प्रसिद्ध व्यवस्थापन सल्लागार कंपनी डेलॉइटने ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या सहकार्याने केलेल्या ‘इंडिया टॅलेंट सव्‍‌र्हे : २०१२’ या सर्वेक्षणात प्रामुख्याने असे आढळून आले की, सद्य:स्थितीत भारतीय कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचा आपल्या प्रचलित रोजगार नोकरीत राहण्यावर भर असून, बहुसंख्य म्हणजेच ५७ टक्के कर्मचाऱ्यांना असे वाटते. जागतिक स्तरावर अशी मानसिकता असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण ३४ टक्केच आहे, हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.
‘डेलॉइट’ व ‘एआयएमए’ यांच्याद्वारे संगणकीय पद्धतीने करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात विविध महानगरे, राज्य, उद्योग-व्यवसाय यांमधील राष्ट्रीय स्तरावरील सुमारे २,१२२ जणांनी प्रतिसाद दिला होता. यापैकी अधिकांश म्हणजेच ६७ टक्के कर्मचाऱ्यांनी त्यांना मिळणारे वेतन, आर्थिक व इतर लाभ हे त्यांच्या नोकरीतील प्रमुख प्रोत्साहनपर मुद्दे असल्याचे नमूद केले असून, नोकरीत बदल करणाऱ्या वा करू इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अपुरा वा अपेक्षेहून कमी पगार, बढतीच्या अपुऱ्या संधी या बाबींमुळे ही मंडळी नोकरी बदलण्यास प्रवृत्त होत असल्याचे स्पष्ट केले आहे हे विशेष.
या सर्वेक्षणाच्या निमित्ताने भारतीय व्यवस्थापक आणि व्यवस्थापनापुढे सध्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात जी आव्हाने प्रामुख्याने पुढे आली आहेत, त्या अनुषंगाने या मंडळींनी दिलेल्या प्रतिसादानुसार व्यापक स्तर आणि स्वरूपातील कर्मचाऱ्यांना हाताळणे (६२ टक्के), नेतृत्वाबद्दल विश्वास निर्माण करणे  (६७ टक्के), कर्मचाऱ्यांच्या पगारविषयक अपेक्षांची पूर्तता करणे व कंपन्यांमध्ये अंतर्गत व्यवस्थापन- नेतृत्वाची निर्मिती (प्रत्येकी ६६ टक्के) याप्रमाणे प्राधान्यक्रम दिसून आला आहे. एक अन्य लक्षणीय बाब म्हणजे ११ पैकी केवळ एका कर्मचाऱ्याला असे वाटले की, त्यांची कंपनी संबंधित क्षेत्रात जागतिक स्तरावर अव्वल असून ही बाब त्याला त्या कंपनीत काम करण्यास उद्युक्त करीत आहे.
कर्मचारी आणि उत्पादकता ‘प्राइस वॉटर कूपर’ (पीडब्लूसी)तर्फे ‘ह्य़ुमन कॅपिटल २०१२’ या अहवालात असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, २००९ ते २०११ या तीन वर्षांत मिळून कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली एकत्रित पगारवाढीचे प्रमाण १६ टक्के असून, याच कालावधीत कर्मचाऱ्यांची उत्पादकता मात्र घटल्याने ही बाब आता औद्योगिक क्षेत्रासाठी एक प्रकारे काळजीचे कारण ठरले आहे. यासंदर्भात ‘पीडब्लूसी’ने केलेल्या विश्लेषणानुसार उद्योग-व्यवसाय क्षेत्रात २००६ ते २०१० या कालावधीत व्यवसायविषयक स्थिरता असल्याने कर्मचाऱ्यांचे ‘वाढते पगार, घटती उत्पादकता’ या व्यस्त प्रमाणाचे परिणाम जाणवले नसले तरी २०११ व त्यानंतरच्या जागतिक स्तरावरील मंदीनंतर व त्यामुळे आता ही बाब केवळ कंपन्यांच नव्हे तर कर्मचाऱ्यांसाठीसुद्धा आव्हानपर बाब बनली आहे.
‘पीडब्लूसी’च्या मते, कर्मचाऱ्यांची कार्यपद्धती, जबाबदारीची जाणीव व कर्तव्यतत्परता, कामाबद्दलची सचोटी, कार्य-कौशल्य व त्यांच्या पगार व फायदेवाढीची कंपनीची केवळ विक्रीच नव्हे तर उलाढालीशी सांगड घालणे अत्यंत गरजेचे असून, पीडब्लूसीद्वारा जागतिक स्तरावरील ५० देशांमध्ये कार्यरत असणाऱ्या २,४०० कर्मचाऱ्यांच्या सहभागासह असणाऱ्या या सर्वेक्षणाचा हाच खरा व मोठा मतितार्थ आहे.
कर्मचाऱ्यांची निष्ठा आणि कार्यप्रवणता
दरम्यान, ‘टॉवर्स वॉटस्न’ या व्यवस्थापन सल्लागार कंपनीतर्फे जागतिक स्तरावर करण्यात आलेल्या ‘ग्लोबल वर्कफोर्स स्टडी-२०१२’ नुसार कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रवणतेची त्यांच्या संबंधित कंपनीवरील निष्ठेशी सांगड घालण्याच्या गरजेवर विशेष भर देण्यात आला आहे.
५० बहुराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग आणि प्रतिसाद यावर आधारित असणाऱ्या ‘ग्लोबल वर्कफोर्स स्टडी-२०१२’ या सर्वेक्षणाद्वारे या मुद्दय़ाची पुष्टी करण्यात आली आहे की, कर्मचाऱ्यांची त्यांचे काम आणि कंपनीप्रती असणाऱ्या निष्ठेमुळे त्यांची उत्पादकताच नव्हे तर कामाच्या दर्जामध्येसुद्धा सुमारे तीन पटीने वाढ होत असून, कंपनी आणि कर्मचारी या उभयतांच्या दृष्टीने ही बाब म्हणजे एक जमेची बाजू मानली जाते.
‘टॉवर्स वॉटसन्’द्वारा जागतिक स्तरावर करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या सुमारे ३२००० कर्मचाऱ्यांपैकी ३५ टक्के कर्मचारी त्यांच्या कामाच्या संदर्भात कार्यप्रवण असल्याचे तर २६ टक्के कर्मचारी कार्यप्रवण नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वेक्षणात दिसून आलेली अन्य महत्त्वपूर्ण बाब म्हणजे पगार-वेतनमान या बाबी कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असल्या तरी वरिष्ठ आणि नेतृत्वाची कार्यशैली व प्रोत्साहनपर वागणूक त्यांना कार्यप्रवण व तत्पर बनविते हे विशेष.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा