लष्करात अधिकारी बनण्याच्या दृष्टीने एन.सी.सी.तील युवक-युवतींना अनेक संधी उपलब्ध आहेत. त्याविषयी..
लष्करात अधिकारी बनण्यासाठी युवावर्गाने प्रवृत्त होण्याचे दृष्टीने राष्ट्रीय छात्र सेनेची (एनसीसी) स्थापना झाली. चारित्र्य, मैत्री, शिस्त, नि:धर्मी विचार, साहसी वृत्ती, नि:स्वार्थी सेवा यांसारखे गुण युवापिढीत रुजले तर संघटित, प्रशिक्षित, प्रेरित तरुण पिढी तयार होईल, जे नेतृत्वक्षम असतील आणि देशप्रेमाचे बाळकडू त्यांना मिळालेले असेल, हा राष्ट्रीय छात्र सेना उभा करण्याचा मुख्य हेतू होता. एनसीसीच्या कठोर प्रशिक्षणातून तावून-सुलाखून निघालेल्या विद्यार्थ्यांना लष्करात अधिकारपद भूषविण्यासाठी विशेष संधी उपलब्ध असतात. त्या संधींबद्दल जाणून घेऊयात-
लष्करात अधिकारी बनण्याच्या दृष्टीने एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांसाठी दर सहा महिन्यांनी संधी प्राप्त होते. या संधी खालीलप्रमाणे-
१) भूदल –
(अ) एन.सी.सी. एन्ट्री
पुरुष : ५० जागा (शॉर्ट सव्‍‌र्हिस कमिशन)
महिला : चार जागा (शॉर्ट सव्‍‌र्हिस कमिशन)
(ब) सी.डी.एस. परीक्षा –
पुरुष : ३२ जागा (पर्मनन्ट कमिशन)
प्रशिक्षण- इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमी, डेहराडून
आर्मी (सैन्य दलातील) एन.सी.सी. एन्ट्रीसाठी कोणत्याही दलातील एन.सी.सी. ‘सी’ सर्टिफिकेट ‘ए’ किंवा ‘बी’ ग्रेड असणे तसेच पदवी परीक्षेत ५० टक्क्य़ांहून अधिक गुण असणे आवश्यक. पर्मनन्ट कमिशनसाठी असलेल्या ३२ जागांसाठी सी.डी.एस. लेखी परीक्षा पास होणे, त्याचप्रमाणे आर्मी विंगचे ‘सी’ सर्टिफिकेट आवश्यक आहे.
२) हवाई दल – हवाई दलातील एन.सी.सी. ‘सी’ सर्टिफिकेट पुरुषधारकांना हवाई दलात पायलट बनण्याची संधी आहे. त्याकरिता अर्ज एन.सी.सी. एअर विंग ओ.सी. द्वारा अर्ज करणे आवश्यक आहे. यातही पर्मनन्ट कमिशन मिळण्याची संधी असून सर्वसाधारणपणे सहा जागा राखीव आहेत. मात्र त्यासाठी एस.एस.बी. मुलाखत उत्तमरीत्या पार पाडणे अनिवार्य आहे.
३) नौदल – इंडियन नेव्हल अ‍ॅकॅडमीमध्ये प्रवेशाकरिता एन.सी.सी. नेव्हल विंग ‘सी’ सर्टिफिकेटधारकांना सहा जागा राखीव असून त्यासाठी बी.ई./बी.टेक्. पदवी असणे गरजेचे असून सी.डी.एस. परीक्षा देणे गरजेचे आहे. या सहा जागा सी.डी.एस. परीक्षा उत्तीर्ण करून एस.एस.बी. मुलाखत पार करणाऱ्या तरुण पुरुषांकरिता उपलब्ध आहेत.
