प्रा. रवींद्र कुलकर्णी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रेयांक हस्तांतरण म्हणजे क्रेडिट ट्रान्स्फर हे याचं उत्तर आहे. या क्रेडिट ट्रान्स्फरमुळे आंतरविद्याशाखीय किंवा बहुविद्याशाखीय शिक्षणाला गतिमानता अणि लवचिकता मिळते. एकतर पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर या शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांला आगमन-निर्गमनाची सवलत मिळते आणि श्रेयांक हस्तांतरणामुळे त्यात प्रवाहीपणा येतो. याकरिता शैक्षणिक श्रेयांक बँक ही व्यवस्था केली गेली आहे.

दुसऱ्या दिवशी सायंकाळी सगळेजण कँटिनमध्ये पुन्हा एकत्र जमले. पाचच्या ठोक्याला रमेश सर आले. ते आनंदच्या करिअरबद्दल बोलू लागले. आनंदला मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री आणि बायोटेक्नॉलॉजीमध्ये करिअर करायचे होते. सर म्हणाले, ‘‘तुला याकरिता जीवन विज्ञानासारखा (’ life science) बहुविद्याशाखीय अभ्यासक्रम मुख्य विषय म्हणून निवडावा लागेल. तुला बीएससी-लाईफ सायन्स ही पदवी मिळवता येईल. तू तीन वर्षांचा किंवा चार वर्षांची  honours अथवा संशोधनासह पदवी अभ्यासक्रम निवडू शकशील. अर्थात त्यात तुला निवडीचे स्वातंत्र्य आहे.’’ सर म्हणाले, ‘‘आनंद, काल सांगितल्याप्रमाणे या मुख्य अभ्यासाबरोबरच तुझ्या आवडीनुसार मुख्य अथवा उपविषयासाठी व्यावसायिक (Vocational) कौशल्य, त्यांचे प्रशिक्षण आणि soft skills यांचा अंतर्भाव चार वर्षांच्या बहुविद्याशाखीय पदवी कार्यक्रमांमध्ये केला जाईल. तुमची म्हणजेच विद्यार्थ्यांची त्यामुळे रोजगार व व्यावसायिक क्षमता वाढू शकेल. तुम्हाला वेगवेगळय़ा विषयांची कौशल्ये या निमित्ताने आत्मसात करता येतात. शिरीषला वाणिज्य शाखेमध्ये म्हणजेच कॉमर्समध्ये मुख्य विषय घेण्यात रस आहे आणि त्याचबरोबर त्याला सप्लाय चेन मॅनेजमेंट, ब्लॉक चेन मॅनेजमेंट आणि लॉजिस्टिक्स यामध्ये देखील रुची आहे. या शैक्षणिक धोरणाअंतर्गत हे सर्व व्यावसायिक प्रशिक्षण तो घेऊ शकतो व त्यात प्रावीण्य मिळवू शकतो. उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांनी विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार अभ्यासक्रम बनवायला पाहिजेत.’’

रमेश सरांनी विचारलं, ‘‘आता तरी तुमचं समाधान झालं का?’’ सर्वानी माना डोलावल्या; पण त्यांच्या उत्तरातून मुलांच्या मनात वेगळे प्रश्न निर्माण होऊ लागले. सर्वात पहिला प्रश्न अनिशला पडला. त्याने विचारलं, ‘‘मला संगणक अभियांत्रिकी बरोबर शास्त्रीय संगीताच्या उपविषयात अभ्यास करण्याची संधी मिळाली हे छानच आहे. पण मी जिथे प्रवेश घेईन त्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शास्त्रीय संगीताचा विषय नसेल तर मग मी काय करू?’’

सर हसले, म्हणाले, ‘‘बरोबर आहे तुझा प्रश्न. अशावेळी तुझ्या इंजिनियिरग कॉलेजच्या जवळ असलेल्या एखाद्या नोंदणीकृत उच्च शिक्षण संस्थेत शास्त्रीय संगीत हा विषय असेल, तर तुला तिथे जाऊन हा उपविषय किंवा खुला पर्यायी विषय (Open elective) म्हणून निवडता येईल आणि त्याचे शिक्षण घेता येईल. अनिश आश्चर्यचकित झाला आणि त्याने प्रश्नांचा भडीमार केला, ‘‘सर मी एकाचवेळी दोन वेगवेगळय़ा संस्थांमध्ये कसा काय प्रवेश घेऊ शकतो? माझ्या क्रेडिटचं काय होणार? दोन्ही संस्थांमधील माझे क्रेडिट्स मी एकत्र कसे करू शकणार? त्यासाठी काही यंत्रणा आहे का? आणि नोंदणीकृत उच्च शिक्षण संस्था म्हणजे काय?’’

