अहंकाराचे विश्लेषण एका विचारवंताने फार सुरेख केले आहे. अहंकार म्हणजे Evil Getting Over you नॅथेनल ब्रोनरच्या मते, अहंकार असा एक राक्षस (बकासुर) आहे की, ज्याला जेवढे खाऊ-पिऊ घालावे तितका तो अधिक भुकेला होतो. बरेचदा अहंकार व स्वाभिमान यांत अत्यंत पुसट रेषा असते. अशा या अहंकाराचे मूळ खालील गोष्टींमध्ये असते-
(१) अज्ञान
(२) स्वत:बद्दलचा फाजील आत्मविश्वास
(३) नकार पचवण्याची कला अवगत नसणे
(४) स्वत:पाशी असलेले अधिकार
(५)आध्यात्मिक विचारांची वानवा. अहंकारामुळे फक्त नुकसान आणि नुकसानच होते. यामुळे मन:शांती बिघडते, सारासार विवेकबुद्धी नष्ट होते व इतरांशी आपले संबंध दुरावतात. मानसिक तज्ज्ञांच्या मते मनुष्य म्हटला की अहंकार आलाच. हा अहंकार हिंस्र श्वापदासारखा असतो. त्यावर नियंत्रण ठेवून त्याला आपल्या आज्ञेत ठेवणे यातच खरी प्रगल्भ माणसाची कसोटी लागते. तेव्हा आज बघू, करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले अहंकाराचे दमन
० जेव्हा आपल्याला ठाऊक असते की, समोरच्या व्यक्तीपेक्षा आपल्याला अधिक ज्ञान आहे तेव्हा बढाया मारून स्वत:चे गुणगान करणे टाळा. यामुळे अहंकार वाढीला लागत नाही.
०    एखाद्याच्या छोटय़ा-मोठय़ा चुकीमुळे/ वागणुकीमुळे आपला अहंकार दुखावला जाणार नाही, याची काळजी घ्या. यासाठी क्षमाशील वृत्ती अंगी बाणवा.
० जसा आपल्याला दुसऱ्याची चूक दाखवून देण्याचा अधिकार आहे तसा समोरच्यालाही आहे, हे विसरू नका. आपली चूक असल्यास मोठय़ा मनाने मान्य करा. आपल्या उणिवांवर बोट ठेवले गेल्यास अहंकार दुखावून घेऊ नका, उलट ‘निंदकाचे घर असावे शेजारी,’ या न्यायाने चूक सुधारा व यश संपादन करा.
०    काही लोक खुशमस्करे असतात. आपली खोटी स्तुती करून आपल्या अहंकाराला खतपाणी घालतात. अशा लोकांचे खरे मनसुबे ओळखा. कारण वेळ आल्यास हीच मंडळी आपले पाय खेचतात.
० अधिकारांमुळे अहंकार वाढीस लागत असेल तर गाढव व येशूख्रिस्ताची गोष्ट आठवा. येशू गाढवावर बसून जात असतो व सर्व लोक येशूला अभिवादन करत असतात. गाढवाला वाटते की, लोक आपल्यालाच अभिवादन करत आहेत. येशू उतरून गेल्यावर त्याच गाढवाला सर्वजण हाडतूड करतात. याचप्रमाणे अधिकारपद असल्यामुळे लोक आपल्या अहंकाराला खतपाणी घालतात, पण तेच पद गेल्यावर तेच लोक आपला अपमानही करतात.
० मला आता सर्व कळते, असे वाटू लागल्यास, नवीन जे आपण कधीही ऐकलेले / पाहिलेले नाही ते शिकायचा प्रयत्न करा. त्यामुळे ज्ञानसागर किती अपार आहे व आपली ज्ञानाची घागर किती थोटी आहे, हे कळेल. आपसूकच त्यामुळे अहंकाराचे दमन होईल.
० उत्तम, देखणे व्यक्तिमत्त्व आहे, म्हणून सर्व लोकांवर आपली भुरळ पडेल हा फाजील आत्मविश्वास / अहंकार बाळगू नका. कारण विचारांची श्रीमंतीच आदरास पात्र असते. लक्षात ठेवा, फळांनी लगडलेले झाड नेहमी वाकलेले असते. तद्वत आपल्या ज्ञान, व्यक्तिमत्त्वाला नम्रतेची झालर असावी.
० मी-माझे भौतिक सुख या सर्व कल्पनांना तिलांजली द्या. दुसऱ्याचा विचार करा, यामुळे एखादी गोष्ट दुसऱ्या व्यक्तीस मिळाल्यास आपला अहंकार दुखावला जाणार नाही.
० दुसऱ्यांना शिकविण्यापेक्षा, दुसऱ्यांकडून जास्तीत जास्त शिका. दुसऱ्यांमधील चांगले गुण आत्मसात करा, त्यामुळे आपल्यालाही शेरास सव्वाशेर भेटल्याचे कळेल व आपसूकच आपला अहंकार निवळून जाईल.
० निरपेक्ष वृत्तीने दुसऱ्यांना मदत करा. एखादी गोष्ट चांगली घडून आल्यास आपण फक्त निमित्तमात्र आहोत. सगळी मेहनत ज्याचे काम झाले त्यानेच केली आहे व देवाने हे सर्व घडवून आणले आहे, असा आध्यात्मिक दृष्टिकोन बाळगा. त्यामुळे अहंकार वाढणार नाही. आठवा- शिवाजी महाराज-रामदास व बेडकीची गोष्ट. जेव्हा महाराजांना अहंकार जडला की आपण रयतेचे पोशिंदे आहोत तेव्हा रामदासांनी खडक फोडून त्यात जिवंत असणारी बेडकी व पाण्याचे खळगे दाखवले. महाराजांना कळून चुकले की, ही सर्व देवाची लीला आहे. मनुष्यमात्र निमित्तापुरता असतो.
० दुसऱ्यांबरोबर स्पर्धा करणे टाळा. कारण आपण पुढे गेलो तर अहंकार वाढतो व दुसरा पुढे गेला तर अहंकार दुखावतो. त्यापेक्षा स्वत:शीच स्पर्धा करा. चांगले काम केल्यास ते अजून कसे उत्तम करता येईल यासाठी परफेक्शनचा ध्यास घ्या.
० सर्वात शेवटी अहंकार हा अनेक प्रयत्नांतीच काबूत येतो, त्यामुळे नेहमी अंतरात्म्याशी संवाद साधा, आपले बोलणे ओठावर येण्यापूर्वीच अहंकाराचा दर्प नाही ना हे अवश्य तपासा, मग बघा- तुम्ही अजातशत्रू तर व्हालच, पण करिअरमध्येपण सर्वोच्च स्थानावर जाल.

Story img Loader