मागील लेखामध्ये आपण नागरी सेवा पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमातील आíथक व सामाजिक विकास या घटकाविषयी जाणून घेतले. प्रस्तुत लेखामध्ये नागरी सेवा पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण व अधिक ‘वेटेज’ असणारा पर्यावरण, परिस्थितिकी, जैवविविधता व हवामान बदलाशी संबंधित मुद्दे या अभ्यास घटकांविषयी सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. पर्यावरण व पर्यावरणीय समस्या हा समकालीन जगातील कळीचा मुद्दा आहे. भारताचा विचार करता मागील दोन दशकांमध्ये औद्योगिकीकरण, विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगती, कृषी क्षेत्राचा विस्तार इत्यादींमुळे वेगाने आíथक विकास झाला. पण मानवी हव्यासामुळे पर्यावरणामध्ये अनियंत्रितपणे हस्तक्षेप करण्यात आला. परिणामी, प्रदूषण, नसíगक संसाधनांचा ऱ्हास, परिस्थितीकीय असंतुलन यासारख्या पर्यावरणाशी संबंधित समस्यांचा निर्माण झाल्या. यापकी जागतिक तापमानवाढ, ओझोन वायू अवक्षय, जैवविविधतेचा ऱ्हास इत्यादी अत्यंत गंभीर आणि गुंतागुंतीच्या समस्यांमुळे जीवसृष्टीच्या अस्तित्वालाच धोका पोहोचला आहे. परिणामी, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर या विषयाला महत्त्व प्राप्त झाले. म्हणूनच प्रशासनात येण्यास इच्छुक असलेल्या युवक-युवतींना या समस्येचे ज्ञान असणे क्रमप्राप्त आहे. मागील चार वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये यूपीएससीकडून या घटकावर इतर घटकांच्या तुलनेत अधिक भर दिला. यावरून या विषयाचे महत्त्व अधोरेखित होते.
आतापर्यंत या विषयावर २२ ते २८ प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. या अभ्यास घटकामधील काही भाग स्थिर (Static) स्वरूपाचा आहे व बहुतांश भाग चालू घडामोडींशी संबंधित असल्याने गतिशील आहे. या अभ्यास घटकामध्ये पर्यावरण परिस्थितिकी, जैवविविधता, वातावरणबदल इत्यादीशी संबंधित सर्वसाधारण मुद्दय़ांचा समावेश आहे. म्हणून यूपीएससीने या घटकाच्या तयारीकरता कोणत्याही प्रकारच्या विशेष ज्ञानाची आवश्यकता नसल्याचे अभ्यासक्रमात नमूद केले आहे.
या अभ्यास घटकावर विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांमधून विद्यार्थ्यांचे पर्यावरण परिस्थितिकीचे मूलभूत आकलन तपासले जाते. यामध्ये परिसंस्था, किस्टोन स्पेसीज, अन्नसाखळी, पर्यावरणीय संवेदनशील विभाग, जैवविविधता, जिवावरण प्रदूषण आदी मूलभूत संकल्पनांच्या बरोबरीने जागतिक तापमानवाढ, धोकादायक स्थितीतील प्रजाती, वातावरण बदलावरील परिषदा, वेगवेगळे करार आदी चालू घडामोडींशी संबंधित प्रश्नांचा अंतर्भाव असतो. उदा. २०१३ मध्ये इकॉलॉजिकल सक्सेशन (Ecological Succession) – आम्ल वर्षां, अन्नसाखळी तसेच महासागर, सरोवर, गवताळ प्रदेश व खारफुटी या परिसंस्थांचा घटत्या उत्पादकतेनुसार योग्य क्रम लावा इत्यादी संकल्पनात्मक व पर्यावरण परिस्थितिकीच्या मूलभूत आकलनाविषयीचे प्रश्न विचारले होते. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्ड, नॅशनल टायगर कन्झर्वेशन अ‍ॅथॉरिटी (NTCA), नॅशनल गंगा रिव्हर बेसिन अ‍ॅथॉरिटी यांसारख्या पर्यावरण व संवर्धन क्षेत्रात कार्यरत संस्थांवर २०१४ मध्ये प्रश्न आले होते. यामुळे या संस्था व त्यांच्या कार्याविषयी सविस्तर माहिती करून घेणे
श्रेयस्कर ठरेल. याबरोबरच २०११ मध्ये कार्बन क्रेडिट्स जागतिक पर्यावरण सुविधा, अंटाíक्टका प्रदेशातील ओझोन छिद्रनिर्मितीची कारणे, क्लोरोफ्ल्यूरो कार्बन्स कोणत्या घटकामध्ये वापरला जातो इत्यादी वातावरणातील बदलाशी संबंधित
प्रश्न आलेले होते. या अभ्यास घटकातील महत्त्वपूर्ण विषय जैवविविधतेवरही दरवर्षी हमखास प्रश्न विचारला जातो. २०११ मध्ये जैवविविधतेचे महत्त्व, पश्चिम घाट, श्रीलंका व इंडो बर्मा प्रदेशांना ‘जैवविविधता हॉटस्पॉट’ म्हणून मान्यता मिळण्याकरता कोणते
निकष साहाय्यभूत ठरतात, तसेच २०१२ मध्ये राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण (NBA) यासारख्या प्रश्नांमधून जैवविविधतेचे महत्त्व अधोरेखित होते.
या अभ्यास घटकातील पारंपरिक भाग मर्यादित असला तरी समकालीन स्वरूपामुळे याची व्याप्ती अधिक आहे. प्रश्नपत्रिका विश्लेषण केल्यास परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण घटकांना ओळखून त्याची प्राधान्यक्रमाने तयारी केल्यास अभ्यास घटकांवर पकड मिळवता येते आणि हमखास गुण प्राप्त करता येतात. या विषयामध्ये पर्यावरण परिस्थितिकीशी संबंधित संकल्पना, वातावरणातील बदल व जागतिक तापमानवाढ आजमितीस असणाऱ्या गंभीर समस्या आहेत. या समस्यांप्रती जागरूकता निर्माण करण्यासाठी जगभरामध्ये विविध उपक्रम राबवले जातात. हे उपक्रम राबविणाऱ्या संस्था व त्यांचे स्वरूप काय असते याविषयी जाणून घेणे फायदेशीर ठरते. कारण २०१४ मध्ये ‘वसुंधरा तास’ (Earth Hour) विषयी प्रश्न विचारण्यात आला होता. याबरोबरच IPCC, UNFCC सारख्या आंतरराष्ट्रीय संस्था, मॉट्रियल प्रोटोकॉल, रामसर कन्वेन्शन नागोया प्रोटोकॉल, क्योटो प्रोटोकॉल, हवामान बदलाविषयी दरवर्षी होणाऱ्या परिषदांची माहिती करून घ्यावी. याबरोबरच जैवविविधता, जैवविविधतेविषयीचे कायदे, CBD (Convention on Biodiversity), IUCN, जैवविविधतेविषयीचे आंतरराष्ट्रीय वर्ष, धोक्यातील प्रजाती (Endangered Species), वन्यजीव पार्क, अभयारण्ये, जिवावरण राखीव क्षेत्रे, जैवविविधता हॉटस्पॉटस् यांचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरेल. प्रदूषण, प्रदूषणाशी संबंधित धोरणे, कार्यक्रम, कायदे, पर्यावरण व वन मंत्रालयाची धोरणे, नियोजन अंमलबजावणी इ. त्याचबरोबर पर्यावरण, वन्यजीव, वने यासंबंधीची अगदी अलीकडची आकडेवारी, अहवाल अभ्यासावेत.
या अभ्यास घटकाच्या तयारीकरता इग्नू (IGNOU) चे अभ्यास साहित्य व ‘पर्यावरण परिस्थितिकी’ – तुषार घोरपडे हे संदर्भ ग्रंथ उपयुक्त ठरतात. याबरोबरच या क्षेत्रातील घडामोडींसाठी वृत्तपत्राबरोबरच इंटरनेटचाही सढळ हाताने वापर करावा. ‘द िहदू’ या वृत्तपत्राचे तसेच ‘बुलेटिन’, ‘डाऊन टू अर्थ’, ‘सायन्स रिपोर्टर’ आदी मासिकांचे नियमित वाचन करून उपयुक्त बाबींची
नोंद ठेवावी. PIB केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालय तसेच पर्यावरण क्षेत्रात कार्यरत आंतरराष्ट्रीय संस्थांच्या वेबसाइट्सना नियमित भेट द्यावी. यामुळे या घटकाची तयारी परिपूर्ण होण्यास मदत होईल.         
admin@theuniqueacademy.com

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Environment ecology biodiversity