ऑक्टोबर २०१३ पासून सुरू होणाऱ्या एन.सी.सी. स्पेशल एन्ट्री स्कीम ३४ व्या कोर्ससाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत, ज्यासाठी पदवी पूर्ण असलेले तरुण-तरुणी ज्यांना पदवी परीक्षेत ५० टक्क्य़ांहून अधिक गुण मिळाले आहेत ते या कोर्ससाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. त्यांना एन.सी.सी. ‘सी’ सर्टिफिकेटमध्ये ‘ए’ अथवा ‘बी’ श्रेणी संपादन केलेली असणे आवश्यक ठरते. एन.सी.सी. आर्मी विंग, नेव्हल विंग तसेच एअरफोर्स विंगचे ‘सी’ सर्टिफिकेट  मिळालेले विद्यार्थी या कोर्ससाठी अर्ज दाखल करण्यास पात्र असतात. पदवीच्या शेवटच्या वर्षांत शिकत असलेले तरुण-तरुणीदेखील या ठिकाणी अर्ज करण्यास पात्र असून त्यांना पदवी (कला, वाणिज्य, शास्त्र कुठल्याही विद्याशाखेचा) अभ्यासक्रमाच्या  पहिल्या आणि दुसऱ्या वर्षांत अ‍ॅग्रिगेट मार्क ५० टक्क्य़ांहून अधिक असणे आवश्यक आहे. यासाठी अर्ज करण्याची पद्धती (फॉरमॅट) फेब्रुवारी २ च्या ‘एम्प्लॉयमेन्ट न्यूज’मध्ये दिलेला आहे. आपण http://www.employmentnews.gov.in या संकेतस्थळावरही अर्जाचा नमुना पाहू शकाल. अर्ज टाइप करून/कॉम्प्युटर टाइप करून ज्या एन.सी.सी. युनिटकडून आपणास ‘सी’ सर्टिफिकेट देण्यात आलेले आहे, त्या युनिट म्हणजे बटालियन/ग्रुप हेडक्वार्टरमध्ये २८ फेब्रुवारी २०१३ च्या आत जमा करावयाचा आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना एस.एस.बी. मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. मुलाखत पाच दिवस चालते, ज्यामध्ये मानसिक चाचणी, सामूहिक परीक्षण आणि वैयक्तिक मुलाखत द्यावी लागते. मुलाखतीत उत्तीर्ण झालेल्या तरुणांना सैनिकी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करून घ्यावी लागते. ही तपासणीदेखील तीन-चार दिवस चालते. वैद्यकीयरीत्या फिट ठरलेल्या उमेदवारांना मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारावर असलेल्या गुणवत्ता लक्षात घेऊन रिक्त असलेल्या जागांनुसार प्रशिक्षणासाठी नियुक्ती होते.
या प्रवेशाअंतर्गत चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अ‍ॅकॅडमी येथे ४९ आठवडय़ांचे सैनिकी प्रशिक्षण उमेदवारांना देण्यात येते. हे प्रशिक्षण यशस्वीरीत्या संपविल्यानंतर या उमेदवारांना भारतीय सैन्य दलांत ‘लेफ्टनंट’ ही रँक मिळते आणि त्यानंतर हे अधिकारी सैन्य दलांच्या वेगवेगळ्या रेजिमेंट/युनिटमध्ये कार्यरत होतात.
कमिशन झालेल्या तरुणांना रु. ६३ हजार ७२५/- दरमहा सी.टी.सी. (कॉस्ट टू कंपनी) असे वेतन मिळते. या व्यतिरिक्त स्वत:ला तसेच कुटुंबाकरिता वैद्यकीय सुविधा, कँटीन सुविधा, रेशन, मेस/क्लब सुविधांचा लाभ घेता येतो.
अधिक माहितीसाठी तरुणांनी आपल्या एन.सी.सी. युनिटमधील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. अधिकाऱ्यांना तरुणांच्या शंका निरसन करण्यात निश्चित आनंदच मिळेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Entry in army thru ncc
Show comments