महेंद्र दामले
फाइन आर्टच्या शिक्षणाबद्दल काय मानसिकता हवी, त्याची चर्चा आपण मागच्या लेखात केली. तसेच फाइन आर्टच्या शिक्षणाचे स्वरूप, त्याचा अर्थसुद्धा कसा बदलला आहे ते आपण गेल्या वेळी पाहिले. एके काळी जेव्हा स्पेशलायझेशनचा जमाना नव्हता तेव्हा सर्व कलाशाखा फाइन आर्ट्स याच शाखेत मोडत होत्या.
पारंपरिकतेने चित्रकला, शिल्पकला, मातीची भांडी बनवणे, धातुकला, इंटेरिअर डिझाइन, टेक्स्टाइल डिझाइन, अप्लाइड आर्ट (जाहिरात कला) आदी सर्व गोष्टी या फाइन आर्टमध्ये मोडत होत्या. पण आजकाल इंटिरिअर डिझाइन, टेक्स्टाइल डिझाइन, अप्लाइड आर्ट आदी सर्व गोष्टी या स्वतंत्र व्यावसायिक अभ्यासक्रम झाल्या आहेत आणि त्यांचा समावेश हा फाइन आर्टमध्ये होत नाही.
काही प्रकारची चित्रं रंगवायला शिकणे आणि त्याचा वापर करून वैयक्तिक अभिव्यक्ती करणारा कलाकार होणे, असा फाइन आर्टच्या शिक्षणाचा पारंपरिक अर्थ होता. अजूनही आहे. चित्र विकून पसे मिळवणे आणि कलाकार म्हणू नाव कमावणे अशा स्वरूपाची कारकीर्द त्यातून शक्य होत होती. स्वातंत्र्यपूर्व काळात अशा प्रकारच्या संधी बऱ्याच कमी होत्या. त्यामुळेच करिअरचा हा मार्ग पैसे कमी देणारा म्हणूनच तो नको, अशी समाजाची मानसिकता होती. अजूनही आहे. याचं कारण फाइन आर्ट्सच्या क्षेत्रात झालेले बदल माहिती नसणे, हे आहे.
या शिक्षणाची दोन अंगं असतात. एक म्हणजे कौशल्य शिकणे आणि वैचारिक पातळीवर त्याकडे एक दृश्यभाषा म्हणून विचार करणे, समजणे, त्याचा वापर करणे आणि अर्थ लावणे. अर्थात या दोन्ही अंगांनी समजणे सर्वानाच शक्य होते, असे नाही. जागतिकीकरणामुळे फाइन आर्ट्सचे स्वरूप बदलले आहे. इंटरनेटसारख्या साधनांमुळे फाइन आर्ट्सच्या बदललेल्या स्वरूपाची माहिती सहजगत्या होऊ लागली आहे. अभ्यासक्रम तोच पारंपरिक राहिला तरी कलाक्षेत्रातील घडामोडींमुळे फाइन आर्ट्सचे स्वरूप, अर्थ आणि त्यामुळेच भाषा म्हणून त्याचा विचार आणि वापर करणे, या गोष्टी जागतिक पातळीवर बदलल्या आहेत. त्यामुळेच कौशल्य आणि विचार यांची सांगड शिक्षणात असेल तर जागतिक बदल समजून घेताना आपल्या वैयक्तिक करिअरला आकार देणे जमू शकते.
प्रतिमानिर्मितीसाठी लागणारी कौशल्ये, प्रतिमेचा दृश्य गुण, परिणाम, तिचा अर्थ आणि त्यामुळे अपेक्षित असलेला रसिकांचा, प्रेक्षकांचा प्रतिसाद याचे नीट भान असणे या सर्व गोष्टी फाइन आर्ट्सच्या शिक्षणात गरजेचे आहे. यालाच फाइन आर्ट्सचे भाषाभान असेही म्हणता येईल. आज अशा स्वरूपाची गरज अनेक क्षेत्रांत निर्माण झाली आहे. आज फाइन आर्ट्स ही अनेक क्षेत्रांचे भान देणारी, अष्टपैलू क्षमता विकसित करणारी शाखा म्हणून तिचा अर्थ बदलला आहे, ही गोष्ट विद्यार्थी आणि पालकांनी लक्षात घ्यायला हवी.
फाइन आर्ट्सचे भाषाभान आल्यावर त्यातील निर्मिती प्रक्रियाही कळू लागते. त्याचा विशिष्ट परिणाम कसा निर्माण करायचा, ते कळू लागते. त्यातून वैयक्तिक कलादृष्टी, मर्मदृष्टी विकसित होते. ज्यावर करिअर विकासाच्या शक्यता अपेक्षित असतात. कारण याच मर्मदृष्टीने दुसऱ्याला कलानिर्मिती प्रक्रिया शिकवता येते आणि कलाशिक्षक म्हणून करिअर शक्य होते. यामध्ये कलावस्तू बनवण्यापेक्षा कलानिर्मितीतील कृतीवर भर देऊन तिचे मनावरील परिणाम या अंगाने विचार करता, मानसशास्त्राचा अभ्यास करून आर्ट थेरपिस्टही होता येते. तेच शब्दांत व्यक्त करता आल्यास कंटेन्ट रायटर आणि एडिटर म्हणूनही स्वत:चा विकास करता येऊ शकतो. कला समीक्षा शिकल्यास कला समीक्षकही होता येते. संशोधनाची, अभ्यासाची वृत्ती असेल तर संग्रहालयात संशोधक, संकल्पक, पुराण वस्तू संवर्धक आदी प्रकारची करिअर होऊ शकतात. शिवाय फाइन आर्ट्सच्या अनुभवनिर्मितीचा वापर करून युजर एक्स्पिरियन्स डिझाइनर होण्याचा मार्ग खुला होतो. कलावस्तूचे दस्तावेजीकरण आणि कला कार्यक्रम आयोजक असेही करिअर होऊ शकते. लुक डिझायनर, मेकअप आर्टिस्टही बनता येते. थोडक्यात फाइन आर्ट्सचे शिक्षण अष्टपैलू गुणवत्ता आणि क्षमता तयार करते. त्यानंतर पुढील शिक्षण घेऊन वर उल्लेखलेल्या क्षेत्रांतील करिअर विकसित होते. नोकरीसोबतच स्वत:च्या कामाच्या संधी वाढतात.
वर्षभरामध्ये या सदरातून याच सर्व मुद्दय़ांवर लिहिले गेले. या सगळ्यातून थोडय़ा प्रमाणात का होईना पालकांची पूर्वग्रहदृष्टी कमी झाली, तरी या लेखमालेचे कार्य काही प्रमाणात पूर्ण झाले, असे मानतो.