रमेश सरांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. ‘‘अरे हो हो!’’ ते म्हणाले, ‘‘या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची हीच तर गुरूकिल्ली आहे. श्रेयांक हस्तांतरण म्हणजे क्रेडिट ट्रान्स्फर हे याचं उत्तर आहे. या क्रेडिट ट्रान्स्फरमुळे आंतरविद्याशाखीय किंवा बहुविद्याशाखीय शिक्षणाला गतिमानता अणि लवचिकता मिळते. एकतर पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर या शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांला आगमन-निर्गमनाची सवलत मिळते आणि श्रेयांक हस्तांतरणामुळे त्यात प्रवाहीपणा येतो. याकरिता शैक्षणिक श्रेयांक बँक (Academic bank of credits – ABC ) ही व्यवस्था केली गेली आहे. नॅशनल अ‍ॅकडमिक डिपॉझिटरीच्या (NAD) माध्यमातून ABC हे एक आभासी गोदाम (virtual storehouse) तयार केले गेले आहे. यात श्रेयांकांची मान्यता (recognition), श्रेयांक संचय (accumulation), श्रेयांक हस्तांतरण आणि श्रेयांक विमोचन (redemption) यांची सुविधा उपलब्ध असेल.  यामुळे विद्यार्थ्यांची श्रेयांक हस्तांतरणाची मोठय़ा प्रमाणात सोय होईल.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुसार शिक्षण देणाऱ्या उच्च शिक्षण संस्थांना ABC मध्ये NAD द्वारे नोंदणी करणे आवश्यक असेल. अशा नोंदणीकृत उच्च शिक्षण संस्थाच विद्यार्थ्यांनी मिळवलेले श्रेयांकन (क्रेडिट) अपलोड करू शकतात. याकरिता विद्यार्थ्यांनीसुद्धा डिजिलॉकर द्वारे ABC वर नोंदणी करणे बंधनकारक आहे. (लिंक digilocker. gov. in) विद्यार्थ्यांनी त्यासाठी त्यांचा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक किंवा आधार क्रमांक वापरायचा आहे आणि ही सर्व माहिती ABC Id विजेटचा वापर करून तयार झालेले  ABC Id म्हणजे ओळखपत्र डाऊनलोड करून ठेवायचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांला हा केवळ त्याचाच असणारा unique ABC Id हा नंतर प्रवेशीत शिक्षण संस्थेमध्ये कळवायाचा आहे. त्याखेरीज त्यांचे श्रेयांक जमा होणार नाहीत. याबरोबरच विद्यार्थी  http://www.abc.gov.in या वेबसाईटवर जाऊन ‘Meri Pehchan’ वर स्वत:च्या नोंदणीकृत मोबाइल किंवा आधार क्रमांकाने आपले  ABC Id तयार करू शकतात.’’

सर सांगत होते, ‘‘एकदा का विद्यार्थ्यांने नोंदणीकृत शिक्षण संस्थेना  ABC Id कळवला की ती शिक्षण संस्था त्या विद्यार्थ्यांची सर्व माहिती गोळा करेल आणि  NAD फॉर्मेटमध्ये त्याची स्वतंत्र फाईल बनवेल. शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांने मिळवलेले श्रेयांक (क्रेडिट्स) त्याच्या  ABC खात्यात दिसतील आणि मग हे श्रेयांक एका नोंदणीकृत शिक्षण संस्थेकडून दुसऱ्या नोंदणीकृत संस्थेकडे विद्यार्थ्यांनी विनंती केल्यावर हस्तांतरित केले जातील. विद्यार्थ्यांने  ABC कडे श्रेयांक हस्तांतरणाची विनंती केल्यानंतर ज्या शिक्षण संस्थेकडे श्रेयांक हस्तांतरण करण्याची विनंती केली आहे तिने मंजुरी दिल्यानंतर ही दोन महाविद्यालयामधील अथवा दोन विद्यापीठामधील श्रेयांक हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण होईल. थोडक्यात  ABC हे शैक्षणिक सेवा यंत्रणा (Academic Service Mechanism) म्हणून काम करेल,’’ रमेश सर म्हणाले, ‘‘हे तुम्हाला थोडेसे गुंतागुंतीचे वाटेल पण ही अतिशय सोपी प्रक्रिया आहे.’’

ABC वरची ही चर्चा उद्बोधक होती. सर म्हणाले, अजूनही त्याच्या काही खाचाखोचा आहेत. त्या आपण पुढच्या वेळी बघू. अनुवाद : डॉ नीतिन आरेकर  (क्रमश:)

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Credit system in education credit system under national education policy zws
Show comments