MBAएमबीए प्रवेशासाठी राज्य सरकारच्या तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे घेतली जाणारी प्रवेश परीक्षा यंदा १४ आणि १५ मार्च रोजी आहे. या परीक्षेचे स्वरूप नेमके कसे असते आणि परीक्षेची तयारी कशी करावी याविषयीचे कानमंत्र-
एमबीए प्रवेशासाठी राज्यभरात तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे घेतली जाणारी प्रवेश परीक्षा ही एक प्रमुख प्रवेश परीक्षा आहे. २०१५-२०१६ च्या प्रवेश परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या असून या वर्षी ही परीक्षा शनिवार, १४ मार्च आणि रविवार, १५ मार्च २०१५ या दिवशी घेण्यात येणार आहे. चांगल्या व्यवस्थापन संस्थेमध्ये प्रवेश घेण्याच्या दृष्टीने या परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळवण्याची आवश्यकता असते. त्यामुळे या परीक्षेची तयारी आधीपासूनच करणे आवश्यक ठरते. यासाठी सर्वात आधी परीक्षेचे स्वरूप समजावून घ्यायला हवे.
या वर्षीच्या परीक्षेच्या तारखा जरी जाहीर झाल्या असल्या तरी अद्याप परीक्षेचे माहितीपत्रक मात्र उपलब्ध झालेले नाही. परीक्षेचे संपूर्ण परिपत्रक ज्या वेळी प्रसिद्ध होईल, त्या वेळेस परीक्षेसाठीचे व प्रवेशासंबंधीचे माहितीपत्रक उपलब्ध होईल. यामुळे परीक्षेच्या स्वरूपाविषयी जाणून घेताना   २०१४-१५ सालच्या माहितीपत्रकाचा आधार घेतला आहे. प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम आणि स्वरूप यामध्ये फारसे बदल होत नाहीत. त्यामुळे सर्वसाधारणपणे परीक्षेचे स्वरूप मागील वर्षांप्रमाणेच असेल असे मानायला हरकत नाही. परीक्षेचे स्वरूप पुढीलप्रमाणे असू शकेल.
ही प्रवेशपरीक्षा संपूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षेमध्ये २०० प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्नाला विविध पर्याय देण्यात येतील. या पर्यायांपैकी एका पर्यायावर योग्य ती खूण करावी लागेल. परीक्षेचा कालावधी एकूण १५० मिनिटे म्हणजेच अडीच तास असतो. परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही म्हणजेच चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा होत नाहीत. म्हणजेच एखादा प्रश्न चुकला तर त्याचे गुण मिळणार नाहीत, मात्र चुकीचे उत्तर दिले म्हणून जास्तीचे गुण वजा मात्र होणार नाहीत. कॅलक्युलेटर्स, लॉग टेबल्स, स्लाइड रूल्स, मोबाइल, इत्यादी साधनांचा वापर परीक्षेमध्ये करता येणार नाही.
परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार असल्यामुळे परीक्षेस बसू इच्छिणाऱ्यांना संगणकाच्या वापराचा पुरेसा सराव करणे गरजेचे आहे. तसेच १५० मिनिटांमध्ये २०० प्रश्न सोडवायचे असल्यामुळे वेळेच्या व्यवस्थापनाचाही पुरेसा सराव असायला हवा. या परीक्षेसाठी नियमित सराव अत्यंत गरजेचा आहे. परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न साधारण तीन विभागांमध्ये विभागले असतात.
शाब्दिक कौशल्यावर तसेच इंग्रजी भाषेचे ज्ञान तपासण्यासाठीचा एक विभाग असतो. या विभागातील प्रश्नांचा उद्देश विद्यार्थ्यांचे इंग्रजी भाषेचे ज्ञान तपासणे हा आहे. या ठिकाणी लक्षात घ्यायला हवे की, संपूर्ण परीक्षा ही इंग्रजी भाषेमध्येच असून तिचे इतर कोणत्याही भाषेमधील भाषांतर  उपलब्ध नसते. यामुळेही इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे  आवश्यक आहे. या विभागामध्ये एखादे इंग्रजी वाक्य देऊन त्यामधील चुका शोधण्यास सांगितले जाते. यात व्याकरणातील चुका शोधाव्या लागत असल्याने इंग्रजी व्याकरणाच्या अभ्यासाची पुन्हा एकवार उजळणी करणे आवश्यक आहे. त्याबरोबरच अपूर्ण इंग्रजी वाक्य योग्य तो पर्याय निवडून पूर्ण करणे असेही प्रश्न असतात. यासाठीही योग्य त्या सरावाची गरज असते. इंग्रजी भाषेसंबंधी आकलनसंबंधीचे प्रश्नही असतात. त्यात इंग्रजी परिच्छेद देऊन त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे दिली जातात. हे प्रश्नसुद्धा वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असून दिलेल्या पर्यायांपैकी योग्य तो पर्याय निवडावा लागतो. हे तीनही प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी सरावाची नितांत गरज असते. सराव नियमितपणे केल्यास हे प्रश्न कठीण जाणार नाहीत. मात्र, यासाठी इंग्रजी वाचनाची सवय पाहिजे आणि ती नसल्यास प्रयत्नपूर्वक लावून घेतली पाहिजे. कित्येक विद्यार्थी-विद्यार्थिनी इंग्रजीला घाबरतात आणि त्यामुळे इंग्रजी वाचन, व्याकरणाचा अभ्यास करणे टाळतात. मात्र, प्रश्नपत्रिकेतील हा एक महत्त्वाचा विभाग असल्यामुळे हा विभाग टाळून चालणार नाही. योग्य तो सराव केल्यास यात गुण मिळवणे अवघड नसते.
