डेल्फ्ट युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी, नेदरलँड्स

प्रथमेश आडविलकर itsprathamesh@gmail.com

विद्यापीठाची ओळख –

नेदरलँड्समधील डेल्फ्ट युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी (टीयू डेल्फ्ट) हे त्या देशातील सर्वात मोठे आणि जुने राष्ट्रीय विद्यापीठ आहे. २०१९ सालच्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार टीयू डेल्फ्ट हे जगातले बावन्नाव्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. तर फक्त ‘अभियांत्रिकी व तांत्रिक’ विद्यापीठांमध्ये या संस्थेचा जगातील पहिल्या वीस विद्यापीठांमध्ये क्रमांक लागतो. दक्षिण हॉलंडमधील डेल्फ्ट शहरात या विद्यापीठाचा मुख्य कॅम्पस स्थित आहे. या शासकीय संशोधन विद्यापीठाची स्थापना १८४२ साली करण्यात आली. टीयू डेल्फ्ट विद्यापीठामध्ये सध्या जवळपास साडेतीन हजार तज्ज्ञ प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करीत असून एकवीस हजार पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण व संशोधन पूर्ण करत आहेत. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये एकूण आठ प्रमुख शैक्षणिक-संशोधन विभाग आणि विद्यापीठाच्या स्वतंत्रपणे कार्यरत असलेल्या संशोधन संस्था एकमेकांच्या सहकार्याने नांदत आहेत.

अभ्यासक्रम –

टीयू डेल्फ्ट हे नेदरलँड्समधील सर्वात मोठे तांत्रिक विद्यापीठ आहे आणि ते अभियांत्रिकीच्या उपशाखांमधील जवळपास सर्व विषयांचे पर्याय निवडण्याची मुभा देते. टीयू डेल्फ्ट विद्यापीठातील बहुतांश पदवी अभ्यासक्रम हे डच आणि इंग्रजीमध्ये चालतात, तर सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रम इंग्रजी भाषेमध्ये शिकवले जातात. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीतून शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांची यादी विद्यापीठाने संकेतस्थळावर दिलेली आहे. अभियांत्रिकी शाखेमधील असल्याने पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचे पूर्णवेळ तांत्रिक अभ्यासक्रम आहेत. टीयू डेल्फ्ट विद्यापीठामध्ये एकूण आठ शैक्षणिक विभाग आहेत. ‘अप्लाइड सायन्सेस’, ‘एअरोस्पेस इंजिनीयिरग’, ‘आर्किटेक्चर अ‍ॅण्ड द बिल्ट एन्व्हायर्नमेंट’, ‘सिव्हिल इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड जिओसायन्सेस’, ‘इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग’, ‘मॅथेमॅटिक्स अ‍ॅण्ड कॉम्प्युटर सायन्स’, ‘इंडस्ट्रीयल डिझाईन इंजिनीअरिंग’, ‘मेकॅनिकल, मेरीटाइम अ‍ॅण्ड मटेरियल्स इंजिनीअरिंग’ आणि ‘टेक्नॉलॉजी, पॉलिसी अ‍ॅण्ड मॅनेजमेंट’ या आठ प्रमुख विभागांमार्फत विद्यापीठातील सर्व पदवी व पदव्युत्तर विभाग चालतात. या विभागांकडून अप्लाइड फिजिक्स, अप्लाइड मॅथेमॅटिक्स, अप्लाइड अर्थ सायन्सेस, आर्किटेक्चर, अर्बनिझम अ‍ॅण्ड बिल्डिंग सायन्सेस, मरीन टेक्नॉलॉजी, केमिकल इंजिनीअरिंग, मेकॅनिकल इंजिनीअरिंग, ऑफशोअर अ‍ॅण्ड ड्रेजिंग इंजिनीअरिंग, एम्बेडेड सिस्टम्स, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, जिओमॅटिक्स, एअरोस्पेस इंजिनीअरिंग, ट्रान्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर अ‍ॅण्ड लॉजिस्टिक्स, सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड कम्युनिकेशन इत्यादी वैविध्यपूर्ण विषयांचे पर्याय विद्यार्थ्यांना विद्यापीठाने उपलब्ध करून दिलेले आहेत. अभियांत्रिकीमधील निरनिराळ्या विषयांचे पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावेत यासाठी विद्यापीठाने पदवी स्तरावर सोळा बी.एस्सी. अभ्यासक्रम तयार केलेले आहेत. यांपैकी चार ‘जॉइंट डिग्रीज’ म्हणजे संयुक्त पदवी अभ्यासक्रम आहेत. पदव्युत्तर स्तरावर विद्यापीठाने तीसपेक्षाही अधिक एमएससी अभ्यासक्रम निर्माण केले आहेत यांपैकी अनेक अभ्यासक्रम नेदरलँड्समध्ये फक्त याच संस्थेकडे उपलब्ध आहेत.

