भारतीय हवाई दलात जाण्याची मनीषा बाळगणाऱ्या युवकांना लष्कराच्या हवाई विभागात अथवा नौदलाच्या हवाई विभागात दाखल होण्याचा राजमार्ग खुला आहे. त्याविषयी..
अवकाशात भरारी घेण्याची ऊर्मी बाळगणारे युवक भारतीय हवाई दलात जाण्यासाठी प्रचंड उत्सुक असतात. मात्र, त्या अनुषंगाने द्याव्या लागणाऱ्या परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळाले तरी अशी भरारी घेण्याची संधी प्रत्येकाला मिळतेच, असे नाही. भारतीय हवाई दलात त्या तुलनेत जागा कमी असतात. त्यामुळे उत्तीर्ण होऊन हवाई दलात संधी न मिळालेल्या बहुतेकांना मग पायदळाचा पर्याय निवडणे अपरिहार्य ठरते. पायदळात अधिकारी पदावर दाखल झाल्यावरही अवकाशात भरारी घेण्याचे स्वप्न साकार करता येते, हवाई दलासारखी किंबहुना त्याहून अधिक धाडसी कामगिरी करण्याची संधी असते. कारण, भारतीय हवाई दलाप्रमाणे लष्कर आणि नौदलाचे स्वतंत्र हवाई दल अस्तित्वात आहे. या दोन्ही हवाई दलांचा परस्परांशी तसा कोणताही थेट संबंध नसतो. म्हणजे, भारतीय हवाई दलात जाण्यास धडपड करणारे परंतु, अपेक्षित गुणवत्तेअभावी जाऊ न शकलेल्या अधिकाऱ्यांना लष्करी हवाई दल खुणावत असते. नौदलाच्या हवाई सेवेत वैमानिक होण्यासाठी मात्र वेगळी प्रक्रिया आहे.
पायदळ, हवाई दल आणि नौदल ही सैन्यदलाची मुख्य तीन अंगे. या प्रत्येक दलाच्या अंतर्गत अनेक उपविभाग आहेत. त्यापैकीच पायदळातील उपविभाग म्हणजे लष्कराचे हवाई दल (आर्मी एव्हिएशन). भारतीय हवाई दल म्हटले की, प्रचंड वेगात जाणारी लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर डोळ्यासमोर येतात. पण, लष्कराच्या हवाई दलाचे स्वरूप भिन्न आहे. या दलाकडे लढाऊ विमाने नसतात. त्याची संपूर्ण भिस्त केवळ हेलिकॉप्टरवरच आहे. सीमेवर तैनात लष्कराची जीवनवाहिनी म्हणून ती अहोरात्र कार्यरत असतात. नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगात ती नेटाने कामगिरी बजावतात. स्थापनेला २६ वर्षे पूर्ण झाली असली तरी या दलास हेलिकॉप्टर वैमानिकांचा तुटवडा भासत आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी लष्कराने नाशिक येथे खास कोम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन स्कूलची स्थापना केली. या ठिकाणी तरुण लष्करी अधिकाऱ्यांना वर्षभराचे हवाई प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणानंतर त्यांना वैमानिकाचा दर्जा प्राप्त होतो. लष्कराच्या हवाई दलात केवळ पायदळातील अधिकाऱ्यांना संधी मिळते. कारण, त्यांना पायदळाच्या गरजा व मोहिमांचे आकलन असते.
या स्कूलचा दहावा दीक्षान्त सोहळा अलीकडेच पार पडला. लष्कराच्या वेगवेगळ्या उपविभागांत कार्यरत ३५ अधिकाऱ्यांची तुकडी हे प्रशिक्षण पूर्ण करून वैमानिक म्हणून या दलात दाखल झाली. विशेष म्हणजे, स्कूलच्या इतिहासात प्रथमच यंदाच्या वैमानिकांच्या यादीत एकाच वेळी तब्बल आठ मराठी अधिकाऱ्यांचा समावेश होता. यातील काही जणांनी भारतीय हवाई दलात जाण्यासाठी आधी धडपड केली होती. परंतु, तेव्हा गुणवत्ता यादीत अपेक्षित स्थान न मिळाल्याने त्यांना पायदळात जावे लागले. तेथून संबंधितांनी अवकाशात भरारी घेण्याचे स्वप्न साकार केले आहे. त्यात आशीष खेरडे (अमरावती), विकास बांदेकर, अर्जुन सावंत व राहुल चव्हाण (मुंबई), दीपक नेटके, मयूरेश बारभाई (पुणे), शुभम कुलकर्णी (नाशिक) आणि अविनाश सोमवंशी (उस्मानाबाद) या कॅप्टन पदावर कार्यरत अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
हवाई प्रशिक्षण लष्कराकडून
युवा अधिकाऱ्यांच्या हवाई प्रशिक्षणाचा संपूर्ण भार भारतीय लष्कर उचलते. हवाई सरावाचा कोणताही अनुभव नसलेल्या लष्करी अधिकाऱ्यांना कोम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन स्कूलतर्फे ‘बेसिक पायलट’ आणि नंतर ‘कोम्बॅक्ट एव्हिएटर्स’ या प्रत्येकी सहा महिन्यांच्या दोन अभ्यासक्रमांत प्रशिक्षण दिले जाते. त्या अंतर्गत प्रत्येकाला ९० तासांच्या हवाई सरावाचा अनुभव घेणे बंधनकारक आहे. स्कूलला एक तासाचे हवाई प्रशिक्षण द्यावयाचे असल्यास इंधन, हेलिकॉप्टर देखभाल व दुरुस्तीच्या खर्चाचा ताळमेळ केल्यास सुमारे ९० हजार रुपये खर्च येतो. अभ्यासक्रमाच्या निकषानुसार
९० तासांच्या प्रशिक्षणावरील हा खर्च आठ लाखांहून अधिक होतो. म्हणजे भारतीय लष्कर आपल्या एका अधिकाऱ्याला वैमानिक बनविण्यासाठी इतकी मोठी
रक्कम स्वत: खर्च करते.
लष्कराला दैनंदिन कामासाठी प्रत्येक वेळी हवाई दलाची विमाने आणि हेलिकॉप्टरवर विसंबून राहता येत नाही. त्यामुळे दैनंदिन व युद्धकालीन गरजा भागविण्याच्या उद्देशाने लष्कराने छोटेखानी हवाई दलाची स्थापना केली. भारतीय हवाई दल आणि लष्कराच्या हवाई दल यांच्या कामात बराच फरक आहे. आकारमानानुसार भारतीय हवाई दलाच्या तुलनेत या दलाचा आकार तसा लहान. परंतु, त्याच्यावर लष्करी मोहिमांची अतिशय महत्त्वपूर्ण व मोठी जबाबदारी. आकाशात हवाई निरीक्षण कक्ष स्थापून तोफखान्याच्या माऱ्याचे निरीक्षण व दिशादर्शक करणे, युद्धभूमीवरून जखमी सैनिकांची हवाई वाहतूक करणे, लढाऊ सैनिकांच्या तुकडय़ांना सीमावर्ती भागात पोहोचवणे, आपत्कालीन काळात बचावकार्य आणि खडतर ठिकाणी हवाई मार्गे रसद पुरवठा करण्याची जबाबदारी या वैमानिकांमार्फत पार पाडली जाते. लवकरच या दलाच्या भात्यात ‘रूद्र’ हे शत्रूवर हल्ला चढविण्याची क्षमता राखणारे हेलिकॉप्टर समाविष्ट होत आहे. त्यामुळे हे वैमानिक आकाशातील लढाऊ सैनिक म्हणून ओळखले जातील.
नौदलाचे हवाई दल
नौदलाच्या हवाई दलाची कार्यपद्धती भारतीय हवाई दल आणि लष्करी हवाई दल यांच्यापेक्षा वेगळी आहे. या दलात लढाऊ विमाने, हेलिकॉप्टरचा ताफा आहे. समुद्रकिनाऱ्यालगतचे हवाई तळ आणि विमानवाहू नौकेवर तैनात असलेल्या या ताफ्यावर शत्रूवर हल्ला चढविण्याची मुख्य धुरा आहे. याव्यतिरिक्त हवाई हल्ल्यांपासून संरक्षण, टेहळणी आदींची मदार त्यांच्यावर असते. समुद्रातील युद्धाकरिता आवश्यक ठरणारी सर्व प्रकारची लढाऊ विमाने अन् हेलिकॉप्टर ही या दलाची शक्ती. देशात त्यांचे सात हवाई तळ आहेत. ‘आयएनएस विराट’ तसेच नुकतीच समाविष्ट होणारी ‘आयएनएस विक्रमादित्य’ या विमानवाहू नौकांवर ते कार्यरत राहील. नौदलाच्या हवाई दलात वैमानिक होण्याकरिता स्वतंत्र प्रक्रिया आहे. त्यासाठी लेखी परीक्षा द्यावी लागत नाही. ‘एसएसबी’कडून घेतल्या जाणाऱ्या मुलाखतीचा महत्त्वपूर्ण टप्पा उमेदवारांना पार करावा लागतो. कोणत्याही शाखेचा पदवीधर त्यासाठी अर्ज करू शकतो. केवळ संबंधिताने इयत्ता बारावी गणित व भौतिकशास्त्र विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. लष्करी हवाई दलाप्रमाणे नौदलाच्या हवाई दलातही भरारी घेण्याची संधी दडलेली आहे.
जगातील सर्वात उंच युद्धभूमी म्हणून गणल्या जाणाऱ्या सियाचेनसारख्या क्षेत्रात अविरतपणे कार्यरत राहणारे हे एकमेव दल. अतिशय प्रतिकूल हवामानात १३ हजार ते २० हजार फूट उंचीपर्यंतच्या क्षेत्रात हेलिकॉप्टरद्वारे रसद पुरविण्याचे जोखमीचे काम हे वैमानिक लीलया पार पाडतात. आजवरच्या प्रत्येक युद्धात, श्रीलंकेतील पवन आदी लष्करी मोहिमांमध्ये या दलाने आपले कर्तृत्व सिद्ध केले. अतिरेकीविरोधी व बंडखोरांविरुद्धच्या कारवायांमध्ये या दलाचे योगदान मोलाचे आहे. प्रत्येक लष्करी मोहिमेत अग्रक्रमाने सहभागी होणारे हे दल आपत्कालीन काळात देशवासीयांसाठी धावून जाते. लष्करी अधिकाऱ्यांना वैमानिक बनण्यासाठी प्रशिक्षण देणारे कोम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन स्कूल ही देशातील एकमेव संस्था होय. हवाई सरावाचा कोणताही अनुभव नसलेल्या लष्करी अधिकाऱ्यांना स्कूलमध्ये ‘बेसिक पायलट’ आणि नंतर ‘कोम्बॅक्ट एव्हिएटर्स’ अशा दोन अभ्यासक्रमांत वर्षभरात प्रशिक्षण पूर्ण करावे लागते. त्या अंतर्गत ९० तासांच्या हवाई सरावाचा अनुभव दिला जातो. याव्यतिरिक्त नैसर्गिक आपत्तीत बचाव व मदतकार्यासाठी सैन्यदलाच्या हेलिकॉप्टरची लागणारी मदत लक्षात घेऊन या वैमानिकांना खास प्रशिक्षण देण्यात येते. भारतीय लष्कराच्या वाटचालीवर नजर टाकल्यास या दलाची लक्षणीय कामगिरी अधोरेखित होते. या दलाची स्थापना १ नोव्हेंबर १९८६ मध्ये झाली होती. त्यानंतर देशासह सीमावर्ती भागात मोक्याच्या ठिकाणी दलाचे तळ निर्माण करण्यात आले. प्रारंभी, या दलात केवळ तोफखान्याच्या अधिकाऱ्यांना समाविष्ट केले जात असे. नंतर लष्कराच्या सर्व विभागांतील अधिकाऱ्यांना समाविष्ट होण्याची संधी देण्यात आली. दोन वर्षांच्या लष्करी सेवेनंतर तरुण अधिकाऱ्यांना या दलात जाण्याचा पर्याय उपलब्ध असतो. भारतीय हवाई दलात जाण्याची मनीषा बाळगणाऱ्या युवकांना लष्कराचे हवाई दल हाही एक उत्तम पर्याय आहे.
aniket.sathe@expressindia.com