कोणत्याही शहरात, गावात, चौकात, हमरस्त्यावर एका ठिकाणी कायम गर्दी असते. ते म्हणजे तिथले हॉटेल. अर्थातच तिथल्या बल्लवाचार्यानाही तितकेच महत्त्व असते. त्यामुळेच हल्ली अनेक विद्यार्थी हॉटेल मॅनेजमेंटकडे वळताना दिसतात. संजीव कपूर, विष्णू मनोहर, विकास खन्ना, रणवीर ब्रार, तारा दलाल, मधुर जाफरी, गगन आनंद, नीता मेहता अशा अनेक बल्लवाचार्याना तर आपण टीव्हीवरही पाहतो. त्यांचे स्वतचे असे खास कार्यक्रम चालतात. त्यांचा स्वत:चा चाहता वर्ग असतो. अशा प्रकारे यश आपणालाही मिळवता येईल, पण त्यासाठी हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रम चालवणाऱ्या दर्जेदार संस्थेत प्रवेश मिळायला हवा.

यासाठी मुख्यत्वे करून नॅशनल कौन्सिल ऑफ हॉटेल अ‍ॅण्ड कॅटरिंग मॅनेजमेंट या संस्थेमार्फत घेतली जाणारी राष्ट्रीय स्तरावरील चाळणी परीक्षा द्यावी लागेल. ही संस्था भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयांतर्गत कार्यरत आहे. या संस्थेने हॉटेल उद्योगाशी संबंधित प्रमाणपत्र ते पदव्युत्तर पदवीपर्यंतचे विविध कालावधीचे रोजगारक्षम व उत्तम करिअर घडण्याची क्षमता असलेले अभ्यासक्रम सुरू केले आहेत. यामध्ये बी.एस्सी. इन हॉस्पिटॅलिटी अ‍ॅण्ड कॅटरिंग मॅनेजमेंट हा महत्त्वाचा अभ्यासक्रम आहे.

या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दरवर्षी जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन घेतली जाते. त्याद्वारे देशातील सवरेत्कृष्ट ५१ संस्थांमध्ये प्रवेश मिळू शकतो. यामध्ये २१ संस्था या केंद्रीय अर्थसाहाय्यित आहेत. १९ संस्था राज्य सरकारांच्या अखत्यारीत आहेत. एक संस्था सार्वजनिक क्षेत्रातील आहे आणि ९ खासगी संस्था आहेत. देशातील विविध भागांत असणाऱ्या ९ फूड क्राफ्ट संस्था हॉटेल उद्योगातील वेगवेगळ्या कामांसाठी आवश्यक असणारे विशेष पदविका अभ्यासक्रम चालवतात. या अभ्यासक्रमांसाठीही वरील परीक्षेतील गुणांद्वारे प्रवेश दिला जातो.

  • महाराष्ट्रातील संस्था – इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, कॅटरिंग टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड अप्लाइड न्यूट्रिशन, वीर सावरकर मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई- ४०००२८, संकेतस्थळ – http://www.ihmctan.edu/

अशी आहे परीक्षा..

  • या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची प्रवेश परीक्षा दरवर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात घेतली जाते. प्रश्न वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी असतात. हे प्रश्न पुढील विषयांवर विचारले जातात –
  • इंग्रजी भाषा (६० गुण), सामान्यज्ञान आणि चालू घडामोडी (३० गुण), सेवा क्षेत्रासाठी आवश्यक असणारा कल (५० गुण), संख्यात्मक क्षमता आणि विश्लेषणात्मक कल (३० गुण), कार्यकारण भाव आणि तार्किक क्षमता (३० गुण), असे २०० प्रश्न विचारले जातात. एकूण गुण असतात २००. म्हणजेच एका प्रश्नाला एक गुण.
  • पेपरचा कालावधी – तीन तास. प्रश्नपत्रिका इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये असते. त्यामुळे प्रश्न इंग्रजीमध्ये कळत नसेल तर हिंदीत वाचून अर्थ काढता येतो. त्याचा फायदा सेवा क्षेत्रासाठी आवश्यक असणारा कल याविषयाचे प्रश्न सोडवताना होऊ शकतो.

असे मिळतात गुण..

  • इंग्रजी भाषा, सामान्यज्ञान आणि चालू घडामोडी, संख्यात्मक क्षमता आणि विश्लेषणात्मक कल, कार्यकारण भाव आणि तार्किक क्षमता या विषयांतील अचूक उत्तरांसाठी १ गुण दिला जातो. उत्तर चुकल्यास ०.२५ टक्के गुण कापले जातात. सेवा क्षेत्रासाठी आवश्यक असणारा कल या विषयाचे गुण देताना संपूर्ण अचूक उत्तरासाठी एक गुण, त्यापेक्षा कमी अचूक उत्तरासाठी ०.७५ गुण, त्यापेक्षा कमी अचूक उत्तरासाठी ०.५० गुण अशा श्रेणीने गुण दिले जातात. चूक उत्तरासाठी ०.२५ गुण कापले जातात.

