‘ध्ये यवेड अंतरात कष्टांची भीती कुणा
हितगुज ते काटय़ांशी सोबतीस याच खुणा’
या ओळींचे स्मरण झाले ते अलीकडेच प्रकाशित झालेल्या ‘गरुडझेप – एक ध्येयवेडा प्रवास’ या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी भरत आंधळे यांचे पुस्तक वाचून. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकासाठी उपयुक्त ठरावे, असे हे पुस्तक आहे. नाशिक जिल्ह्य़ातील सिन्नर तालुक्यातील ठाणगाव या खेडेगावात संपूर्ण निरक्षर अशा शेतकरी कुटुंबात जन्मलेला भरत आज अत्यंत प्रतिष्ठित अशा भारतीय प्रशासकीय सेवेत आयकर विभागात असिस्टंट कमिशनर म्हणून कार्यरत झाला आहे. देशातील अवघड समजल्या जाणाऱ्या परीक्षांपकी एक असलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षेत उज्ज्वल यश मिळवून तो आज या पदाला पोहोचला आहे. मात्र त्याचा हा मार्ग अत्यंत बिकट, संयम व चिकाटीची कसोटी पाहणारा, स्वाभिमान व आत्मविश्वास यांची सत्त्वपरीक्षा पाहणारा होता. २००० साली स्पर्धापरीक्षांच्या मार्गावर सुरू झालेला भरतचा प्रवास यशापयशाच्या िहदोळ्यावरून होत २०१० साली आय.आर.एस.मध्ये निवड होईपर्यंत चालत राहिला. मात्र या प्रवासातील आपले अनुभव जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवण्याचा भरतने निर्धार केला. यासाठी खेडेगावात, अर्धग्रामीण तसेच शहरी भागांतही त्याने अनेक ठिकाणी व्याख्याने दिली व अजूनही देतो. समोरच्या श्रोतृवर्गाला स्वत:च्या अनुभवांचे वर्णन काहीशा विनोदीशैलीत करणारा भरत भाषणाच्या शेवटी त्यांना ध्येयवादाने झपाटून सोडतो. ‘माझ्यासारखा मुलगा जर नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतो तर तुमच्यापकी प्रत्येक जण हे करू शकतो,’ हे त्याचे वाक्य प्रत्येकाला विलक्षण प्रभावित करते आणि आत्मविश्वास देते. भरतच्या भाषणाच्या यू-टय़ूबवरील क्लिप्स अत्यंत लोकप्रिय आहेत.
भाषणांतून तो मांडत आलेले त्याचे जीवनानुभव आता ‘गरुडझेप – एक ध्येयवेडा प्रवास’ या पुस्तकातून वाचकांपर्यंत आले आहेत.
एकूण पाच प्रकरणांमध्ये विभागलेल्या या पुस्तकात भरतने बालपणाच्या अनुभवांपासून सुरुवात केली आहे. आजोबांनी शिक्षकांशी वाद घालून मिळवून दिलेला भरतचा शाळाप्रवास मजेशीर वळणे घेत गेला. वर्गात न येणारे शिक्षक, पोरांची चालणारी मस्ती, एकही अक्षर लिहिता वाचता न येऊनही पुढच्या इयत्तांमध्ये झालेला प्रवास भरतने विनोदीशैलीत मांडला आहे. बिकट आíथक परिस्थिती, जुगाराचे व्यसन असलेले वडील अशा पाश्र्वभूमीवर भरतच्या शिक्षणासाठी व नंतरच्या प्रवासातही त्याच्या मागे पहाडासारखी उभी राहिलेली त्याची आजी व तिचे नातवावरचे प्रेम व विश्वास मनाला स्पर्शून जातो. शाळेत अभ्यास येत नाही म्हणून मास्तरांनी भेटायला बोलावल्यावर ‘घरातील पहिलाच शिकणारा मुलगा आहे, सांभाळून घ्या,’ अशी विनवणी करणारी व नंतरही तीन वष्रे स्वत:साठी नवी चोळी न शिवता नातेवाईकांनी दिलेले पसे स्वत:साठी न वापरता भरतला अभ्यासासाठी पाठवणारी आजी निरक्षर असूनही मोठी शिकवण देऊन जाते. भरतही आजीविषयी कायम कृतज्ञता व्यक्त करतो. ‘माझा नातू लई मोठा साहेब होणार आहे,’ असा आजीचा भरतवर अदम्य विश्वास होता. भरतला अपयशावर मात करण्यासाठी हा विश्वास खूप मोलाचा ठरला.
