यांचा समावेश आहे. याशिवाय विद्यापीठाचे कित्येक माजी विद्यार्थी ऑस्कर व पुलित्झर पुरस्कार विजेते, टय़ुरिंग व ऱ्होड्स पुरस्कार विजेते आहेत. १४०पेक्षाही अधिक देशांतील एक लाखापेक्षा जास्त माजी विद्यार्थ्यांचे जाळे विणण्यात विद्यापीठाला यश आले आहे.

विद्यापीठाचे विशेषत: संगणक विज्ञान विभागातील प्राध्यापक-संशोधकांचे संशोधन क्षेत्राला असलेले योगदान वाखाणण्याजोगे आहे. विद्यापीठाच्या संगणक विज्ञान विभागातील संशोधन हे ‘पिट्सबर्ग सुपरकॉम्प्युटिंग सेंटर’, ‘रोबोटिक्स इन्स्टिटय़ूट’, ‘सॉफ्टवेअर इंजिनीअिरग इन्स्टिटय़ूट’ आणि ‘ह्य़ुमन- कॉम्प्युटर इंटरॅक्शन इन्स्टिटय़ूट’ यांसारख्या जागतिक दर्जाच्या संशोधन संस्थांशी संलग्न होऊन चालते. प्रायोजित संशोधन हा कान्रेजी मेलन विद्यापीठाचा प्रमुख उत्पन्नाचा स्रोत आहे. त्यामुळेच कान्रेजी मेलन हे अमेरिकेतील श्रीमंत विद्यापीठांपकी एक आहे.

संकेतस्थळ –   https://www.cmu.edu/

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Computer science major carnegie mellon university abn