वनस्पती विज्ञानात संशोधन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी ‘प्लान्ट फेलोज’ ही नामांकित पाठय़वृत्ती दिली जाते. वनस्पती विज्ञानात पीएच.डी. व अतिरिक्त चार वर्षांचा संशोधन अनुभव असलेले अर्जदार या पाठय़वृत्तीस अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. २०१४ साली दिल्या जाणाऱ्या या पाठय़वृत्तीसाठी वनस्पती विज्ञान किंवा संबंधित इतर विषयातील अर्जदारांकडून ३१ मार्च २०१४ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.
पाठय़वृत्तीबद्दल : ‘प्लान्ट फेलोज’ या नावाने ओळखली जाणारी ही पोस्टडॉक्टरल पाठय़वृत्ती वनस्पती विज्ञानातील कोणत्याही उपविषयामधील संशोधनासाठी दिली जाणारी एक नामांकित पाठय़वृत्ती आहे. ही पाठय़वृत्ती ‘सेव्हन्थ फ्रेमवर्क प्रोग्रॅम’ आणि ‘मेरी क्युरी अ‍ॅक्शन्स पीपल’ या संस्थांकडून दिली जाते. या पाठय़वृत्तीअंतर्गत पाठय़वृत्तीधारकाला झुरिकस्थित ‘द झुरिक बेसल प्लान्ट सायन्स सेंटर’ या संस्थेच्या माध्यमातून त्याचे संशोधन करता येईल. या संस्थेशी एकूण १३ युरोपीय विद्यापीठे व सात आंतरराष्ट्रीय विद्यापीठे संलग्न आहेत. संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या एकूण पोस्टडॉक्टरल पाठय़वृत्तींची संख्या ६९ आहे. पाठय़वृत्तीधारकाच्या संशोधन प्रकल्पाचा कालावधी १२ महिन्यांपासून २४ महिन्यांपर्यंत असेल.
पाठय़वृत्तीधारकाला दिलेल्या मर्यादित कालावधीतच त्याला त्याचा प्रकल्प पूर्ण करावा लागेल. या पाठय़वृत्तीअंतर्गत अर्जदाराला त्याच्या विद्यापीठ किंवा संस्थेकडून दरमहा निवासी भत्ता, वेतन भत्ता, प्रवास भत्ता व संशोधनासाठीची अनुदानित रक्कम यांसारख्या सर्व सुविधा देण्यात येतील.
आवश्यक अर्हता : ‘प्लान्ट फेलोज’ ही पाठय़वृत्ती वनस्पती विज्ञानात संशोधन करणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे. या पाठय़वृत्तीला अर्ज करण्यासाठी अर्जदार पीएच.डी. असावा. तसेच त्याच्या पीएच.डी.च्या पदवीनंतर त्याच्याकडे पूर्णवेळ चार वर्षांचा संशोधनाचा अनुभव असावा. अर्जदाराला त्याच्या संशोधनाच्या अनुभवाचे प्रशस्तिपत्र जोडावे लागेल. पदवी व पदव्युत्तर स्तरावर अर्जदाराची शैक्षणिक पाश्र्वभूमी अतिशय उत्तम असावी. त्याचे इंग्रजीवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. त्याबरोबरच अर्जदार टोफेल अथवा आयईएलटीएस या इंग्रजीच्या दोन्हीपकी एका परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रिया : प्लान्ट फेलोजच्या या पोस्टडॉक्टरल पाठय़वृत्तीसाठी अर्जदाराने त्याचा अर्ज ऑनलाइन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून दुव्यामध्ये दिलेल्या वेबसाइटवर जमा करावा. अर्जदाराला ज्या संशोधन संस्थेमध्ये पुढील संशोधन करायचे आहे त्या संस्थेची निवड त्याला अगोदरच करावी लागेल. अर्जदार संशोधनाच्या विषयाबद्दल किंवा संबंधित इतर कोणत्याही माहितीसाठी त्याचा अर्ज जमा करण्यापूर्वी संशोधन संस्थेमधील त्याच्या संशोधन विषयातील तज्ज्ञ मार्गदर्शकाला किंवा त्या विषयातील कोणत्याही संशोधकाला संपर्क करू शकतो.
अर्ज जमा करताना अर्जदाराने अर्जाबरोबर त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीबद्दल विस्तृतपणे माहिती देणारे त्याचे एस.ओ.पी., त्याचा सी.व्ही., त्याने केलेल्या संशोधनाचा लघुसंशोधन अहवाल (Research Proposal) त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीशी संबंधित असलेल्या दोन प्राध्यापक किंवा तज्ज्ञांची शिफारसपत्रे, आतापर्यंतच्या सर्व शैक्षणिक ट्रान्सक्रिप्ट्सच्या अधिकृत प्रती इत्यादी गोष्टी जोडाव्यात.
निवड प्रक्रिया : अर्जाच्या अंतिम मुदतीनंतर पुढील निवड प्रक्रिया साधारणपणे तीन महिने चालेल. अर्जदारांकडून आलेल्या अर्जामधून पात्र अर्ज त्या विषयाशी संबंधित असलेल्या दोन स्वतंत्र शास्त्रज्ञांकडे पाठवले जातील. शास्त्रज्ञांनी केलेल्या मूल्यमापनावर मग अंतिम अर्जदारांची या पाठय़वृत्तीसाठी निवड केली जाईल. अर्जदाराला त्याच्या निवडीबद्दल जुल २०१४ च्या दरम्यान कळवले जाईल.
अंतिम मुदत : या पाठय़वृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०१४ आहे.
महत्त्वाचा दुवा : http://www.plantfellows.ch/node/6      
itsprathamesh@gmail.com 

Story img Loader