गावात दहावी उत्तीर्ण होऊन आय.टी.आय. झालेला चकाचक कपडय़ातला तरुण पाहिल्यावर आपणही दहावीनंतर आय.टी.आय. करायचे भरतने ठरवले. दहावी उत्तीर्ण होण्यासाठी अवघड वाटणाऱ्या गणित, इंग्रजी या विषयांसाठी अपार परिश्रम केले. दिवसभर रोजावर काम करायचं किंवा शेळ्यांना चरायला न्यायचं हा शाळेनंतरचा दिनक्रम असे. शेजाऱ्यांनी दिलेल्या जुन्या कपडय़ांवर निभावायचे. ५४ टक्के मिळवून दहावी उत्तीर्ण झाल्यावर नाशिकला आय.टी.आय.मध्ये भरतने प्रवेश घेतला. पण नाशिकलाही अत्यंत कष्टमय आयुष्य होते. दोन-अडीच तास पायपीट करून कॉलेजला जायचे; खाण्याची आबाळ तर ठरलेलीच. काही काळ एका कंपनीत काम केले. बरोबरीने बाहेरून (दूरस्थ शिक्षणक्रमाद्वारे) पदवीचे शिक्षण पूर्ण करून तो कुटुंबातील पहिला पदवीधर बनला.
याच काळात एका मित्रामुळे पोलीस उपनिरीक्षकाचे प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणाशी ओळख झाली व त्याच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली. कंपनी व मिळणारा नियमित पगार सोडून पोलीस उपनिरीक्षक परीक्षेची तयारी सुरू करण्याचा विलक्षण धाडसी निर्णय त्याने घेतला. घरची आíथक परिस्थिती बिकट, शिक्षणातही फारशी चमक नाही, असे असूनही ध्येयाने प्रेरित झाल्यावर कोणताही त्याग करण्याची तयारी भरतने प्रत्येक टप्प्यावर दाखवली. शहरी सुखवस्तू कुटुंबातील मुलांनाही जो निर्णय कठीण वाटावा, तो भरतने झटक्यात घेतला.
ध्येय नक्की केल्यावर त्यादृष्टीने वाटचाल सुरू झाली. पुण्यात स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त वातावरण आहे हे कळल्यावर नाशिकहून भरत पुण्यात दाखल झाला. कोणाशीही ओळख नसल्याने राहायची, खायची कसलीच सोय असणे शक्य नव्हते. विद्यापीठाच्या जयकर वाचनालयात मुलांशी ओळख काढण्याचा प्रयत्न करून रात्री शिवाजीनगर बसस्थानकात बाकावर अनेकदा झोपी गेलेल्या भरतबद्दल मन हेलावून जाते. विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये पॅरासाइट म्हणून राहत, इतिहासात एम.ए. करत ‘कमवा व शिका’ योजनेत काम करून मेसचा खर्च भागवीत भरतचा ध्येयवेडा प्रवास सुरू होता. सणासुदीलाही कोणतीही हौसमौज न करता अपयशाचे चटके सोसत ‘आपणास कधीतरी चांगले दिवस येतील’ असा विश्वास निर्माण करणाऱ्या जिवाभावाच्या मोजक्या मित्रांसह भरतची मार्गक्रमणा सुरू होती. कुटुंबीयांचा आíथक वा मानसिक पािठबा जवळपास नव्हताच. अशा परिस्थितीतही अथक परिश्रमाने भरत पी.एस.आय. बनला. पण त्याचवेळी (२००४ मध्ये) एका आय.ए.एस. मित्राने यू.पी.एस.सी. परीक्षा देण्याचा सल्ला दिला आणि भरतने हाती आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाच्या संधीला नाकारत यू.पी.एस.सी.चा ध्यास घेतला. मुंबईत राज्य प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत प्रवेश मिळवून अभ्यास केला. इथेच त्याला उत्तम मार्गदर्शन करणारे सहध्यायी मित्र लाभले. दोन वष्रे पूर्व परीक्षेत अपयश आल्यानंतर २००६ साली प्रथमच तो पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाला. दरम्यान एल.