सुविधा-

टीयू डेल्फ्ट विद्यापीठ विविध हौसिंग एजन्सीबरोबर संलग्न असल्याने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी निवासाची सोय डेल्फ्ट शहरामध्ये केली जाऊ शकते. याशिवाय विद्यार्थी स्वतंत्रपणे आपल्या निवासाची सोय अगोदरच शहरामध्ये करू शकतात. विद्यापीठ आंतरराष्ट्रीय स्तरावरील बुद्धिमत्ता आकर्षति करू पाहते, त्यामुळे टीयू डेल्फ्ट विद्यापीठाकडून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व पाठय़वृत्तीच्या माध्यमातून मदत दिली जाते. मात्र या शिष्यवृत्ती फक्त पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमांसाठीच दिल्या जातात. याशिवाय, टीयू डेल्फ्ट विद्यापीठाकडून ‘एक्स्चेंज प्रोग्रॅम’ राबवले जातात. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये बँक, हेल्थ सर्व्हिस सेंटर, सुपर मार्केट, कॅफेज, रेस्टॉरंट, करिअर सेंटर आणि वर्क परमिट यांसारख्या इतर सुविधाही उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. विद्यापीठाच्या ‘लॅपटॉप प्रोजेक्ट’मुळे विद्यार्थ्यांना अतिशय कमी किमतीमध्ये लॅपटॉप खरेदी करता येतात. ज्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना डच भाषा शिकायची आहे त्यांच्यासाठी विद्यापीठाच्या ‘भाषा केंद्रा’कडून मदत केली जाते. प्रत्येक विषयाचे ‘स्टडी असोसिएशन’ आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमविषयक देवाणघेवाण करण्यासाठी मदत होते. तसेच ‘स्टुडंट असोसिएशन’मुळे सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडाविषयक कार्यक्रमांची आखणी विद्यार्थ्यांसाठी केली जाते.

वैशिष्टय़

टीयू डेल्फ्ट विद्यापीठाचे तांत्रिक संशोधन जागतिक स्तरावर गौरवले गेले आहे. नेदरलँड्समधील विज्ञानात आतापर्यंत मिळालेले नोबेल पुरस्कार हे बहुतांशी याच विद्यापीठातील विद्यार्थी-प्राध्यापकांना मिळालेले आहेत. भारतातील एम्सपासून ते युरोपमधील ईटीएच झुरिकसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबर विद्यापीठ शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील संकल्पनांची देवाणघेवाण करण्यासाठी संलग्न आहे. याशिवाय टीयू डेल्फ्टची ‘क्यूटेक’ नावाची ‘क्वांटम कॉम्प्युटिंग’ या विषयात अद्ययावत संशोधन करणारी संशोधन संस्था आहे. कित्येक आंतरराष्ट्रीय संशोधक क्यूटेकबरोबर जोडले गेलेले आहेत.

संकेतस्थळ  https://www.tudelft.nl/en/ (सदर समाप्त)

Story img Loader