रॅम्पवरचे झगमगते शोज, त्यातील चमकधमक पाहून अनेकांना वाटते की आपणही फॅशन डिझायनर व्हावे. विचार चांगला आहे, पण त्यात कष्ट नक्कीच आहेत. मुळात फॅशन डिझायनिंग म्हणजे केवळ कपडे शिवणे नव्हे. त्यापलीकडेही अनेक गोष्टींचा अंतर्भाव यामध्ये असतो. शिवणाचे प्रकार, विविध प्रकारच्या टाक्यांचे प्रकार, टिपा मारणे, डिझाइन काढणे, प्रत्यक्ष कपडे शिवणे, रंगसंगती, कपडय़ांवरील जरीवर्क किंवा अन्य कलाकुसर करणे या सगळ्याचा समावेश फॅशन डिझायनिंगमध्ये होतो. काही संस्था याला फॅशन डिझायनिंग कोर्स असे म्हणतात तर काही संस्था फॅशन टेक्नॉलॉजी. पण हा एकाच प्रकारचा कोर्स असून त्यातला अभ्यासक्रमही सारखाच असतो. फॅशन डिझायनिंगचे आता अनेक अभ्यासक्रम बाजारात उपलब्ध आहेत. फक्त गुगल करायची खोटी की त्याचे अनेक पर्याय आणि संस्था आपल्याला दिसतात. परंतु आंधळेपणाने कोणत्याही संस्थेवर विश्वास ठेवणे टाळा.
फॅशन डिझायनिंगसाठी पदविका आणि पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यात एक वर्ष, दोन वर्षे, तीन वर्षे अशा वेगवेगळ्या कालावधीचे अभ्यासक्रम असतात. इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन डिझाइन, पनवेल इथे फॅशन डिझायनिंगचे प्रामुख्याने दोन विभाग आहेत. पहिला भाग म्हणजे आयएनआयएफडी आयएमडी कोर्स हा पदविका अभ्यासक्रम आहे. यात तुम्ही कालावधी निवडू शकता. तसेच दुसऱ्या भागात आयएनआयएफडी अनामलाई हा पदवी अभ्यासक्रम आहे. आपल्या आवडीनुसार आपण इथे प्रशिक्षण घेऊ शकता. अनामलाई विद्यापीठाशी हा अभ्यासक्रम संलग्न आहे. पदवी अभ्यासक्रमाचे सर्व परीक्षा आणि पेपर हे मुख्य कार्यालय चंदिगढ इथून येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या सेंटरवर जाऊन पेपर द्यावे लागतात. संस्थेचा याच्याशी काही संबंध नसतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांना यश मिळते.
अनामलाई डिग्री कोर्समध्ये भारतीय पेहरावाच्या प्रशिक्षणावर अधिक भर दिला जातो. तर आयएमडी कोर्समध्ये पाश्चिमात्य पेहरावाच्या प्रशिक्षणावर भर दिला जातो. अभ्यासक्रमांचा कालावधी वेगळा असल्याने त्यात नेमका काय फरक पडतो, असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. याचे उत्तर म्हणजे जसजसा अभ्यासक्रमाचा कालावधी वाढत जातो त्याप्रमाणे विषयातील सखोलताही वाढते.
कोण बनू शकते?
प्रत्येक गोष्टीचे शिक्षण किंवा प्रशिक्षण घेण्यासाठी ठरावीक शैक्षणिक पात्रता लागते. परंतु फॅशन डिझायनिंगचे तसे नाही. विज्ञान, कला, वाणिज्य यांसारख्या कोणत्याही शाखांतून शिक्षण घेतलेले विद्यार्थी फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण घेऊ शकतात. या क्षेत्रात केवळ शालेय शिक्षणापेक्षा कलेला महत्त्व असते. तरीही किमान दहावीपर्यंतचे शिक्षण आवश्यक आहे. अन्यथा अभ्यासक्रमातील अनेक संज्ञा विद्यार्थ्यांना कळत नाहीत. काही संस्था प्रवेशपरीक्षाही घेतात तर काही ठिकाणी केवळ १०-१२वीच्या गुणांवर प्रवेश दिला जातो.
प्रशिक्षण कुठे मिळेल?
अनेक खासगी संस्थांमध्ये आता या विषयाचे प्रशिक्षण दिले जाते. परंतु कोणत्याही अभ्यासक्रमाची निवड करण्याआधी संस्थेची पारख करणे महत्त्वाचे असते.
- एनआयएफटी – http://www.nift.ac.in
- आयएनआयएफडी- http:// http://www.inifdmumbai. com
- एसएनडीटी कॉलेज – http://sndt.ac.in/
- निर्मला निकेतन – http:// http://www.nirmalaniketan. com/
- जेडी इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी- http://www.jdinstitute.com/
शब्दांकन- मधुरा नेरुरकर
प्रा. सुचित्रा राजगुरू