औपचारिक आणि अनौपचारिक अशा दोन्ही प्रकारच्या संभाषणात आपले विचार, मत, अपेक्षा स्पष्टपणे मांडल्या गेल्या पाहिजेत. नोकरीसाठी, मुलाखतीतही स्वत:च्या क्षमता, कौशल्ये, आपल्या अपेक्षा स्पष्ट सांगाव्यात आणि त्याही अर्थातच कौशल्याने. कारण समोरच्या व्यक्तीलाही स्पष्टपणा आवडतो. गुळमुळीत बोलणे, अर्धवट बोलून विषय संपवणे कुणालाही आवडत नाही.
व्यवसायासंबंधी बोलणे करतानाही आपल्या अटी, शर्ती, नियम स्पष्टपणे सांगणे गरजेचे असते. ते जरूर सांगावेत. त्यामुळे पुढील अप्रिय प्रसंग टाळता येतात.
संशोधनात किंवा विपणनाचा अभ्यास करून हाती आलेली आकडेवारी, त्याचा अर्थ यांचे सादरीकरण करावे लागते. अशा वेळीही स्पष्टपणे प्रत्येक आकडा काय दर्शवतो, यातून नेमके काय सुचवायचे आहे, ते व्यवस्थितपणे सांगावे.
व्यवसायासंबंधी, नोकरीच्या मुलाखतीसंबंधी, दूरध्वनीवरून बोलताना याची जाणीव ठेवावी. थोडक्यात नेमके बोलल्याने समोरच्या व्यक्तीला चटकन लक्षात येते आणि निर्णय घेणे सोपे जाते. बोलताना भाषाही योग्य असावी.
व्यावसायिक बैठका अथवा भेटीगाठी करताना संभाषणविषयक पूर्वतयारी करणे उत्तम. पूर्वतयारी न करता गेल्यास अंदाजे उत्तर देणे, चुकीची उत्तरे देणे टाळता येईल.
सार्वजनिक प्रसंगी बोलायचे असल्यास ज्या विषयावर बोलायचे आहे, त्यातील टळक मुद्दय़ांची टिपणे काढावीत. जितकी पूर्वतयारी पक्की, तितके काम उत्तम प्रतीचे होणार, याची खात्री बाळगावी.
बोलताना बढाया मारणे टाळावे. व्यावसायिक भेटीगाठींमध्ये ज्या व्यक्तीला भेटायला जायचे, त्या व्यक्तीचे नाव, हुद्दा माहिती असणे आवश्यक आहे. बोलताना विषयांतर करणे टाळावे. आत्मविश्वास बोलण्याने तुमच्या बोलण्याला वजन प्राप्त होतं.
(कला संभाषणाची – डॉ. नीलम ताटके, डायमंड प्रकाशन, पृष्ठे – १११, किंमत – १०० रु.)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा