करिअरची दिशा ठरवताना कामाच्या संधींचा विचार केला जातो, तेव्हा सरकारी किंवा खासगी नोकरी, स्वतंत्र व्यवसाय आणि स्वयंसेवी संस्था हे चार मुख्य पर्याय समोर असतात. प्रत्येक पर्यायाची बलस्थानं आणि मर्यादांचा विचार करून, आपल्यासाठी काय योग्य ठरेल याचा निर्णय घेतला तर गोंधळलेपण कमी होऊ शकतं.
‘सरकारी नोकरीत अधिकार केवढा असतो. पुन्हा पेन्शन, वेगवेगळे भत्ते, अधिकारामुळे आपोआप चालत येणारे फायदे. सरकारी नोकरीएवढं सुखाचं काहीच नाही. एमपीएससी, यूपीएससीच्या परीक्षा तू अवश्य दे.’
‘सरकारी नोकरी करायची म्हणजे भ्रष्टाचाराची तयारी पाहिजे. लायकी नसलेल्या वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागते. विरोध करण्याची शक्ती लागते. ठरव बुवा, काय करायचं ते.’
‘आपल्याला कुणाचं बॉसिंग नको. लाथ मारीन तिथं पाणी काढीन एवढी हिंमत आहे आपल्यात. मी स्वतंत्र व्यवसायच उभा करणार. नोकरी करावी लागण्यासारखं दुर्दैव दुसरं नाही.’
‘मराठी माणसानं धंदा करायचा म्हणजे बुडायचीच खात्री जास्त. बघ बुवा, कष्ट फार पडतात, शांतताच नसते डोक्याला.
‘कॉर्पोरेट कंपनी किंवा आयटी. मग चिंता नाही. राबावं लागतं पुष्कळ, पण परदेशी वाऱ्या, मोठी मोठी पॅकेजेस..’
‘नको बाबा ती आयटीतली नोकरी. दिसायला चकचकाट आहे, पण दिवस-रात्र मशीनसोबत. माणसांशी बोलायलासुद्धा वेळ नसतो.’
‘देशाचं, समाजाचं आपण काही देणं लागतो, याचं भान आजकाल कमी झालंय. सर्व काही शोषणावर आधारलेलं आणि श्रीमंतांच्या हातात. गरिबांकडे ना सत्ता, ना पसा. ‘एनजीओ’शिवाय ही दरी कमी होणारच नाही. प्रस्थापितांना विरोध करणारं कुणीतरी हवंच.’
‘आजकाल एनजीओ आणि कॉर्पोरेट कंपनीमध्ये काही फरकच राहिला नाहीये. गरिबांचा कैवार हे चलनी नाणं झालंय.’
ही काही वक्तव्यं करिअर निवडताना कानावर येणारी.. करिअरची दिशा ठरवताना त्याबद्दल थोडय़ा अनुभवी परिचितांशी चर्चा करावी म्हटलं तर सगळ्याच बाबतीत अशी उलटसुलट मतं ऐकू येतात. आपण गोंधळतो. आणखी चाचपडायला लागतो. मग थोडाफार आपला आपण विचार केल्यावर या चार पर्यायांपकी काहीतरी ओळखीचं, जवळचं वाटतं. आपल्याला जमेलसं वाटतं. आपण काय प्रकारचं काम करायचं याची एक अस्पष्ट कल्पना मनात असते ती स्पष्ट व्हायला लागते. काहींच्या मनातलं आपल्या करिअरविषयीचं हे चित्र एवढं पक्कं होतं की, ते त्यांचं स्वप्नच बनतं. ते मिळालं नाही तर त्यांना टोकाचं वैफल्य येऊ शकतं.
मेडिकल – इंजिनीअरिंगसारखे व्यावसायिक अभ्यासक्रम निवडण्याचा निर्णय त्या त्या प्रवेशपरीक्षांद्वारेच होतो. ज्यांची दिशा निश्चित होते ते पुढे जातात, पण बहुसंख्यांना अनेक पर्यायांमधून निर्णय घेताना अवघड जातं. दोन्ही बाजूंची टोकाची मतं ऐकल्यानंतर आपल्याला आवडेल का? आणि जमेल का? यातच ते अडकतात.