परीक्षेतील दुसरा विभाग म्हणजे क्वान्टिटेटिव्ह प्रकारचे प्रश्न. यामध्ये परीक्षार्थीचे सांख्यिकी व गणिती कौशल्य तपासले जाते. या विभागामध्ये साधे अंकगणित, बीजगणितातील समीकरणे तसेच सरासरी काढणे, टक्केवारी काढणे इत्यादी प्रकारचे प्रश्न असतात. यामध्ये गुणोत्तर व प्रमाण (रेशिओ व प्रपोर्शन) यावर आधारित प्रश्न, तसेच त्रिज्या, व्यास यासारख्याभौमितिक संकल्पनांवर आधारित प्रश्न, एखादा तक्ता देऊन त्यामधील आकडेवारीवर आधारित प्रश्न इत्यादींचा समावेश असतो. कॅलक्युलेटरचा वापर करता येत नसल्यामुळे या प्रश्नांच्या उत्तरासाठी तोंडी आकडेवारी करणे किंवा परीक्षेच्या वेळेस कच्चे काम करण्यासाठी दिलेल्या कागदांचा वापर करणे गरजेचे आहे. असा अनुभव आहे की, या विभागातील प्रश्नांमध्ये फार अवघड किंवा अत्यंत गुंतागुंतीची आकडेवारी वगैरे नसते. सराव केल्यास हेही प्रश्न सोडवणे कठीण नाहीत, मात्र सराव हा नियमित व मन लावून करायला हवा.
तिसऱ्या विभागामध्ये लॉजिकल थिंकिंग- तर्कसंगत विचार करण्यावर आधारित प्रश्नांचा समावेश असतो. यामध्ये परीक्षार्थीची तार्किक क्षमता तपासली जाते. एमबीए झाल्यानंतर व्यवस्थापक म्हणून काम करताना किंवा स्वत:चा व्यवसाय करताना अनेक किचकट आणि गुंतागुंतीचे प्रश्न सोडवावे लागतात. तसेच महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतात. या प्रसंगी सुसंगत विचार करण्याच्या क्षमतेचा निर्णय प्रक्रियेवर सकारात्मक परिणाम होतो. भविष्यातील या अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रियेचा अभ्यास विद्यार्थीदशेपासूनच करण्याची सवय लावून घेतल्यास त्याचा फायदा निश्चित होतो. त्या दृष्टीने प्रश्नपत्रिकेतील या विभागाकडे बघितले पाहिजे. या विभागामध्ये आणखी एका प्रकारच्या प्रश्नांचा समावेश होतो. तो म्हणजे एखादा परिच्छेद देऊन त्यावर आधारित निष्कर्ष काढणे. म्हणजेच परिच्छेदातील माहितीच्या आधारे आणि दिलेल्या प्रश्नांवरून योग्य ते निष्कर्ष काढणे. या सर्व प्रकारचे प्रश्न सोडविण्यासाठी सरावाची अत्यंत गरज असते. अन्यथा फारशी कठीण नसलेली परीक्षा निष्कारण अत्यंत कठीण भासू लागते.
या एमबीए प्रवेश परीक्षेचे तसेच इतरही प्रवेश परीक्षांचे स्वरूप लक्षात घेतले तर असे दिसते की, व्यवस्थापक म्हणून काम करताना ज्या क्षमतांचा वापर करावा लागतो, त्या क्षमता पडताळणीची ही परीक्षा असते आणि याच क्षमतांचा विकास करण्याचा सराव  या परीक्षेदरम्यान होतो. सांख्यिकी क्षमता असो, इंग्रजी भाषेवरील प्रश्न असो किंवा तर्कसंगत विचारावर आधारित प्रश्न असो, या सर्व प्रश्नांचा नीट अभ्यास केल्यास परीक्षेत उत्तम कामगिरी बजावता येते. परिणामी, चांगल्या महाविद्यालयात एमबीए अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळणे सुकर होते. अशा तऱ्हेने तुमच्या भावी करिअरला योग्य दिशा मिळते. हे धागे लक्षात घेत या प्रवेश परीक्षांकडे विद्यार्थ्यांनी गंभीरपणे पाहायला हवे. परीक्षेत निर्णयक्षमता आणि तर्कसंगत विचारक्षमतेची जी चाचणी घेतली जाते, त्याचा पुरेसा अभ्यास करायला हवा. अन्यथा या प्रवेश परीक्षेतच नाही तर येनकेन प्रकारेण एमबीए झाल्यानंतरही हे विद्यार्थी करिअरच्या स्पर्धेत पिछाडीवर पडतील.
या सर्व बाबी लक्षात घेऊन एमबीए प्रवेशपरीक्षेकडे आणि एकूणच आपल्या करिअरकडे विद्यार्थ्यांनी गंभीरपणे पाहायला शिकायला हवे. तर मग प्रवेशपरीक्षेचा अभ्यास केवळ प्रवेशासाठीचा अभ्यास न राहता एमबीए यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी आवश्यक ठरणाऱ्या दृष्टिकोनाचाही त्यातून विकास होईल.    
nmvechalekar@yahoo.co.in

Story img Loader