कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे सोप्या भाषेत समजावयाचे झाले तर औद्योगिक घराण्यांची सामाजिक बांधिलकी हा विषय सगळ्यांनीच गांभीर्याने घेण्याचा आहे. मध्यंतरी सोशल नेटवर्कवर एक प्रश्न विचारण्यात आला होता की, रतन टाटांचे नाव जगातील श्रीमंतांच्या यादीत अंबानी, मल्ल्यांसारखे का झळकत नाही? याचे उत्तरही ‘सीएसआर’मध्येच आहे. ‘टाटा सन्स’ या मुख्य कंपनीची अधिकतर मालकी टाटांनी स्थापन केलेल्या सामाजिक ट्रस्टकडे असून रतन टाटांकडे म्हणजे कोणा एका व्यक्तीकडे नाही. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अर्थात ‘सीएसआर’ हे एखाद्या निसर्गचक्राप्रमाणे असते. जे काही समाज, पर्यावरणाकडून मिळाले तेच पुन्हा त्यांना अर्पण करणे हे त्याचे उदात्त तत्त्व असते. ‘सीएसआर’चे दृश्य स्वरूप खालीलप्रमाणे असू शकते –
१)    लोकांसाठी स्वस्त दरातील स्पेशालिटी रुग्णालयांची सोय – उदा. टाटा कॅन्सर मेमोरिअल हॉस्पिटल.
२)    एखादी महापालिकेची शाखा दत्तक घेणे – उदा. ‘एल अ‍ॅण्ड टी’ कंपनीने घेतलेली पवई येथील पालिकेची शाळा.
३)    निराधार मुलांना कपडेलत्ते पुरवणे – उदा. रेमंडचे कोणतेही लोकरी कपडे ग्राहकांनी खरेदी केल्यानंतर त्यातून मिळणाऱ्या नफ्यातून निराधार मुलांना कपडे मोफत पुरविण्याचा उपक्रम.
४)    आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या घरी असलेल्या कपडे, स्टेशनरी यासारख्या अधिकच्या वस्तू दुर्बल, उपेक्षित सामाजिक घटकांसाठी अत्यावश्यक असतात. अशा वस्तू एकत्र करून गरजू व्यक्तींना पुरवणे. उदा. कॅपजेमिनी कंपनीतील ‘वुई केअर’ प्रोग्राम.
५) समाजाचे आरोग्य जपणारे उपक्रम. उदा. कोलगेट कंपनीचा फ्री डेंटल चेक अप प्लॅन किंवा ‘एल. अ‍ॅण्ड टी.’ व कॅपजेमिनीतील रक्तदानाचा उपक्रम.
६)    एखादे खेडे दत्तक घेऊन तेथील पेयजलाचा प्रश्न सोडवणे, वृक्षारोपण करणे, सौर ऊर्जेच्या आधारे ते गाव स्वयंपूर्ण बनविण्यात हातभार लावणे. पण ‘सीएसआर’मधील गुंतवणूक ही कंपनी व समाजासाठी दोघांसाठी विन-विन परिस्थिती असली पाहिजे. कारण ते तसे नसल्यास कंपनीचा ‘सीएसआर’मधील रस लगेच आटू शकतो. म्हणूनच बघू या ‘सीएसआर’साठी आवश्यक असलेली तत्त्वे.
‘सीएसआर’साठी आवश्यक तत्त्वे
१)    ‘सीएसआर’ धोरण बनविण्यापूर्वी समाजाचे अंतर्मन जाणून घ्या. त्यांचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा समजून घ्या. त्यांना हव्या असलेल्या गोष्टींचा ‘सीएसआर’ धोरणामध्ये समावेश करा.
२)    ‘सीएसआर’संकल्पनेबद्दल ज्यांना मनापासून जिव्हाळा आहे, असे कर्मचारी शोधा. पण यामध्ये एक धोका असतो की, ती व्यक्ती समाज, पर्यावरण यांना अतिरेकी महत्त्व देऊन कंपनीच्या हिताला दुय्यम महत्त्व देऊ शकते तेव्हा ‘सीएसआर’ मधून कंपनीचे हित जोपासणाऱ्या व्यवस्थापकाची निवड करा. उदा. मार्केटिंग मॅनेजर, फॅसिलिटी मॅनेजर किंवा पॅकिंग मॅनेजर.
३)    ‘सीएसआर’फक्त कंपनीबाहेरच्या समाजासाठी नसावी तर कंपनीमधील कर्मचाऱ्यांसाठीही असावी. उदा. रासायनिक खतांऐवजी जैविक खतांचा वापर करून पिकविलेल्या भाज्या व फळे यांनाच कॅन्टीनच्या मेनूमध्ये फॅसिलिटी मॅनेजरने प्राधान्य द्यावे.
४)    ‘सीएसआर’ संदर्भात कर्मचाऱ्यांसाठी खास अ‍ॅवॉर्ड असावे. उदा. पॅकेजिंग मटेरिअलमध्ये रिसायकल मटेरियल वापरणाऱ्या व्यक्तीस, ५० वेळा रक्तदान करणाऱ्या व्यक्तीस, कॅन्टीनमधील अन्नाची नासाडी वाचविणाऱ्या व्यक्तीस वगैरे. यामुळे समाजाप्रती वचनबद्धता दिवसागणिक वाढत जाते.
५)    संवाद – कंपनी ‘सीएसआर’ अंतर्गत काय काय उपक्रम करत आहे, त्याचे फायदे कसे दिसत आहेत, त्यातील अडचणी काय आहेत, याबाबत कर्मचारी व समाजाशी वरचेवर संवाद साधावा. त्यासाठी कंपनीचा वार्षिक अहवाल, फेसबुक, कंपनी वेबसाइट यांचा वापर करावा.
६)    ‘सीएसआर’ मधील गुंतवणूक दीर्घकालीन असते व त्याचे दृश्य परिणाम/ फायदे दिसल्यास वेळ लागतो याची जाणीव असावी. ‘सीएसआर’ अंतर्गत ठरविलेली उद्दिष्टय़े सहजसाध्य असावीत व त्यांची प्रगती सहज मोजता यावी अशी असावी. उदा. पाच वर्षांत एक लाख झाडांचे वृक्षारोपण व संवर्धन, दोन वर्षांत गावातील चार पाझर तलावांची निर्मिती,
७)    ‘सीएसआर’ आपल्या प्रमुख व्यवसायाशी निगडित असावी. उदा. शीतपेये बनविणारी कंपनी जर वारेमाप भूजल वापरत असेल तर त्याची क्षती भरून काढण्यासाठी ‘सीएसआर’ अंतर्गत कंपनीने जलसंधारणाची कामे करावीत, सॅनिटरी पॅड बनविणाऱ्या कंपनीने पौगंडावस्थेतील मुलींसाठी आरोग्य शिबिरे आयोजित करावीत. तात्पर्य काय, तर ‘सीएसआर’ म्हणजे ‘कंपनी सक्सेस रेट’ वाढविण्याचे साधन म्हणूनही वापरावे.