या टप्प्यावर करिअर मार्गदर्शनासाठी खूप मुलं माझ्याकडे येतात. अनेक प्रश्न विचारून त्यांचा त्यांनाच मार्ग शोधायला आणि त्यांना योग्य असणाऱ्या करिअरच्या दिशेपर्यंत जायला आम्ही मदत करतो. मला नेहमी गंभीरपणे विचार करावासा वाटतो ते या गोंधळाच्या उगमापासून. मुलं लहान असतात, नव्यानंच मोकळ्या जगात प्रवेश करत असतात, नवखेपण असणारच. हल्ली पर्यायही खूप वाढलेत. पण तरीही काही जण म्हणतात, ‘मला अमुकच करायचं आहे. ते मिळालं नाही तर आपण दुसरं काहीच करू शकणार नाही, अशी भीती वाटते.’ एवढी असुरक्षितता का? याउलट काहीजण ‘मला काहीच ठरवता येत नाही. एकाही गोष्टीबद्दल म्हणावं अशी पॅशन वाटत नाही,’ असं म्हणण्याएवढी असहाय का होतात?
या असुरक्षितता किंवा असहायतेमागे कुठली भीती असते? आपला करिअरचा निर्णय चुकेल आणि आयुष्यभर काहीतरी नावडतं किंवा न जमणारं करत बसावं लागेल ही? की आपला निर्णय चुकेल आणि इतर आपल्या पुढे जातील ही? मला काय आवडेल – आवडणार नाही? किंवा काय जमेल-जमणार नाही, हे कुठून ठरतं? मनातली भीती आणि गोंधळ वाढवणाऱ्या या दोन्ही टोकाच्या भूमिका कुठून येतात?
मुलांशी (अनेकदा मोठय़ांशीही) बोलताना जाणवतं की घरातल्या किंवा नात्यातल्या, जवळपासच्या प्रभावी व्यक्ती, चित्रपट, वाचन आणि माध्यमं यातून काही मतं आपण पुन:पुन्हा ऐकतो, पाहतो आणि त्यातून नकळत मनात कुठली तरी भूमिका आपली म्हणून पक्की होते. अमुक करिअर ‘चांगलं’ आहे किंवा तमुक ‘वाईट’ आहे, ही गृहीतकं प्रभावीपणे तयार होतात. (‘मला काय जमेल-जमणार नाही?’ यामध्ये स्वत:बद्दल तयार झालेली स्वकल्पना असते.
मुलांशी बोलताना बहुतेक वेळा जाणवते, ती विशिष्ट गृहीतकं तयार झाल्यामुळे किंवा स्वीकारल्यामुळे झालेली गडबड. गृहीतकांमध्ये थोडंफार तथ्य असतं, परिस्थितीचं सर्वसामान्य भान ती देऊ शकतात. पण बहुतेकदा हे सर्वसामान्यीकरण (जनरलायझेशन) आपला रस्ता अडवण्याचंच काम करतं. खरं पाहिलं तर अमुक
काम चांगलं आणि अमुक वाईट हे बोलणाऱ्या
माणसाचं वैयक्तिक अनुभवावर आधारलेलं मत
किंवा त्याला ते जसं वाटलं तसं (पस्रेप्सन)असतं. बोलणारा एवढा एकांगी झालेला असतो की, एकतर
पूर्ण बाद नाहीतर एकदम चांगलं- असंच कुठल्याही गोष्टीचं फक्त काळं किंवा फक्त पांढरं चित्र रंगवलं
जातं, ज्यातून मत पोहोचतं, पण वस्तुस्थिती
पोहोचत नाही. कोवळ्या वयात ऐकलेली-पाहिलेली
ही मतं मग संस्कारांसारखंच काम करतात.
सरकारी नोकरी करणारे सगळे भ्रष्टाचारी आणि ‘एनजीओ’वाले सगळे वंचितांसाठी काम करणारे असं कधीच नसतं. सरकारी नोकरीमध्ये भ्रष्टाचार मोठय़ा प्रमाणावर आहे, पण आपल्या देशात
कामाची संधीदेखील किती पराकोटीची मोठी मिळू शकते ते बाहेर फार कमी पोहोचतं. अनेकदा अधिकार,
पगार आणि पेन्शनमध्ये अडकलेल्या सरकारी नोकरालादेखील आपल्या कामामधलं पोटेन्शिअल लक्षात येत नाही, तर तो ते बाहेर कुठे पोहोचवणार?
रोजच्या चाकोरीपलीकडे जाण्याची सवय नसल्यामुळे आपल्याजवळची ही गोष्ट महत्त्वाची आहे, विशेष आहे, बाहेर मिळू शकत नाही, हे लक्षातच येत नाही. यंत्रणेमध्ये कुठल्याही प्रकारचं विशिष्ट कौशल्य मागताक्षणी उपलब्ध होऊ शकतं, हे मोठं बलस्थान आहे, याची शक्ती माहीतच नसते. थोडक्यात, ठरलेल्याच नकारात्मक किंवा सकारात्मक गोष्टी म्हणजेच प्रस्थापित गृहीतकं पुन:पुन्हा चच्रेत येतात. सवयीमुळे एखाद्या गोष्टीतलं चांगलं जसं लक्षात येत नाही, तसंच वाईटाबाबतही निर्ढावलेपणा येतो, हे सर्वच बाबतींत खरं आहे.