आय.सी.मध्ये विकास अधिकाऱ्याची परीक्षा देऊन तिथे निवड झाली. पण आपल्या ध्येयावरची नजर त्याने कधीही ढळू दिली नाही. मुख्य परीक्षेत व मुलाखतीपर्यंत पोहोचूनही आलेले अपयश सत्त्वपरीक्षा पाहत होते. मात्र प्रचंड निर्धार करून अभ्यास करायचा नाही तर जगायचा अशा वेडाने झपाटून भरतने २००९ साली सातवा व अंतिम प्रयत्न करायचे ठरवले. आजवर पोलीस उपनिरीक्षक, रेल्वे टीसी, एल.आय.सी. अशा विविध ठिकाणी मिळालेल्या नोकऱ्या भरतने या वेडापायीच सोडल्या होत्या. परतीचे दोर कापूनच त्याने हे शिवधनुष्य पेलायचे ठरवले होते. अखेर त्याने अपयशाला दूर सारत यशाचे शिखर सर केलेच.
भरतच्या या दहा वर्षांच्या प्रवासाविषयी जाणून घ्यायला हे पुस्तक वाचायलाच हवे. कालपर्यंत सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे वागणारे एम.पी.एस.सी./यू.पी.एस.सी.त यशस्वी झाल्यावर कसे यशाने बेभान होतात, इतरांना तुच्छ समजू लागतात याचा भरतने जवळून अनुभव घेतला. त्याचवेळी त्याने निर्धार केला की आपले असे होऊ द्यायचे नाही. आपल्यातील माणूसपण, साधेपण यशामुळे झाकोळू द्यायचे नाही. भरतला प्रत्यक्ष भेटलेल्यांना खरोखर याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. या माणसाचे पाय जमिनीवर आहेत व नेहमी राहतील. पदरी पडलेल्या अपयशातून बोध घेत आपल्या ध्येयाकडे अविरत केलेली भरतची वाटचाल अक्षरश: थक्क करते. जरासा पराभव किंवा नकारात्मक शेरा पचवू न शकणाऱ्या बहुतांश मुलांना भरतकडून शिकण्यासारखे खूप आहे. सरकारी नोकरीत असलेल्यांना गडगंज हुंडा देऊन आपली मुलगी देण्याचा रिवाज मोडून काढत भरतने बिना हुंडय़ाचे लग्न केले. डॉक्टरकीचे शिक्षण घेतलेल्या मुलीने भरतकडे कोणतेही पद नसतानाही त्याच्याशी लग्न करण्याची तयारी दाखवली, हे विशेष. लग्न झाल्यावर दोन-चार दिवसांतच त्यांनी यू.पी.एस.सी.च्या मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे किमान १०० व्याख्यानांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी जागृत करायचे ध्येय ठेवले व झंझावाती दौरे सुरु केले. परीक्षेच्या तयारीपासून ते परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंतच्या खडतर प्रवासात माणसाच्या स्वभावाचे अनेक पलू त्याला दिसले. दुसऱ्याच्या वाईटावर टपलेल्या माणसांपासून अत्यंत कठीण काळातही आíथक, मानसिक आधार देणाऱ्या जिवलग मित्रांपर्यंत अनेकजण भरतने पाहिले. या प्रवासात त्याने स्वत:शी निर्धार केला की आयुष्यात कधी माज करायचा नाही आणि आपल्या अधिकारीपदापेक्षा आपल्यातला
चांगला माणूस सर्वाच्या ध्यानात राहिला पाहिजे. हा ध्येयवेडा ‘भरतप्रवास’ वाचून शेवटी कुसुमाग्रजांच्या ‘कोलंबसचे गर्वगीत’ या कवितेतील ओळींचे पुन:पुन्हा स्मरण होते-
‘अनंत अमुची ध्येयासक्ती अन् अनंत आशा किनारा तुला पामराला’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा