नोकरीच्या शोधात असणार्‍या उमेदवारांना आता राज्यातील शिक्षक पदाकरिता अर्ज करता येणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षकपद भरतीसाठी घोषणा केली आहे. २०६२ जागांसाठी शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून त्यासाठी एकूण ३९०२ उमेदवारांची पवित्र पोर्टलच्या माध्यमातून मुलाखतीसाठी शिफारस करण्यात आली आहे.वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत त्यांनी माहिती दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ५६१ खाजगी व्यवस्थापनाच्या २०६२ रिक्त पदांसाठी १५१२३ पसंतीक्रमावर ३९०२ उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात येत आहे,” असं वर्षा गायकवाड यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. तसंच यावेळी त्यांनी उमेदवारांना मुलाखतीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सहा हजार शिक्षकपदांची होणार भरती

शिक्षक पदासाठी राज्यातील सुमारे सहा हजार १०० शिक्षण सेवकांची पदं भरली जाणार असून गुणवत्ताधारक उमेदवारांसाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शकपणे ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या करिता राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित व विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील रिक्त पदांकरिता भरती केली जात आहे.

तसंच शासकीय व अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील शिक्षकांच्या रिक्त पदांवर देखील भरती करण्यात येणार आहे. सर्व उमेदवारांना समान संधी मिळावी व शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षण सेवकांची भरती ‘अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी’ (TAIT) या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे मुलाखत घेतली जाणार असून त्या आधारे उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येणार आहे.

डिसेंबर २०१७ मध्ये आयोजित केलेल्या ‘अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी’ (TAIT) परीक्षेतील गुणांच्या आधारे पवित्र प्रणालीच्या माध्यमातून सुमारे १२ हजार ७० शिक्षक सेवक पदांकरिता भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. अशातच यापूर्वी पाच हजार ९७० शिक्षण सेवक पदांवर नियुक्त्या देण्याबाबतची प्रक्रिया फेब्रुवारी २०२० मध्ये पूर्ण झाली आहे.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Education minister varsha gaikwad big announcement recommendation of 3902 candidates for interview for 2062 posts of teachers scsm