वंचितांपर्यंत पोहोचणं किंवा एखादा सामाजिक विषय लावून धरणं हे ‘एनजीओं’चं बलस्थान पण कुठला तरी एक विषय धरल्यामुळे ते एकांगी होतात. अनेकदा आपल्या वैचारिक आणि बौद्धिक क्षमतेचा अभिमान नकळतपणे धरला जाऊन ते एकांगीपण एवढं टोकदार होतं, की ‘आम्हीच सर्वात बरोबर’ हे सिद्ध करत विरोध करत राहणं हेच त्यांचं काम बनतं. पण ही मर्यादा सहसा चच्रेत येत नाही. स्वतंत्र व्यवसाय करणाऱ्यांवर थेट बॉस नसेल तरी त्यांनाही बँकेपुढे, ग्राहकापुढे वाकावंच लागतं. परिस्थितीचे सर्वात मोठे बळी असे छोटे उद्योजक असतात.
आयटी किंवा कॉर्पोरेट्समध्येदेखील नातेसंबंध आणि तणाव व्यवस्थापन सर्वात महत्त्वाचं ठरतं.
थोडक्यात कामाच्या, करिअरबद्दलच्या कुठल्याही टोकाच्या चांगल्या किंवा वाईट मताच्या साच्यात अडकल्यानंतर वस्तुनिष्ठपणे त्यांच्या बलस्थान आणि मर्यादांचा विचार होत नाही, वस्तुस्थिती मोकळेपणानं, आहे तशी स्वीकारण्यावर मर्यादा येतात. त्यामुळे जे काही आपलं मत बनलं असेल त्याप्रमाणे जमलं नाही म्हणजे आपण चुकलो. चुकणं हा गुन्हाच. अशी या गुन्ह्य़ाबद्दलची भीती निर्माण होते. जी निर्णय घेताना विलक्षण गोंधळवते किंवा ते मिळालं नाही की, वैफल्य देते.
याचं मूळ आपल्या शिक्षणपद्धतीतही आहे, असं मला नेहमी वाटतं. लहानपणापासून आपल्याला निबंधांसाठी, वादविवाद स्पध्रेसाठी असे दोन टोकांचेच विषय दिले जातात- ‘वाढत्या बेरोजगारीचे कारण स्त्रिया नोकरी करू लागल्या हे आहे’, ‘विज्ञान श्रेष्ठ की कला?’, ‘जीवनासाठी कला की कलेसाठी कला?’ असे दोन टोकांचेच विचार करण्याची सवय रूढ शिक्षणपद्धती आणि एकूण सामाजिक मनोवृत्ती यातून लागते.
लहानपणापासून कानावर पडणारे शब्द, स्वत:चं श्रेष्ठत्व सिद्ध करणं हेच कार्य समजणारे संवाद, सिनेमा, माध्यमं यांच्याकडून आपण जे घेतो त्यातून नकळत अशा गृहीतकांचेच संस्कार खूप जास्त होतात आणि
ही अपयशाची संकल्पना आणि तिची भीती पक्की
होत जाते. ही भीती एवढा स्थायीभाव बनते की, ‘ही भीती आहे’ हेदेखील कळत नाही, इतकी ती गृहीत असते.
या चक्रातून बाहेर येण्यासाठी वैचारिक समतोल साधण्याची सवय लावून घ्यायला हवी. शालेय वयापासून समतोल पद्धतीनं विचार करण्यासाठी
‘हे श्रेष्ठ की ते?’ पेक्षा ‘विज्ञानाचे आणि कलेचे जास्तीत जास्त फायदे आणि तोटे लिहा’ अशासारखे काहीतरी दिलं गेलं तर समतोल विचारांची पद्धत थोडीफार रुजू शकेल.
मोठेपणी जेव्हा निर्णय घेता येत नाही तेव्हा प्रत्येक पर्यायाच्या बलस्थानं आणि मर्यादांचा विचार करून, वाटल्यास कागदावर दोन बाजूंना दोन्हीची यादी करून आपल्यासाठी काय योग्य ठरेल याचा निर्णय घेतला तर गोंधळलेपण कमी होऊ शकतं. आपण कुठल्या गृहीतकात अडकलेलो नाही ना? हे तपासणं आणि नंतर प्रत्येक पर्यायाच्या बलस्थान आणि मर्यादेचा आपल्या स्वत:च्या परिस्थितीत विचार करून पक्क्या निष्कर्षांपर्यंत पोहोचणं ही पद्धत वैचारिक समतोलाची सवय लावण्यासाठी नक्की उपयोगी पडेल.