अभ्यास कसा कराल?

या परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम हा सर्वसाधारण स्वरूपाचा आहे. शासनाची शिष्यवृत्ती परीक्षा किंवा नॅशनल टॅलेन्ट सर्च एक्झामिनेशसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेचा अभ्यासक्रमही जवळपास असाच असतो. (सेवा क्षेत्रासाठी आवश्यक असणारा कल हा विषय सोडून) दहावी आणि बारावीतील इंग्रजी आणि गणिताचा पाया पक्का किंवा बऱ्यापैकी असेल तर इंग्रजी भाषा, संख्यात्मक क्षमता आणि विश्लेषणात्मक कल व कार्यकारण भाव आणि तार्किक क्षमता या विषयांशी संबंधित प्रश्न सोडवणे सोपे जाते. या तीन विषयांचे एकूण गुण होतात १२०. या तीनही विषयांत विद्यार्थी अधिक गुण मिळवू शकतो. त्यामुळे त्याच्या दृष्टीने थोडे कठीण असणारे सामान्यज्ञान आणि चालू घडामोडी व सेवा क्षेत्रासाठी आवश्यक असणारा कल, या विषयांत थोडे इकडेतिकडे झाले तरी चालू शकते. सामान्यज्ञान आणि चालू घडामोडींचा अभ्यास दैनंदिन वृत्तपत्रे किंवा कॉम्पिटिशिन सक्सेस रिव्ह्य़ूसारखे नियतकालिक यांच्या नियमित वाचनाने होऊ  शकतो. दूरदर्शनच्या रात्रौ ९ वाजताच्या बातम्या काळजीपूर्वक ऐकल्या तरी चालू घडामोडींचे ज्ञान मिळू शकते. काही खासगी प्रकाशकांनी या परीक्षेसाठी माहितीपुस्तके तयार केली आहेत. ती अजिबात परिपूर्ण नाहीत. मात्र प्रश्नांच्या स्वरूपाचे आकलन होण्यासाठी या पुस्तकांचा उपयोग होऊ  शकतो. अशी पुस्तके संदर्भ म्हणून वापरावीत.

तुम्ही जेव्हा एखाद्या भिकाऱ्याला रस्त्यावर भीक मागताना बघता, तेव्हा तुमच्या मनात काय येते? जर, वर्ग बुडवून चित्रपटाला चल, असे तुमचा मित्र म्हणत असेल तर तुम्ही काय कराल? अशा पठडीतले प्रश्न, सेवा क्षेत्रासाठी आवश्यक असणारा कल, या विषयाच्या भागात विचारले जातात. हे प्रश्न एकूणच विद्यार्थ्यांची सर्वसाधारण समज तपासण्यासाठी असतात. सामान्यज्ञान व चालू घडामोडी या विषयासाठी अरुणाचल प्रदेश राज्याची राजधानी कोणती? किंवा कादंबरी या ग्रंथाचा लेखक कोण? अशासारखे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या दोन्ही भागांची भीती बाळगायचे कारण नाही.

ही परीक्षा देशातील ३३ शहरांमध्ये घेतली जाते. यामध्ये महाराष्ट्रातील पुणे, नागपूर आणि मुंबई शहरांचा समावेश आहे. या परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवडय़ात घोषित केला जातो.

अशा आहेत संधी..

  • कौन्सिलद्वारे प्रमाणित केलेला अभ्यासक्रम जागतिक स्तरावरील अभ्यासक्रमाशी सुसंगत असल्याने या क्षेत्रात येण्यासाठी उमेदवारांची संपूर्ण तयारी या अभ्यासक्रमाद्वारे होते. हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना रिसॉर्ट व्यवस्थापक, हॉटेल आणि संबंधित उद्योगात व्यवस्थापकीय प्रशिक्षणार्थी, बहुराष्ट्रीय हॉस्पिटॅलिटी कंपन्यांमध्ये व्यवस्थापक, प्रारंभीच्या प्रशिक्षणानंतर मोठय़ा हॉटेल समूहांमध्ये किचन व्यवस्थापक, हाऊसकीपिंग व्यवस्थापक, राज्य पर्यटन विकास महामंडळात विविध संधी, विमान सेवेतील फ्लाइट किचन आणि विमानांतर्गत सेवा, रेल्वे आतिथ्य आणि खानपान सेवा, आदींचा ठळकरीत्या उल्लेख करावा लागेल.

 

  • अर्हता- बी.एस्सी. इन हॉस्पिटॅलिटी अ‍ॅण्ड कॅटरिंग मॅनेजमेंट या अभ्यासक्रमास कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण उमेदवारास प्रवेश मिळू शकतो. मात्र या उमेदवाराने इंग्रजी विषयाचा अभ्यास बारावीला करणे आवश्यक आहे. अभ्यासक्रमाचा प्रारंभ १८ जुलैपासून होतो.
  • संपर्क- नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी, ए-३४, सेक्टर- ६२, नोयडा- २०१३०९.

संकेतस्थळ http://www.nchm.nic.in/

Story img Loader