युसिफ या संस्थेकडून भारतीय नागरिकत्व असलेल्या प्राध्यापक व संशोधकांना दरवर्षी अमेरिकेतील विविध विद्यापीठ व संशोधन संस्थांमध्ये अध्यापन आणि संशोधन करण्यासाठी पाठय़वृत्ती बहाल केली जाते. ही पाठय़वृत्ती म्हणजेच फुलब्राइट – नेहरू पाठय़वृत्ती. दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा ही पाठय़वृत्ती हुशार व संशोधनाची पॅशन असणाऱ्या प्राध्यापक- संशोधकांना देण्यात येणार आहे. या पाठय़वृत्तीसाठी ‘युसिफ’कडून १५ जुल २०१३ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.
पाश्र्वभूमी :
भारत व अमेरिकेमधील शैक्षणिक व संशोधन क्षेत्रांतील सहकार्य वाढीस लागावे व अध्यापन- संशोधन क्षेत्रांतील विचारांची आदानप्रदान व्हावी या हेतूने ‘युसिफ’ म्हणजेच द युनायटेड स्टेटस्- इंडिया एज्युकेशनल फाऊंडेशन ही संस्था गेली अनेक वष्रे कार्यरत आहे. या संस्थेकडून दोन्ही देशांतील अभ्यासकांना विविध विषयांतील अध्यापन- संशोधनासाठी अनेक प्रकारच्या शिष्यवृत्त्या व इतर सहाय्यवृत्त्या देण्यात येतात. आतापर्यंत संस्थेकडून भारत व अमेरिकेतील मिळून एकूण १७ हजारांहून अधिक ‘फुलब्राइट फेलोज’ निवडले गेलेले आहेत.
पाठय़वृत्तीबद्दल :
हुशार व संशोधनाच्या आवडीने झपाटलेल्या भारतीय प्राध्यापक व संशोधकांना अमेरिकेतील विविध विद्यापीठ व संशोधन संस्थांमध्ये त्यांचे स्वत:चे अध्यापन किंवा संशोधन किंवा दोन्हीही करण्यासाठी एक सर्वोत्कृष्ट माध्यम मिळावे हा ‘युसिफ’कडून दिल्या जाणाऱ्या फुलब्राइट- नेहरू पाठय़वृत्तीचा प्रमुख हेतू आहे. ‘युसिफ’ची ही पाठय़वृत्ती शिक्षण व संशोधन क्षेत्रांतील सर्वच विद्याशाखांसाठी दिली जाते. सर्वसाधारणपणे मात्र कृषी, अर्थशास्त्र, ऊर्जा, हवामान बदल, पर्यावरण, शिक्षण, आंतरराष्ट्रीय संबंध, लोकप्रशासन, सार्वजनिक आरोग्य, विज्ञान व तंत्रज्ञान या विषयांना आणि अमेरिका किंवा भारतातील भाषा, साहित्य, इतिहास, प्रशासन, अर्थव्यवस्था, संस्कृती या शाखांमधल्या अर्जदारांना प्राधान्य दिले जाते. पाठय़वृत्तीसाठी निवड झालेल्या अर्जदारांना पाठय़वृत्तीचा संबंधित कालावधी अमेरिकेतच पूर्ण करावा लागतो. या पाठय़वृत्तीचा एकूण कालावधी वेगवेगळ्या विद्याशाखेवर अवलंबून असून तो चार महिन्यांपासून ते नऊ महिन्यांपर्यंत आहे. ‘युसिफ’च्या या पाठय़वृत्तीमध्ये पाठय़वृत्तीधारकाचा येण्याजाण्याचा संपूर्ण विमानप्रवास, निवासासहित इतर खर्च व मासिक भत्ता इत्यादी गोष्टींचा समावेश आहे.
आवश्यक अर्हता :
या पाठय़वृत्तीसाठी अर्जदार पीएच.डी. पदवीधारक असावा अथवा त्याचे पीएच.डी.च्या समकक्ष शोधनिबंध प्रकाशित झालेले असावेत. त्याला त्याच्या कामाचा म्हणजे संशोधन किंवा अध्यापनाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असावा. तसेच सध्या सेवेमध्ये असणाऱ्या अर्जदारांनी योग्य प्रशासकीय व्यवस्थेमार्फत आपला अर्ज पाठवावा. अर्जदाराने अर्जाबरोबर त्याच्या अलीकडील प्रकाशित झालेल्या शोधनिबंधाची एक प्रत पाठवावी.
अर्ज प्रक्रिया :
‘युसिफ’च्या वेबसाइटवर या पाठय़वृत्तीसाठी कराव्या लागणाऱ्या अर्जाचा नमुना व त्याबद्दलची इतर माहिती दिलेली आहे. अर्ज पूर्ण करून अर्जदाराने तो संस्थेला ई-मेल करावा. अर्ज भरताना तो हस्ताक्षरात भरू नये. त्याऐवजी संगणकाचा वापर करावा. तसेच अर्जामध्ये विचारलेली माहिती भरताना अर्जदाराने दिलेल्या शब्दमर्यादेचे उल्लंघन करता कामा नये. पूर्ण अर्जाची एक िपट्र काढून त्यावर स्वत:ची स्वाक्षरी करून ती प्रत जवळच्या ‘युसिफ’च्या कार्यालयात द्यावी. पश्चिम भारतासाठी ‘युसिफ’चे कार्यालय मुंबईत आहे. अर्जदार जर खासगी अथवा शासकीय सेवेत असेल तर त्याने आपला अर्ज योग्य त्या प्रशासकीय व्यवस्थेमार्फत ‘युसिफ’कडे पाठवावा.
अंतिम मुदत :
अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ जुल २०१३ आहे.
महत्त्वाचा दुवा :
http.www. usief.org.in
itsprathamesh@gmail.com
संग्रहित लेख, दिनांक 17th Jun 2013 रोजी प्रकाशित
फुलब्राइट- नेहरू पाठय़वृत्ती
भारतीय नागरिकत्व असलेल्या प्राध्यापक व संशोधकांना दरवर्षी अमेरिकेतील विविध विद्यापीठ व संशोधन संस्थांमध्ये अध्यापन आणि संशोधन करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या पाठय़वृत्तीविषयी..
Written by लोकसत्ता टीम
Updated:

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 17-06-2013 at 12:03 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fulbright nehru scholarship